आयआयटी मुंबईत जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात रंगणारा टेकफेस्ट म्हणजे तंत्रप्रेमींसाठी पर्वणीच असते. या तंत्रमांदियाळीत विद्यार्थ्यांनी साकारलेले विविध तंत्राविष्कार पाहवयास मिळतात. या वर्षीच्या तंत्र महोत्सवातील प्रदर्शनामध्ये जगभरातील विविध ठिकाणच्या संशोधकांनी सादर केलेल्या कल्पनाविष्काराने सारेच भारावून गेले. यामध्ये सर्वाधिक आकर्षणाचा विषय होता तो बायोनिक हाताचा. सध्याच्या कृत्रिम हाताला पर्याय म्हणून याकडे पाहिले जात आहे. हा बायोनिक हात रोबो तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित करण्यात आला असून तो खऱ्याखुऱ्या हाताप्रमाणे काम करू शकतो. फ्रान्सचे निकोलस हुकेट आणि गेल लँगविन यांनी हा हात विकसित केला आहे. निकोलस स्वत: हाताने अपंग असल्याने हात नसलेल्या माणसाला काय अडचणी येऊ शकतात हे तो जाणतो. बाजारात उपलब्ध असलेल्या कृत्रिम हाताच्या वापरावर अनेक मर्यादा असून या मर्यादांपलीकडे जाऊन काही तरी करावे, यातून त्यांचा हा अभ्यास सुरू झाला आणि बायोनिक हात विकसित झाला. हा हात थ्रीडी प्रिंटरच्या साहय्याने विकसित करण्यात आला आहे. हा हात बनविण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला. आर्थिकदृष्टय़ाही हा हात अगदी परवडणारा असून याची किंमत ३०० डॉलर्स इतकी आहे. यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कृत्रिम हातांमध्ये सर्वाधिक परवडणारा हा हात असल्याचे आपण म्हणू शकतो.
याशिवाय दुसरा आकर्षक प्रयोग होता तो म्हणजे मार्टिन मेलन याने विकसित केलेल्या माशासारख्या रोबोची. कटलफिश या माशाच्या प्रजातीपासून प्रेरणा घेऊन हा पाण्याखाली चालणारा रोबो विकसित करण्यात आला होता. या रोबोचा वापर खोल पाण्यातील शोधकार्यासाठी केला जाऊ शकतो. याशिवाय संरक्षण खात्याच्या विविध विभागांनी मांडलेल्या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सोमय्या महाविद्यालयाच्या रीडल या संस्थेत विकसित करण्यात आलेल्या ऑटोमॅटिक बुद्धिबळ पटानेही सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. या पटावर आपण कोणती चाल खेळलो याची माहिती आपल्याला आवाजाच्या माध्यमातून समजू शकते. यामुळे हा बुद्धिबळ पट अंधांसाठी उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय लहान विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या विविध रोबोटिक्स संकल्पनांनीही सर्वाचे लक्ष वेधले. यामध्ये आयुष शाह आणि अर्मान शेठ या दोन विद्यार्थ्यांनी अंतराळवीराला पृथ्वीवरील आपल्या परिवाराशी खेळता येईल अशा खेळाची संकल्पना मांडली आहे. यामध्ये फुल्ली-गोळा या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध कल्पनाविष्काराचे प्रदर्शनही या वेळी पाहायला मिळाले.