कृष्णधवल टीव्हीपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंतचा प्रवास दूरदर्शन संचाने केला आहे. या सर्वामध्ये एक गोष्ट अगदी नियमित असायची ती म्हणजे अँटेना. पूर्वी गच्चीतील अँटेनाची जागा कालांतराने मोठय़ा डिशने घेतली आणि घराघरांतील अँटेना जाऊन केबल आले. यानंतर गेल्या दोन वर्षांपासून घराघरांत सेट टॉप बॉक्स बसविले जाऊ लागले. यामुळे टीव्हीसोबत सेट टॉप बॉक्सलाही वेगळी जागा द्यावी लागते. आता मात्र लवकरच ही वेगळी जागा द्यायची गरज भासणार नाही, कारण आता आयडीटीव्ही बाजारात दाखल झाला आहे.

दूरदर्शन संचाने मानवी जीवनात क्रांती घडविली. पुढे यामध्ये तंत्रज्ञानाच्या आधारे प्रगती करत आता विविध प्रकारांचे दूरदर्शन संच आपल्याला उपलब्ध झाले आहेत. अगदी थ्रीडी टीव्हीपासून ते स्मार्ट टीव्हीपर्यंतचे पर्यायही आपल्याला उपलब्ध आहेत. या सर्वाला आपल्याला डायरेक्ट टू होम सेवा किंवा केबलने जोडणी केल्याशिवाय आपण विविध वाहिन्या पाहू शकत नाही. या सर्वाबरोबर आपल्याला एक सेट टॉप बॉक्सही वापरावा लागतो. या सेट टॉप बॉक्सला आजपर्यंत पर्याय उपलब्ध नव्हता, मात्र आता आपल्याला सेट टॉप बॉक्स टीव्हीच्या बाजूला वेगळा ठेवायची गरज भासणार नाही, कारण आयडीटीव्ही बाजारात आला आहे. या टीव्हीमध्ये इनबिल्ट सेट टॉप बॉक्स देण्यात आला आहे. म्हणूनच याला ‘इंटीग्रेटेड डिजिटल टेलिव्हिजन’ अर्थात आयडीटीव्ही असे म्हटले जाते. भारतात नुकताच एअरटेल आणि सॅमसंग या दोन्ही कंपन्यांनी एकत्र येऊन आयडीटीव्ही बाजारात आणला आहे. भविष्यात डीटीएच सेवा पुरविणाऱ्या आणि टीव्ही कंपन्या एकत्र येऊन आणखी आयडीटीव्ही बाजारात आणण्याची शक्यता आहे.
काय आहे आयडीटीव्ही
सेट टॉप बॉक्स आणि वायरच्या जंजाळापासून मुक्त करण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून याबाबत आधुनिक संशोधन सुरू होते. या संशोधनाच्या यशानंतर असे लक्षात आले की, टीव्हीमध्येच एका विशिष्ट चिपच्या साह्य़ाने सेट टॉप बॉक्स बसविला जाऊ शकतो. यामध्ये सॅमसंगने पुढाकार घेऊन भारती एअरटेल कंपनीच्या डीटीएच सेवेशी सहकार्य करून ही सेवा असलेला नवा आयडीटीव्ही बाजारात आणला आहे. दिवाळीच्या पूर्वी हा टीव्ही भारतीय बाजारातही दाखल झाला आहे. या टीव्हीमुळे टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स यांतील जोडणीची समस्या सुटून चांगले सिग्नल्स मिळू शकतात, असा दावाही कंपनीने केला आहे. या तंत्रज्ञानामुळे आपल्याला टीव्हीवर दिसणाऱ्या चित्रांचा आणि त्याच्या आवाजाचा दर्जाही सुधारतो, असा दावाही कंपनीतर्फे करण्यात आला आहे. अनेकदा आपला टीव्ही एचडी असतो; पण एचडी वाहिन्या पाहण्यासाठी आपल्याला वेगळा एचडी सेट टॉप बॉक्स विकत घ्यावा लागतो; पण आयडीटीव्हीमध्ये आपल्याला थेट एचडी सेट टॉप बॉक्सची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे आपल्याला एचडी वाहिन्या पाहण्याची चांगली सुविधा मिळू शकते. सध्या बाजारात सॅमसंग आणि एअरटेलने एकमेकांच्या सहकार्याने आयडीटीव्ही बाजारात आणला आहे. याची किंमत ४४,९०० रुपये इतकी आहे.
यावर सुरुवातीचे चार महिने एअरटेल डीटीएचची सेवा मोफत मिळणार आहे.

घरबसल्या चांगल्या दर्जाचे चित्र पाहता यावे यासाठी हा टीव्ही खूप योग्य ठरेल. टीव्ही क्षेत्रात सॅमसंगने नवनवीन शोध केलेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयडीटीव्हीचे संशोधन झाले. हा एचडीटीव्ही असून यातील स्मार्ट कार्डही एचडी सर्पोटेड असल्यामुळे एचडीसाठी वेगळी यंत्रणा करण्याची गरज नाही.
– रंजीवजित सिंग,
मुख्य विपणन अधिकारी, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स

एअरटेल नेहमीच नावीन्याच्या शोधात असते. आपल्या ग्राहकांना चांगल्या दर्जाची सुविधा देण्याच्या उद्देशाने हे नवीन पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळेच सॅमसंगच्या सहकार्याने आयडीटीव्ही बाजारात आणला आहे. या माध्यमातून भारतीयांना टीव्ही पाहताना आणखी चांगल्या दर्जाची सेवा मिळू शकणार आहे. यात नव्याने वापरण्यात आलेल्या स्मार्ट कार्डमुळे डिशकडून थेट टीव्हीलाच सिग्नल पोहोचणार आहे.
– शशी अरोरा, सीईओ,
डीटीएच आणि मीडिया, भारती एअरटेल