13 December 2017

News Flash

टचस्मार्ट डेस्कटॉप एचपी एन्व्ही २३- ऑल इन वन

आताच्या जमान्यात केवळ लॅपटॉप अल्ट्रास्मार्ट झाले आहेत, असे नव्हे तर आता डेस्कटॉपही टचस्मार्ट झाले

Updated: December 3, 2012 10:51 AM

आताच्या जमान्यात केवळ लॅपटॉप अल्ट्रास्मार्ट झाले आहेत, असे नव्हे तर आता डेस्कटॉपही टचस्मार्ट झाले आहे. स्मार्टनेसचा स्पर्श तर आता प्रत्येक उपकरणाला झालेला दिसतो. मग त्यात हे डेस्कटॉप मागे कसे बरे राहतील? लॅपटॉप किंवा अल्ट्राबुक हे कितीही चांगले असले आणि आपल्याला आवडले तरी आजही डेस्कटॉपची जागा त्यांनी घेतलेली नाही. खात्रीशीर उपकरण म्हणून आजही घराघरांत डेस्कटॉपला पर्याय नाही, अशीच स्थिती आहे. सध्याचा पहिला बदल म्हणजे हे डेस्कटॉप आता टचस्मार्ट झाले आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे ते इंटिग्रेटेड आहे. म्हणजे पूर्वी संगणक खास करून डेस्कटॉप म्हटला की, वायर्सचे जंजाळ असे समीकरण ठरलेले असायचे. आता हा डेस्कटॉप वायरलेस झाला आहे. त्यामुळे समोर की बोर्ड किंवा माऊस असला तरी त्याच्या वायर्स आपल्याला दिसत नाहीत. तो अतिशय सुटसुटीत वाटतो.
इंटिग्रेटेड मशीन
आजवर डेस्कटॉप म्हणजे खालच्या बाजूस ठेवलेला मोठय़ा आकाराचा सीपीयू असे समीकरण होते. आता गेल्या वर्षभरात या समीकरणालाही छेद देण्यामध्ये कंपन्यांना यश आले आहे. त्यातही एचपी ही कंपनी आघाडीवर आहे. त्यांनी डेस्कटॉपला सर्वाधिक स्मार्ट केले आहे, असे विधान केले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यांच्या मॉनिटरच्या मागच्या बाजूस सारे काही इंटिग्रेटेड रूपात आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे सीपीयू वेगळा असण्याची भानगड राहिलेली नाही.
थर्ड जनरेशन प्रोसेसर
एचपीच्या या एनव्ही २३ टचस्मार्टमध्ये थर्ड जनरेशन इंटेल कोअर आय फाइव्ह- ३४७० एस हा क्वाड कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तो २.९ गिगाहर्ट्झ या वेगात काम करतो आणि त्याचा वेग ३.६ पर्यंत वाढण्याची त्याची क्षमता आहे. त्यासाठी एचपीने तब्बल २३ इंची पूर्णपणे फ्लश काच असलेला मॉनिटर स्क्रीन दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा टचस्मार्ट असा स्क्रीन आहे. १० पॉइंट टचस्क्रीनची त्याची क्षमता आहे. पूर्णपणे टचस्क्रीन अनुभव देण्यासाठी त्याचा की बोर्ड मशीनच्या खालच्या बाजूस व्यवस्थित राहील, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
एचडी वेबकॅम
बीट्स ऑडिओसह असलेले स्पीकर्स हे या नव्या डेस्कटॉपचे वैशिष्टय़ तर आहेच, पण त्याचबरोबर यात एचडी वेबकॅम आणि मायक्रोफोनही सोबत देण्यात आला आहे. आताशा लोकांना भरपूर साठवणूक क्षमता हवी असते. ५०० जीबी ही आता जुनी कल्पना झाली असून आता एक टेराबाईट हे स्टँडर्ड म्हणून स्थिरावू पाहते आहे. या नव्या डेस्कटॉपची क्षमतादेखील १ टेराबाइटचीच आहे. शिवाय सोबत ४ जीबी रॅम, एनव्हीडिआ जीफोर्स ग्राफिक कार्ड हेही आहेच.
विंडोज ८
आता यापुढे आपल्याला अद्ययावत असे मशीन घ्यायचे तर त्यासोबत िवडोज आठ असणे हे अनिवार्य आहे. िवडोज आठ म्हणजे अद्ययावतता, असेच नवे समीकरण असणार आहे. या विंडोज आठसाठी तुमचे मशीनही चांगल्या क्षमतेचे असणे गरजेचे आहे. एचपीच्या या नव्या एन्व्ही २३ मध्ये ही अद्ययावतता पूर्णपणे भरलेली आहे. त्यामुळे यासोबत येणारी ऑपरेटिंग सिस्टीमही असणार आहे, िवडोज आठ. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगातील अद्ययावततेचा अनुभव या मशीनवर घेता येईल.
एचपीने अद्याप भारतात याची अधिकृत घोषणा केलेली नसल्याने त्याची किंमतही नेमकी उपलब्ध नाही. मात्र बाजारपेठेतील सूत्रांनुसार याची किंमत ही ५० हजार रुपयांच्या पुढेच असेल. ती रु. ५५  हजार असण्याची शक्यता अनेकांना वाटते आहे.
विनायक परब
vinayak.parab@expressindia.com

First Published on December 3, 2012 10:51 am

Web Title: touch smart destop hp nv 23all in one