सध्या जमाना टच स्क्रीनचा आहे. आज जवळपास प्रत्येक हातात टच स्क्रीनचा स्मार्टफोन किंवा टॅब्लेट दिसत असतो.  टच स्क्रीन स्मार्टफोन किंवा टॅब्लेटचे फायदे अनेक असले तरी त्यावरून टायिपग करणे ही सर्वात मोठी कसरत असते. स्क्रीन छोटी असेल तर त्यावर व्यवस्थित टायिपग करणं शक्यच नसतं. आणि मोठी स्क्रीन असेल तरी त्यावर खऱ्याखुऱ्या कीबोर्डप्रमाणे सराईतपणे काम करता येत नाही. अशी अडचण विशेषत: प्रवासादरम्यान अधिक उद्भवते. यावर उपाय म्हणून आता छोटेखानी पोर्टेबल कीबोर्ड बाजारात उपलब्ध झाले आहेत. याच श्रेणीत ‘टॅबमेट’ या ब्लू टुथ कीबोर्डचा समावेश करता येईल. २०६ ७ ८२ मिमी आकाराचा आणि अवघी सात मिमी जाडी असलेला हा टॅबमेट टॅब किंवा स्मार्टफोनचा खराखुरा जोडीदार म्हणावा लागेल. सर्वसामान्य कीबोर्डच्या तुलनेत जवळपास ४० टक्के आकार असलेला टॅबमेट ब्लू टुथने कनेक्ट करता येतो. या कीबोर्डवर सर्व अक्षरे व अंकांसह फंक्शनची बटणे असून त्यावर स्मार्टफोन किंवा टॅबवरील गाणी चालू करणे, आवाज कमी जास्त करणे, मेसेज पाठवणे, सर्च करणे, होम स्क्रीन ओपन करणे आदींसाठी शॉर्टकट देण्यात आले आहेत. मात्र, यावर मेनू ओपन करण्याचे बटण दिसत नाही, ही त्यातली एक उणी बाजू म्हणता येईल. टॅबमेट अतिशय सहजपणे कोणत्याही स्मार्टफोन वा टॅबशी कनेक्ट होतो. आकाराने छोटा असला तरी यावरील बटणांना व्यवस्थित आकार असल्याने वेगाने टायिपग करताना चुकीचे बटण दाबले जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच यावर टायिपग करताना बटणांचा होणारा आवाज अतिशय कमी आहे. टॅबमेट वजनाने थोडासा जड वाटत असला तरी मजबूत बाह्य़भाग हे त्याचे एक कारण आहे. हा कीबोर्ड यूएसबी चार्जर लावून चार्ज करता येतो. काळय़ा आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेल्या टॅबमेटची किंमत १३५० रुपये इतकी आहे.