आसूस व्हिवाबुक एस५५०
सुमारे वर्षभरापूर्वी अल्ट्राबुकचा नवा ट्रेंड सुरू झाला. मात्र अगदी अलीकडेपर्यंत या अल्ट्राबुकची किंमत ही तशी सामान्यांच्या आवाक्यात नव्हती. कारण ती ८५ हजारांच्या पुढेच सुरू होत होती. मात्र जगभरात सर्वत्र त्याहीपेक्षा कमी किंमतीची अशी एक बाजारपेठ सर्वत्रच अस्तित्त्वात असते. त्यांना सोयी अल्ट्राबुकच्या आणि किंमत लॅपटॉपपेक्षा थोडी महाग चालू शकते. काही कंपन्यांनी आता हेच नेमके ध्यानात घेऊन त्यांची अल्ट्राबुक्स बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता आसूसने आघाडी घेतली आहे. त्यांनी आता त्यांचे व्हिवा एस५५० हे अल्ट्राबुक बाजारात आणले आहे.
एचडी डिस्प्ले
याचे वैशिष्टय़ म्हणजे १५.६ इंचाचा एचडी डिस्प्ले. यात आसूसमे त्यांच्या सुपर हायब्रीड इंजिन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे केवळ दोन सेकंदात ते सु रू होते.
ऑप्टिकल ड्राइव्ह
आताशा अनेक लॅपटॉप्स, नोटबुक्स आणि अल्ट्राबुक्समधून ऑप्टिकल ड्राइव्हची सुट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यात डीव्हीडी ड्राइव्ह आदी काही पाहायला मिळत नाही. किंबहुना त्यामुळेच त्याची जाडी आणि वजन कमी करण्यात कंपनीला यश येते. मात्र आजही या ऑप्टिकल ड्राइव्हची गरज पूर्णपणे बाद झालेली नाही, हे लक्षात घेऊनच आता आसूसने या अल्ट्राबुकमध्ये ऑप्टिकल ड्राइव्हची सोय तशीच ठेवली आहे. त्यात तडजोड केलेली नाही.
चांगले स्पीकर्स
या अल्ट्राबुकला चांगल्या स्पीकर्सची जोड कंपनीने दिली आहे. यात चांगले स्पीकर्स, रेझोनन्स चेम्बर्स, आसूस ऑडिओ विझार्ड यांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे सुश्राव्यतेमध्ये चांगला फरक जाणवतो. याशिवाय कंपनीने ग्राहकांना ३२ जीबी क्लाऊड सेवेची सुविधाही देऊ केली आहे.
भारतीय बाजारपेटेतील किंमत : रु. ५७,९९९/-

भारतीयांसाठी सॅमसंगचा बहुभाषक बजेट फोन
सॅमसंग या विख्यात कंपनीने आता केवळ भारतीयांसाठी विकसित केलेला असा बजेट फोन बाजारात आणला आहे. सॅमसंग रेक्स ९० हे त्या मॉडेलचे नाव आहे. याला ३.५ कपॅसिटीव्ह डिस्प्ले स्क्रीन देण्यात आला आहे.
डय़ुएल सिम
हा डय़ुएल सिम सुविधा असलेला फोन असून त्यासाठी ट्रु हॉट स्वॉप तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही सिम कार्डाचा वापर करणे सोपे जाते. वाय- फायच्या मदतीने यामध्ये इंटरनेटची सुविधा वापरता येईल.
३.२ मेगापिक्सेल
यामध्ये ३.२ मेगापिक्सेल कॅमेरा वापरण्यात आला असून त्याशिवाय त्याला मायमूव्हीज, मायमोबाईल टीव्ही आणि मायस्टेशन या प्रीलोडेड अ‍ॅप्सची जोड देण्यात आली आहे.
बहुभाषक फोन
खास भारतीयांसाठी विकसित करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये ११ भारतीय भाषांचा वापर करण्यात आला आहे. याची बॅटरी क्षमता तब्बल १५ तासांची असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६,४९०/-