लहान मुले मोबाइलशी खेळण्यात पूर्ण वेळ घालवतात, अशी तक्रार अनेक कुटुंबातून होत असते. यावर उपाय म्हणून अनेक पालक त्यांना मोबाइल देत नाहीत. त्यांच्यापासून ते लपवून ठेवतात. पण यातून आपण त्या मुलांच्या उत्सुकतेला रोखत असतो. यामुळेच मुलांना त्यांच्यासाठी खास तयार करण्यात आलेले टॅब्ज जर दिलेत तर यातून त्यांची तंत्रज्ञान वापरण्याची उत्सुकता पूर्ण होईलच, याशिवाय त्याच्या मदतीने ते विविध गोष्टी शिकूही शकतील. सध्या बाजारात लहान मुलांसाठी उपयुक्त असे काही टॅब्ज उपलब्ध आहेत. अशा टॅब्ज्विषयी जाणून घेऊ या.

एचसीएल मी चॅम्प
एचसीएल या कंपनीने अँड्रॉइड ४.१ जेलीबीन या ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित सात इंचांचा मल्टिटच डिस्प्ले असलेला खास लहान मुलांसाठीचा टॅबलेट बाजारात आणला आहे. याचे स्क्रीन रिझोल्युशन हे ८०० बाय ४८० पिक्सेल इतके आहे. यामध्ये १ गीगाहर्ट्झ कोरटेक्स ए९ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. या टॅबला दोन मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सेलचा आहे. टॅबला वायफाय, ब्ल्यूटुथ, मिनी एचडीएमआय आणि थ्रीजी कनेक्टिविटी डोंगलच्या साह्य़ाने उपलब्ध आहे. याची बॅटरी क्षमता ३१०० एमएएच असून यात इंटर्नल मेमरी आठ जीबी तर एक्स्पाण्डेबल मेमरी ३२ जीबी देण्यात आली आहे. यामध्ये लहान मुलांसाठीचे खास गेम्स, शैक्षणिक गेम्स, पुस्तके आणि टीव्हीचा समावेश आहे. यात प्रामुख्याने कला, भूगोल, इतिहास, भाषा आणि गणित या विषयांचा अभ्यासही मुलांना करता येणार आहे. याशिवाय यामध्ये ५०० पेक्षा जास्त शैक्षणिक अ‍ॅप्स देण्यात आली आहेत. या टॅबमध्ये मुलं नेमके काय करतात हे पालकांना पाहण्याची सुविधाही देण्यात आली आहे.
किंमत – ७९९९ रुपये.

लीपपॅड २
लीपफ्रॉग्स या कंपनीने लीपपॅड बाजारात आणले आहेत. लीप पॅड२ हा पाच इंचांचा टचस्क्रीन डिस्प्ले असलेला टॅब आहे. यामध्ये स्टायलस देण्यात आला आहे. ३ ते ९ वयोवर्षांतील मुलांसाठी हा टॅब तयार करण्यात आला आहे. यामध्ये फ्रंट आणि बॅक दोन्ही कॅमेरे देण्यात आले आहेत. याशिवाय म्युझिक प्लेअरही देण्यात आला आहे. यात एलएफ २००० प्रोसेसर वापरण्यात आल्याने इतरांच्या तुलनेत याचा वेग जास्त आहे. या उपकरणात लहान मुलांना उपयुक्त असे अ‍ॅप्स डाऊनलोड करून देण्यात आली आहेत. यात इंटर्नल मेमरी चार जीबी देण्यात आली आहे. सलग नऊ तास वापरता येईल एवढी बॅटरी क्षमता आहे. या टॅबमध्ये गेम्स, ई-बुक्स देण्यात आली आहे. याशिवाय लहान मुलांसाठी उपयुक्त अशा ३०० शब्दांचा संग्रहही यामध्ये आहे. मुलांच्या फोनिक आणि डीकोिडग कौशल्यांना उपयुक्त असे गेम्स यामध्ये आहेत. याशिवाय शब्द ओळखणे, वाचन करणे अशा अभ्यासाचाही यात समावेश आहे.
तर याच कंपनीचा लर्न टू राइट विथ मि. पेन्सिल हा ३ ते ६ वष्रे वयोगटातील मुलांसाठीचा टॅबही बाजारात उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात आर्ट स्टुडिओ असून यामध्ये विविध इफेक्ट्सच्या माध्यमातून मुलांना त्यांची कला विकसित करता येते. हा टॅब लिखाण, मूलभूत चित्रकला, अक्षरं, क्रमांक आणि आकार आदी गोष्टी लहान मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवितो. यामध्ये स्टायलस देण्यात आला असून लीपफ्रॉग्सची खासियत असलेली आणि लहानग्यांची लोकप्रिय मि. पेन्सिलही देण्यात येते; ज्याच्या माध्यमातून मुलं लिखाण तसेच चित्रकला करू शकतात. याशिवाय टॅबमध्ये ८५हून अधिक लिखाणाचे स्वाध्याय देण्यात आले आहेत. हा टॅबही पालक पूर्णपणे नियंत्रित करू शकतात.
किंमत – लीपपॅड २ – ११९९९ रुपये. तर विथ मि. पेन्सिल – १७९९९ रुपये.

बिनाटोन अ‍ॅप स्टार
खास लहान मुलांसाठी तयार करण्यात आलेला हा टॅब सात इंच स्क्रीनचा असून यामध्ये टच पेन देण्यात आले आहे. हा टॅब अँड्रॉइड ४.१ जेलीबीन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. या टॅबमध्ये १ गीगाहर्ट्झचा कोरटेक्स ए८ प्रोसेसर वापरण्यात आला आहे. त्याच्या जोडीला ५१२ एमबी रॅम आणि चार जीबी इंटर्नल स्टोअरेज देण्यात आले आहे. यामध्ये आपण मेमरी १६ जीबीपर्यंत एक्स्पाण्डही करू शकतो. सलग चार तास वापरता येईल एवढी याची बॅटरी क्षमता आहे. हा टॅब लहान मुलांबरोबरच पालकही वापरू शकतात. या टॅबवर पालकांचे संपूर्ण नियंत्रण ठेवता येते. यात शैक्षणिक अ‍ॅप्स, गेम्स, आर्ट स्टुडिओ, ई-बुक्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर २५० मोफत अ‍ॅप्सही देण्यात आले आहेत.
किंमत – ९९९९ रुपये.

सॅमसंग गॅलेक्सी टॅब ३ किड्स
सॅमसंगने लहान मुलांसाठी सात इंचांचा डब्लूएसव्हीजीए टचस्क्रीन डिस्प्ले आणि १०२४ बाय ६०० पिक्सेल रिझाल्यूशन असलेला लहान मुलांसाठीचा खास टॅब बाजारात आणला आहे. यामध्ये १.२ गीगाहर्ट्झ डय़ुएल कोर प्रोसेसर एक जीबी रॅमसह देण्यात आला आहे.  हा टॅब अँड्रॉइड ४.१ जेलीबीन या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. यामध्ये मुख्य कॅमेरा तीन मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे, तर फ्रंट कॅमेरा १.३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. याला वायफाय, ब्लूटुथ आणि मायक्रो यूएसबी कनेक्टिविटी देण्यात आली आहे. यात आठ जीबीची इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे, तर मेमरी कार्डच्या साह्य़ाने आपण ही मेमरी ३२ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यामध्ये ४००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या टॅबमध्ये लहान मुलांसाठीचे अ‍ॅप्स इनबिल्ट देण्यात आले आहेत. तर यामध्ये कंपनीचे किड्स स्टोअरही देण्यात आले आहे. यात अ‍ॅप्लिकेशन मॅनेजर देण्यात आले असून या माध्यमातून पालक मुलांना वापरण्यासाठीचे अ‍ॅप्स आणि वेळ दोन्ही सेट करून ठेवू शकतात.
किंमत – २०००० रुपये.

स्वाइप ज्युनिअर
स्वाइप टेलिकॉम कंपनीने लहान मुलांसाठी सर्वप्रथम एक किड्स टॅब बाजारात आणला. हा टॅब सात इंचांचा असून त्याला पाच पॉइंटचा मल्टिटच डिस्प्ले आहे. त्याचे रिझोल्यूशन १०२४ बाय ६०० पिक्सेल इतके आहे. हा टॅब अँड्रॉइड ४.१.२ जेलीबीन ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये १ गीगाहर्ट्झचा प्रोसेसर असून ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटर्नल स्टोअरेज असून यात आपण ३२ जीबीपर्यंतचे एक्स्टर्नल मेमरी कार्ड वापरू शकतो. या टॅबला दोन मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असून फ्रंट कॅमेरा ०.३ मेगापिक्सेलचा आहे. टॅबला वायफाय आणि थ्रीजी कनेक्टिविटी उपलब्ध असून यामध्ये ३ हजार एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. या टॅबला शॉकप्रूफ कोटिंग करण्यात आले असून लहान मुलांना वापरण्याच्या दृष्टीने ते एकदम सुरक्षित आहेत. यामध्ये खूप सारे शैक्षणिक अ‍ॅप्स देण्यात आले असून पालक मुलांनी टॅबमधील कोणत्या गोष्टी वापरायच्या हे ठरवू शकणार आहेत. तसेच याला टाइम कंट्रोल सुविधा असून अमुक एका वेळेनंतर टॅब आपोआप बंद होऊ शकतो.
किंमत – ५९९० रुपये.