स्मार्टफोनच्या क्षेत्रात येत असलेल्या नवनवीन कंपन्यांनी प्रस्थापित आणि आघाडीच्या कंपन्यांना तगडी स्पर्धा निर्माण केली आहे. मायक्रोमॅक्सपासून क्झोलोपर्यंत अनेक छोटय़ा ब्रॅण्डनी आपल्या स्वस्त पण आकर्षक आणि नानाविध सुविधा असलेल्या स्मार्टफोन्सनी अॅपल, सॅमसंग, सोनी, नोकिया या अव्वल ब्रॅण्डना टक्कर दिली आहे. त्यातच आता भर पडलीय ती ‘जिओनी’ची. अलीकडेच झालेल्या ‘फिफा फुटबॉल वर्ल्डकप’मधील जाहिरातींमुळे चर्चेत आलेल्या या चिनी कंपनीने ईलाइफ एस ५.५ नावाचा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन अलीकडेच भारतात लाँच केला. दिसायला अतिशय देखणा, वजनाने हलका, हाताळायला सहज आणि अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असलेला हा स्मार्टफोन सॅमसंग, सोनी किंवा अन्य मोठय़ा कंपन्यांच्या उच्च श्रेणीतील फोन्सना जबरदस्त आव्हान उभे करू शकतो.
‘जिओनी’ ईलाइफ एस ५.५च्या वैशिष्टय़ांवर नजर टाकल्यावर हा फोन नोकिया किंवा सॅमसंगच्या ३० ते ४० हजार रुपयांच्या श्रेणीतील फोनच्या पंक्तीत जाऊन बसतो, हे लक्षात येईल. या स्मार्टफोनचे सर्वात पहिल्यांदा नजरेत भरणारे वैशिष्टय़ म्हणजे, याचा लूक आहे. ईलाइफ एस ५.५ हा आजवरचा सर्वात पातळ (कमी जाडीचा) स्मार्टफोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. या फोनची जाडी अवघी ५.६ मिमी आहे. त्यामुळे जिओनीचा दावा खरा असो वा नसो, हा फोन भलताच पातळ आहे, असं म्हणायला हरकत नाही. फोनच्या मागे व पुढे गोर्रिला ग्लास ३ बसवण्यात आल्याने त्याची चमक डोळय़ांत भरते. मात्र, मागील बाजूस असलेल्या गोर्रिला ग्लासवर ओरखडे पडण्याची भीती अधिक आहे. त्यामुळे हा फोन अधिक काळजीपूर्वक हाताळावा लागतो. अर्थात कंपनीने स्मार्टफोनसोबतच मजबूत लेदर फ्लिप कव्हर दिले आहे. त्यामुळे हा धोका फारसा जाणवणार नाही. या फोनचे दुसरे वैशिष्टय़ त्याचे वजन. अनेक वैशिष्टय़े असूनही ईलाइफ कमालीचा हलका वाटतो. त्याची जाडी आणि वजन यामुळे तो हातात घेऊन वावरताना कोणताही त्रास होत नाही.
या स्मार्टफोनला ५ इंचाचा अमोल्ड मल्टीटच डिस्प्ले आहे. डिस्प्ले अतिशय सुस्पष्ट आणि आकर्षक दृश्यमानता देतो. ऐन सूर्यप्रकाशातही फोनवर व्हिडीओ पाहताना किंवा काही वाचण्यात अडचण होत नाही.
 या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेल असून पुढे ५ मेगापिक्सेल आहे. दोन्ही कॅमेऱ्यांतील छायाचित्रण किंवा चित्रीकरण सुस्पष्ट आणि आकर्षक आहे. विशेषत: मागील कॅमेऱ्यामध्ये नॉइज खूपच कमी असल्याने फोटो स्पष्ट येतात. कॅमेऱ्याला ऑटोफोकस, एलईडी फ्लॅश अशा सुविधा आहेतच. पण फ्लॅशविनाही अंधारलेल्या जागेत कॅमेरा चांगले फोटो टिपतो. कॅमेऱ्यात एचडी व्हिडीओ रेकॉर्डिगची सोय आहे.
या फोनचा प्रोसेसर १.७ गिगाहार्ट्झचा ऑक्टा कोअर क्षमतेचा आहे. तर मेमरी दोन जीबीची आहे. त्यामुळे स्मार्टफोन वेगाने कामे पार पाडतो. या स्मार्टफोनला १६जीबी इंटर्नल मेमरी आहे. इतकी मेमरी फारच कमी स्मार्टफोनमध्ये मिळते. मात्र एक्स्टर्नल एसडी कार्डसाठी स्लॉट नसणे, ही या स्मार्टफोनची सर्वात मोठी उणीव आहे. कदाचित फोनचा आकार आटोक्यात ठेवण्यासाठी कंपनीला एक्स्टर्नल एसडी कार्ड हद्दपार करावे लागले असू शकते. फोनचा वेग चांगला असला, तरी सततच्या वापरानंतर तो गरम होतो. हा दोष फोनच्या पातळ आकारामुळे असू शकतो. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड जेलीबिन ऑपरेटिंग सिस्टीम आहे. मात्र फोन खरेदी केल्यानंतर तुम्हाला किटकॅटवर सिस्टीम अपग्रेड करता येते. त्याचे फायदे अन्य किटकॅट फोनसारखे आहेत. अनेक अॅप्लिकेशन्स आणि गेम्स या फोनसोबत पुरवण्यात आले आहेत. त्यामुळे फोन घेताक्षणी त्याचा थेट वापर सुरू करता येतो.
जिओनी ही चिनी कंपनी आहे. चायनिज फोन अतिशय टुकार असतात, असा समज आपल्याकडे आहे. अतिशय खालच्या किंमत श्रेणीतील फोनबाबत हा समज खराही असू शकतो. मात्र जिओनी ईलाइफ एस ५.५ च्याबाबतीत हा समज साफ खोटा ठरतो. हाताळण्यास चांगला, दिसण्यास आकर्षक आणि कामात वेगवान असा हा फोन भारतीय बाजारात वेगळा ग्राहकवर्ग निर्माण करेल, यात शंका नाही.
 वैशिष्टय़े
* ५ इंचाचा सुपर अॅमोल्ड कॅपॅसिटिव्ह टच डिस्प्ले,गर्रीला ग्लास ३ (मागेपुढे)
* स्क्रीन रेझोल्युशन – १०८०x    १९२० पिक्सेल्स
* वजन – १३३ ग्रॅम
* आकार  – १४.५ x   ७.०२ सेमी. जाडी – ५.६ मिमी मल्टीटच
* इंटर्नल मेमरी  – १६ जीबी
* एक्स्टर्नल कार्ड  – नाही.
* एफएम रेडिओ, जीपीएस, ब्लू-टूथ, वायफाय, यूएसबी ऑन द गो सुविधा.
* कॅमेरा – मागे १३ एमपी, पुढे ५ एमपी (जिओ टॅगिंग, ऑटोफोकस, एलईडी फ्लॅश, एचडी रेकॉर्डिग)
* अँड्रॉइड जेली बिन ओएस. मात्र, किटकॅटवर अपग्रेड शक्य.
* ऑक्टा कोअर १.७ गिगाहार्ट्झ कोर्टेक्स-ए७
* डय़ुअल सिम
* बॅटरी : २३०० एमएएच (नॉन रिमूव्हेबल)
* किंमत २२५०० ते २३५०० रुपये.