येणारा काळ हा आता डीएसएलआरपेक्षा आकाराने लहान असलेल्या मिररलेस कॅमेऱ्यांचाच असणार आहे, हे वास्तव लक्षात आल्यानंतर मध्यंतरीच्या काळात बाजारपेठेत काहीशा मागे पडलेल्या ऑलिम्पसने या क्षेत्रात आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत त्यांनी मिररलेस कॅमेरा (मायक्रो थर्ड) क्षेत्रात अनेक चांगली नवीन मॉडेल्स बाजारपेठेत आणली आहेत. त्यापैकी सर्वाधिक चांगले ठरलेले मॉडेल होते, ओ- एमडी. मात्र ओ- एमडीच्या बाबतीत ऑलिम्पसने ठेवलेली किंमत ही त्याच्यासाठी सर्वाधिक अडचणीची होती. कारण त्याची किंमत बाजारपेठेत मिळणाऱ्या इतर कॅमेऱ्यांच्या तुलनेत अधिक वाटावी, अशीच होती. ओ-एमडीच्या संदर्भात वाचल्यानंतर किंवा त्याची हाताळणी केल्यानंतर अनेकांना असे वाटले असेल की, हा कॅमेरा आपल्या हाती असायलाच हवा. पण किंमत पाहून अनेकांनी हात आखडते घेतले असतील, अशांसाठी आता ऑलिम्पसने बाजारात आणलेला पेन लाइट मालिकेतील इ- पीएल ५ हा चांगला पर्याय आहे, असे या कॅमेऱ्याच्या रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. महत्त्वाचे म्हणजे ऑलिम्पस ओएमडीच्या तुलनेमध्ये हा कॅमेरा तसा कमी किंमतीत उपलब्ध आहे. मात्र त्यातून मिळणाऱ्या छायाचित्रणाचा दर्जा हा ओ-एमडीसारखाच राखण्यात कंपनीला यश आले आहे. बाजारपेठेच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची बाब आहे.
उत्तम ग्रीप
बाह्यवैशिष्टय़ांपासून सुरुवात केली तर प्रथमदर्शनी आपण प्रेमात पडतो ते ऑलिम्पसने या कॅमेऱ्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या उत्तम ग्रीपच्या. उजव्या बाजूस पकडण्यासाठी उत्तम ग्रीप तर दिलेली आहेच पण जी मंडळी नियमित छायाचित्रण करतात, त्यांना लक्षात येईल की, तेवढेच महत्त्व आपल्या अंगठय़ालाही असते. ऑलिम्पसने या कॅमेऱ्यामध्ये अंगठा ठेवण्यासाठी थंब रेस्टही चांगले दिले आहे. छायाचित्रकारांच्या दृष्टीने या दोन्ही बाबींना खूप महत्त्व आहे.
हॉट शू
या कॅमेऱ्याला ऑलिम्पसने रेट्रो लूक दिला आहे. जुन्या जमान्यातील कॅमेऱ्यांप्रमाणे तो भासमान होतो. वरच्या बाजूने पाहिले तर त्याच्या डावीकडे स्पीकर देण्यात आला आहे. त्यानंतर हॉट शू ठेवण्यात आला आहे. त्याचा वापर इलेक्ट्रॉनिक व्ह्य़ू फाईंडरसाठी किंवा कॅमेऱ्यासोबत येणाऱ्या फ्लॅशसाठीही करता येऊ शकतो. या कॅमेऱ्याला बिल्ट इन फ्लॅशची सोय देण्यात आलेली नाही.
चकतीवरची सेटिंग्ज
त्याच्याच बाजूला एका चकतीवर आयऑटो (नेहमीच्या ऑटोमध्ये ऑलिम्पसने काही बारिकसे बदल केले असून ते आता आयऑटो म्हणून दिले आहे.), प्रोग्रॅम, अ‍ॅपर्चर, शटर स्पीड, मॅन्यूअल, मूव्ही मोड, ऑटोमेटिक सेटिंग्ज आणि आर्ट फिल्टर्स यांचा समावेश आहे.
ऑटो सेटिंग्ज
यामध्ये एकूण २३ सेटिंग्जचा समावेश आहे. त्याच पोर्ट्रेट, इ- पोर्ट्रेट, लँडस्केप, लँडस्केप अधिक पोर्ट्रेट, स्पोर्टस्, नाइट सीन, नाइट पोर्ट्रेट, लहान मुले, हाय की, लो की, स्टॅबिलायझिंग मोड, मॅक्रो, नेचर मॅक्रो, कँडल, सनसेट, डॉक्युमेंट, पॅनोरमा, फायरवर्क, बीच, स्नो, फिश आय इफेक्ट, वाइड अँगल, मॅक्रो, थ्रीडी या सेटिंग्जचा समावेश आहे. आपण काय टिपतो आहोत ते लक्षात घेऊन त्यानुसार सेटिंग करायचे की, बाकीचे काम कॅमेराच करतो अशी ही सोय आहे.
आर्ट फिल्टर्स
गेल्या काही महिन्यांमध्ये आर्ट फिल्टर्स फोटोग्राफर्समध्ये अधिक लोकप्रिय ठरताना दिसत आहेत. खास करून सध्याच्या फोटो शेअरिंगच्या जमान्यात. कारण अर्थातच त्यात एक वेगळी मजा आहे. या आर्ट फिल्टर्समध्ये ऑलिम्पसने एकूण १३ पर्याय दिले आहेत. आजवर इतरही अनेक कॅमेऱ्यांची हाताळणी रिव्ह्य़ू दरम्यान केली, त्यावेळेस असे लक्षात आले की, ऑलिम्पसचे आर्ट फिल्टर्स इतरांच्या तुलनेमध्ये अधिक चांगले काम करतात.
या आर्ट फिल्टर्समध्ये पॉप आर्ट, सॉफ्ट फोकस, पेल अ‍ॅण्ड लाइट कलर, लाइट टोन, ग्रेनी फिल्म, पिन होल कॅमेरा, डायोरमा, क्रॉस प्रोसेस, सेपिया, ड्रामॅटिक टोन, की लाइन, वॉटर कलर यांचा समावेश आहे.
आर्ट ब्रॅकेटिंग
या शिवाय अखेरचा फिल्टर अनेकांसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्याला त्या त्या सेटिंग वर जाऊन फोटो काढणे म्हणजे वेळकाढूच ठरेल. त्यामुळे अखेरीस आर्ट ब्रॅकेटिंगची सोय दिली आहे. म्हणजे तुम्ही हा मोड सिलेक्ट करायचा आणि मग त्यावर क्लिक केले की, एकाच वेळेस एकाच क्लिकमध्ये तो फोटो तुम्हाला सर्व फिल्टर्समधून कसा दिसेल त्याच्या १३ प्रतिमा तयार होतात. त्यातील तुम्हाला आवडलेले फोटो ठेवून उर्वरित तुम्ही डिलीट करू शकता. आर्ट ब्रॅकेटिंगचा हा पर्याय खूप उपयुक्त आहे.
क्लिक्  व ऑन- ऑफ
या वरती दिलेल्या चकतीच्या बाजूलाच क्लिक् करण्यासाटीचे शटर रिलीज बटन देण्यात आले असून त्याच्याच बाजूला ऑन  ऑफ करण्यासाठीचे बटनही दिले आहे.
रचनेतील चांगला भाग
 या खेपेस ऑलिम्पसने रचना करताना आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घेतली आहे, ती म्हणजे या पूर्वीच्या कॅमेऱ्य़ामध्ये डाव्या बाजूला ऑन- ऑफच्या बटना जवळ व्हिडिओ मोडचे बटन अशाप्रकारे देण्यात आले होते की, अनेकदा क्लिक करताना चुकून त्याच बटनावर बोट जायचे आणि घोळ व्हायचा. लोकसत्ता- टेक इटच्या रिव्ह्य़ूमध्ये ही बाब लक्षात आणून देण्यात आली होती. या खेपेस या नव्या मॉडेलमध्ये ती बाब कंपनीने टाळली आहे. त्यांनी वरती असलेल्या सपाट पृष्ठभागाच्या मागच्या बाजूस एक तिरक्या रेषेतील रचना केली असून त्यावर सर्वात उजव्या बाजूस व्हिडिओ मोडसाटीचे थेट बटन दिले आहे. त्याच्या अलीकडे फंक् शन आणि फोटो पाहताना झूम करण्यासाठीचे बटन आहे. हॉट शूच्या पलीकडे म्हणजेच डाव्या बाजूस त्या तिरक्या रचनेमध्ये प्रतिमा पाहण्यासाठीचे डिस्प्ले बटन आणि डिलीट बटन देण्यात आले आहे. एरव्ही हे डिलिट बटन सर्व कॅमेऱ्यांमध्ये डाव्या बाजूस खालती देण्यात येते.
टचस्क्रीन
खेचून बाहेर काढता येणारा आणि कॅमेऱ्याचा अँगल बदलण्याची क्षमता असलेला टचस्क्रीन हे या कॅमेऱ्याचे आणखी एक चांगले वैशिष्टय़ आहे.
या टचस्क्रीनचा वापर ऑटो फोकसिंगसाठीही करता येतो. शिवाय त्याच्यावर सेटिंग्जही व्यवस्थित दिसतात. शिवाय तो कमी अधिक अंगाने खाली वर केल्यानंतर कॅमेऱ्याचा अँगल बदलण्याची सोय त्यात आहे. ही अतिशय उपयुक्त रचना आहे. हाच स्क्रीन काहीसा डाव्या- उजव्या बाजूस वळविण्याचीही सोय असती तर ते अधिक चांगले ठरले असते.
मेन्यू
या स्क्रीनच्या उजव्या बाजूस वरती थंब रेस्टची सोय आहे. तर त्यासाठी इन्फो हे लहानसे बटन देण्यात आले आहे. तर सर्वात खाली मेन्यू बटन आहे. या दोन्ही लहान बटनांच्या मध्ये एक चकतीअसून त्यावर अ‍ॅपर्चर कमी अधिक करणे, फ्लॅश ऑन- ऑफ , कंटिन्यूअस शटर रिलीज आदी सोयी देण्यात आल्या आहेत.
१६ मेगपिक्सेल
एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ऑलिम्पसने या पूर्वी त्यांच्या ओ- एमडीमध्ये वापरलेला १६.१ मेगापिक्सेलचा सेन्सर या   पेन लाइट इपीएल ५ साठी  वापरला आहे. त्यामुळे या कॅमेऱ्यावर करण्यात येणारे प्रतिमांकनही ओ- एमडीवर केलेल्या प्रतिमांकनाइतकेच चांगले आहे. छायाचित्रकारांच्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे.
वेगवान ऑटोफोकसिंग
ओ- एमडी बाजारात आणला त्यावेळेस ऑलिम्पसने त्याची जाहिरात करताना सर्वात वेगवान ऑटो फोकसिंग करणारा कॅमेरा असे त्याचे वर्णन केले होते. प्रत्यक्षात रिव्ह्य़ू दरम्यानही ते खरे असल्याचे लक्षात आले होते. या इपीएल-५च्या बाबतीतही तसेच म्हणावे लागते. याचे ऑटो फोकसिंगही तसेच वेगवान आहे.
व्हिडिओ शूट दरम्यान आर्ट फिल्टर्स
व्हिडिओ शूट सुरू असताना फोटो टिपण्याची सोय तर ऑलिम्पसने यापूर्वीच दिली आहे. आता या मॉडेलमध्ये त्यांनी ते करतानाच आर्ट फिल्टर्स वापरून फोटो टिपण्याचीही सोय दिली आहे. ही अनेकांसाठी उपयुक्त ठरू शकते.
फूल एचडी व्हिडिओ
अलीकडे सर्व जण व्हिडिओ शूटचा विचार करताना एचडी व्हिडिओचाच प्राधान्याने विचार करतात. गुणवत्तेबरोबरच सर्वत्र घरोघरी एचडी टीव्ही असल्याने असा विचार अधिक केला जातो. हे गृहीत धरून ८ फ्रेम्स प्रतिसेकंद या दराने एचडी व्हिडिओ शूट करण्याची सोय ऑलिम्पसने या मॉडेलमध्ये दिली आहे. हे व्हिडिओ शूटही चांगल्या दर्जाचे होते, असे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. ते करताना मध्येच फोटो टिपतानाही फारशा कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयएसओ २५,६००
ऑलिम्पसने या कॅमेऱ्यामध्ये आयएसओ सेन्सिटिव्हिटी अधिक वाढवली असून आता २५,६०० पर्यंत आयएसओची सोय दिली आहे.

रंगसंवेदना
फोटोग्राफी दरम्यान महत्त्वाची असते ती कॅमेऱ्याची रंगसंवेदना. म्हणजेच प्रत्यक्षातील रंग आणि तुम्ही टिपत असलेली प्रतिमा त्यातील रंग बदलून चालत नाही. त्यासाटीच्या सर्व चाचण्याही इपीएल-५ ने यशस्वीरित्या पार केल्या.
रॉ फॉर्मॅट
अनेकांसाठी खास करून व्यावसायिकांना आवडेल अशी सोय म्हणजे रॉ फॉर्मॅट. या कॅमेऱ्यामध्ये एकाच वेळेस रॉ फॉर्मॅट आणि जेपेग अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिमा टिपण्याची सोय त्यात आहे.
निष्कर्ष
ओ-एमडीच्या तुलनेमध्ये हा कॅमेरा चांगले काम करतो. आणि ओ- एमडीमध्ये असलेल्या अनेक सोयी- सुविधा आपल्याला कमी किंमतीत उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय तो मिररलेस असल्याने त्याचे वजनही कमी आहे. रचनेमध्येही तो चांगला असल्याने हाताळणी सोपी जाते. यातील मागचा बाहेर येणारा स्क्रीन खूप उपयुक्त आहे. अलीकडे अनेक कॅणेऱ्यांना वाय- फायची सोय असते त्यामुळ इमेज शेअिरग सोपे जाते, तेवढी सोय वगळता बाकी सारे या कॅमेऱ्यामध्ये आहे. शिवाय सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो किंमतीचा. याची किंमत ओ- एमडीच्या तुलनेत कमीच आहे. तेव्हा हा कॅमेरा घेण्याचा विचार करत असाल, तर हरकत नाही !
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४४,९९० /-

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smart reviewolympus pen lite e pl
First published on: 02-02-2013 at 03:05 IST