14 December 2017

News Flash

स्मार्ट रिव्ह्य़ू : सोनी अल्ट्राबुक व्हायो डय़ुओ ११

भविष्यातही बाजारपेठेवर आपलेच अधिराज्य हवे असेल तर तशा योग्यतेचे उत्पादन बाजारपेठेत आणणे गरजेचे आहे,

विनायक परब-vinayak.parab@expressindia.com | Updated: February 22, 2013 12:27 PM

भविष्यातही बाजारपेठेवर आपलेच अधिराज्य हवे असेल तर तशा योग्यतेचे उत्पादन बाजारपेठेत आणणे गरजेचे आहे, अशी जाणीव असलेल्या मायक्रोसॉफ्टने म्हणूनच ‘विंडोज ८’ वर भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे विंडोज ८चे पदार्पण दीर्घकाळ लांबले होते.
आता जमाना हायब्रीड पीसीचा आहे. म्हणजेच तुम्हाला गरजेनुसार त्याचा पीसी किंवा लॅपटॉप म्हणून किंवा टॅब्लेट म्हणूनही वापर करता यायला हवा. या नव्या मालिकेला आता जोड मिळाली आहे ती नव्यानेच बाजारात आलेल्या ‘विंडोज ८’ या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टिमची. त्यामुळे अलीकडे बाजारात आलेले बहुसंख्य हायब्रीडपीसी अशाच प्रकारचे आहेत. त्यातील एक महत्त्वाच्या असलेल्या सोनीच्या अल्ट्राबुक व्हायो डय़ुओ २चा वापरानंतरचा हा रिव्ह्य़ू.
काही महिन्यांपूर्वी ‘विंडोज ८’ने जागतिक बाजारपेठेत पदार्पण केले आणि त्यानंतर बराच काळ ‘विंडोज ८’चा बोलबाला होता. अर्थात आता त्याची चर्चा होत असली तरी त्यात फारशी उत्सुकता राहिलेली नाही. आजही जगभरातील बाजारपेठेवर डेस्कटॉप किंवा ऑपरेटिंग सिस्टिम्सच्या बाबतीत िवडोजचेच साम्राज्य असले तरी आता लोक हळूहळू इतर ऑपरेटिंग सिस्टिम्सकडेही वळत आहेत, याची जाणीव मायक्रोसॉफ्टलाही आहे. त्यामुळेत भविष्यातही या बाजारपेठेवर आपलेच अधिराज्य हवे असेल तर तशा योग्यतेचे उत्पादन बाजारपेठेत आणणे गरजेचे आहे, अशी जाणीव असलेल्या मायक्रोसॉफ्टने म्हणूनच ‘विंडोज ८’ वर भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे विंडोज ८चे पदार्पण दीर्घकाळ लांबले होते.
 मायक्रोसॉफ्टचे बरेचसे भवितव्य या िवडोज ८च्या यशापयशामध्ये सामावलेले असेल. त्यामुळेच विंडोज ८ जागतिक बाजारपेठेत येताना मायक्रोसॉफ्टने अनेक प्रकारची काळजी घेतली. या काळजीमधील एक महत्त्वाचा भाग हा विविध लॅपटॉप आणि टॅब्लेटस् बाजारात आणणाऱ्या कंपन्यांशी जोडलेला होता. म्हणूनच मायक्रोसॉफ्टने काय केले की, त्यांनी बाजारपेठेतील अनेक प्रसिद्ध कंपन्यांशी करार करत त्यांच्या नव्या उत्पादनांमध्ये विंडोज ८चा समावेश असेल हे पाहिले. हे पाहण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे विंडोज ८ चालविण्यासाठी विशिष्ट प्रकारचे चांगले कॉन्फिगरेशन तुमच्या पीसीमध्ये असावे लागते. अर्थात त्यामुळ असे बरेचसे पीसी हे अद्ययावत असणे तर गरजेचे होतेच. त्यामुळे अलीक़डे नव्याने बाजारात आलेल्या अल्ट्राबुक्समध्ये आपल्याला ‘विंडोज ८’चा समावेश ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून झालेला पाहायला मिळेल. ज्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्टने बाजारात धडका मारण्यास सुरुवात केली, त्यात सोनीचाही समावेश होता.
व्हायोची भुरळ
गेल्या काही वर्षांमध्ये सोनीच्या व्हायो मालिकेतील लॅपटॉप्सनी तरुणाईला चांगलीच भुरळ घातली आहे. तरुणाईवर लक्ष केंद्रित करूनच ही मालिका बाजारपेठेत आणण्यात आली होती. त्यामुळे रंगरूप ल्यायलेले पहिले लॅपटॉप्स किंवा नोटबुक्स आपल्याला सोनीने याच मालिकेंतर्गत बाजारात आणलेले दिसतील. आता केवळ लॅपटॉपचा ट्रेंड राहिलेला नाही.
हायब्रीड पीसी
तर सध्याचा जमाना हा टॅब्लेट पीसीचा आहे. हे लक्षात घेऊनच आता सोनीने टॅब्लेट कम लॅपटॉप अशी सोय असलेले अल्ट्राबुक बाजारपेठेत आणले असून त्यात ‘विंडोज ८’चा समावेश हा ऑपरेटिंग सिस्टिम म्हणून करण्यात आला आहे.
की बोर्डची सोबत
आताचा जमाना तसा हायब्रीड पीसीचा आहे. म्हणजे त्यात तुम्हाला पाहिजे त्या वेळेस त्या पीसीचा वापर हा टॅब्लेटच म्हणून तर आवश्यकतेनुसार त्याला की बोर्ड जोडलेल्या अवस्थेत त्याचा वापर लॅपटॉप म्हणून करता येणे शक्य असते, अशी त्याची रचना केली जाते. या मध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या रचना कंपन्यांनी केल्या आहेत. त्यात खालच्या बाजूस की बोर्डचे डॉक जोडणे, पीसीची स्क्रीन मागच्या बाजूस खेचल्यानंतर त्याच्या खालूनच की बोर्ड बाहेर येणे किंवा मग स्क्रीनची फ्रेम फिरती ठेवून त्याला वेगळे रूप देणे या पद्धतींचा समावेश होता. त्यापैकी टॅब्लेट मागच्या बाजूस खेचण्याच्या पद्धतीचा वापर सोनीने या त्यांच्या नव्या व्हायो अल्ट्राबुक डय़ुओ ११ मध्ये केला आहे.
एसडी स्लॉट
त्याच्या डाव्या बाजूस एसडी कार्डासाठीचा स्लॉट देण्यात आला आहे. त्याच्या बाजूलाच इअरफोनसाठीची सुविधा देण्यात आली आहे.
एचडीएमआय पोर्ट
उजव्या बाजूस दोन यूएसबी स्लॉटची सोय देण्यात आली असून त्याला लागूनच एचडीएमआय पोर्ट देण्यात आला आहे. त्याच्या शेजारीच ऑन- ऑफचे बटन देण्यात आले आहे.
चांगले बाह्य़ावरण
 याचा स्क्रीन ११.५ इंचाचा आहे. त्याचे बाह्य़ावरण मॅग्नेशिअम संयुगापासून तयार करण्यात आले आहे. अशी दणकट अशी त्याची बांधणी असली तरी तो दिसायला तेवढाच आकर्षक आहे. काही कंपन्यांनी बाजारात आणलेले स्लाइडर्स हे प्लास्टिकचे आहेत. त्या तुलनेत मॅग्नेशिअम संयुगाचा वापर केलेले याचे बाह्य़ावरण दिसायला व वापरायलाही चांगले आहे.
चांगले रिझोल्युशन
१९२० गुणिले १०८० रिझोल्युशन १९० पीपीआय कपॅसिटीव्ह टचस्क्रीनची क्षमता चांगली आहे.
वजनाला हलका
त्याचे वजन अवघे २.८७ पौंडस अशून तो तुलनेने वजनाला अधिक नाही. व वापरण्यास आणि हाताळण्यास सोपा आहे. त्याची जाडी ०.७१ इंचाची आहे.
सांकेतिक दिवे
समोरच्या बाजूस खालती पाहिले तर उजवीकडे वायरलेस, बॅटरी चार्जिंग, बॅटरी आणि ऑन- ऑफ साठीचे सांकेतिक दिवे देण्यात आले आहेत.
चांगला आवाज
तर डावीकडे खालच्या बाजूस आवाजाची तीव्रता कमी- अधिक करण्यासाठीची दोन बटने, लॉक- अनलॉक आणि असिस्ट हे बटन देण्यात आले आहे. याला खालच्या बाजूस स्पीकर्स देण्यात आले असून ते चांगल्या क्षमतेचे आहेत.
रूपांतर सोयीचे
मागच्या बाजूस इंटरनेट जोडणीसाठीचा स्लॉट आणि चार्जिंगचा प्लग पॉइंट देण्यात आला आहे. समोरच्या बाजूस स्क्रीनवर मधोमध फ्रंट कॅमरा पाहायला मिळतो. त्याच्या खालच्या बाजू बोट धरून हा स्क्रीन वरती उचलला की, मग त्या टॅब्लेटचे रूपांतर अल्ट्राबुक अर्थात लॅपटॉपमध्ये होते. ही रचना वापरतानाही सोयीचीच असल्याचे हाताळणीदरम्यान लक्षात आले.
२.४ मेगापिक्सेल
टॅबलेट रूपात असताना मागच्या बाजूसही एक कॅमेरा देण्यात आला आहे. मात्र हा कॅमेरा थोम्डा उजव्या बाजूस आहे. यासाठी वापरण्यात आलेले दोन्ही कॅमेरे हे २.४ मेगापिक्सेलचे आहेत.
विंडोज आठ
हा टचस्क्रीन आहे. यात तुम्हाला विंडोज आठ किंवा डेस्कटॉप असे दोन्ही मोडस् देण्यात आले आहेत. टचस्क्रीनचा वापर करून स्क्रीनवरच उपलब्ध की बोर्डचा वापरही करता येऊ शकेल. शिवाय स्क्रीनवरच एक विंडोज आठ साठीचे बटन देण्यात आला आहे. या शॉर्टकट बटनाचा वापर करून तुम्ही थेट विंडोज आठ वर जाऊ शकता.
यूजर इंटरफेस
िवडोज आठवर यापूर्वी दोन वेळा सलग लिखाण प्रसिद्ध झालेले असल्यामुळे िवडोज आठची उपयुक्तता आणि त्याचा इंटरफेस याबद्दल इथे लिहिणे टाळणे अधिक श्रेयस्कर असेल. त्यासाठी यापूर्वीच्या लेखांचा संदर्भ घ्यावा. िवडोज आठ गेश्चर्सवर काम करते. त्यामुळे स्पर्श आणि गेश्चर्स इथे महत्त्वाचे ठरतात. उजवीकडून डावीकडे असे करत बोट उजव्याकडेने फिरवल्यास तुम्ही ओपन केलेल्या िवडोज समोर येतात. यात तुम्हाला मल्टिटास्किंगचा चांगला अनुभव घेता येईल.
गेश्चर्स व रचना
 तर डावीकडच्या बाजूने तुम्ही उजव्या दिशेने बोट फिरवलेत तर तुम्हाला सर्च, शेअर, डिव्हायसेस आणि सेटिंग्ज असे पर्याय दिसतात. या सेटिंगमधूनच लॅपटॉप ऑन- ऑफ करण्याचा पर्याय (पूर्णपणे बंद करण्याचा पर्याय) आहे. अनेकांना सुरुवातीस असे वाटते की, उजव्या बाजूस दिलेले बटन दाबले की, तो बंद होतो. पण तसे होत नाही. तो स्लीप मोडमध्ये जातो. तो पूर्ण बंद करण्यासाठी सेटिंग्जमधून बंद करावा लागतो. सुरू असलेला प्रोग्रॅम बंद करण्यासाठी बोट वरून पूर्णपणे खालपर्यंत न्यावे लागते. भरपूर अ‍ॅप्सची सोय सोनीने यामध्ये दिली आहे.
प्रोसेसर
या अल्ट्राबुकच्या दृष्टिने महत्त्वाचे घटक म्हणजे हे अल्ट्राबुक आय५ आणि आय७ या दोन्ही क्षमतांच्या प्रोसेसरमध्ये उपलब्ध आहे. अर्थात आयव्ही ब्रिजच्या वापरामुळे त्याचा वेग अधिक चांगला आहे.
चांगले कॉन्फिगरेशन
सीपीयूचा वेग १.७ गिगाहर्टझ् असून ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी एसएसडी वापरण्यात आली आहे. शिवाय त्याला इंटेल एचडी ४००० ग्राफिक्सची जोड देण्यात आली आहे. बूट अप वेळ केवळ १० सेंकंदांचा असल्याचे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले.
ट्रॅकबॉल जिकिरीचा
की पॅडवरच्या बटनांचा आकार आणि त्यातील मोकळी जागा तशी कमी आहे. त्यामुळे त्याची सवय होईपर्यंत अक्षरे चुकू शकतात. यात जी आणि एच या दोन अक्षरांच्या मध्ये एक ट्रॅकबॉल देण्यात आला आहे. त्याचा वापर माऊसप्रमाणे करता येऊ शकतो. पण त्यावरून गोष्टी ट्रॅक करणे जिकिरीचे ठरू शकते. त्यामुळेच त्याऐवजी ट्रॅकपॅड असते, तर अधिक चांगले ठरले असते. खालच्या बाजूस मात्र स्पेसबारच्या खाली राईट व लेफ्ट क्लिक् ची बटने दिली आहेत.
निष्कर्ष
याची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे पावणे पाच तास सलग काम करण्याची क्षमता राखते, असा कंपनीचा दावा असून तो बहुतांश खरा असल्याचे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले. लॅपटॉप किंवा टॅब्लेटच्या बाबतीतील त्याची सर्वात महत्त्वाची बाब म्हणून कुलिंग सिस्टिम. व्हायोच्या या डय़ुओ ११ अल्ट्राबुकची कुलिंग सिस्टिम चांगले काम करते. याच्या वायरलेस कनेक्टिविटीसाठी वापरलेले वायरलेस गिगाबाईट इथरनेट अतिशय फायद्याचे आहे.
खिशात पैसे असतील तर हे अल्ट्राबुक घेणे हा फायद्याचा सौदा आहे.
भारतीय बाजारपेटेतील किंमत : रु. ८९,९९९/-

First Published on February 22, 2013 12:27 pm

Web Title: sony ultrabook vaio duo 11