सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात दिवसागणिक नवनवीन तंत्रकल्पना तयार होत असतात. या तंत्रकल्पनांमुळे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टी सहजसोप्या होत चालल्या आहेत. मात्र, दररोज निर्माण होणारे प्रत्येक तंत्रज्ञान दीर्घकाळ उपयुक्त ठरतेच, असे नाही. कधीकधी तर असे नवीन तंत्रज्ञान येताच लोप पावते. दिवसागणिक येणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानांपैकी मोजक्याच तंत्रज्ञानांमध्ये, त्यावरील आधारित उत्पादनांमध्ये लोकप्रिय आणि अत्यावश्यक बनण्याची क्षमता असते. २०१५ हे सध्याचे वर्ष गाजवणाऱ्या अशाच काही तंत्रज्ञानांविषयी.

फिटनेस सेन्सरचा बोलबाला
34स्मार्टफोनपेक्षाही स्मार्ट होत गॅझेट्सनी माणसांच्या अंगाखांद्यावर खेळायला सुरुवात केल्यापासून फिटनेस अर्थात प्रकृतीशी संबंधित ‘स्मार्ट’ उपकरणांविषयीची क्रेझ वाढत चालली आहे. फिटबीट, जॉबोन यांसारख्या कंपन्यांनी विकसित केलेले फिटनेसशी संबंधित उपकरणे हजारोनी खपत आहेत, तर दुसरीकडे सॅमसंग, अ‍ॅपल यांसारख्या कंपन्याही या शर्यतीत उतरण्याची तयारी करत आहेत. त्यामुळे २०१५ या वर्षांत फिटनेसशी संबंधित अनेक उपकरणे आपल्याला बाजारात पाहायला मिळतील. त्याचबरोबर बाजारात नव्याने येणाऱ्या मोबाइलमध्ये कॅलरीज मोजणारे, हृदयाच्या ठोक्यांची नोंदणी करणारे किंवा यूव्ही सेन्सर अशा अ‍ॅपचीही गर्दी झालेली दिसणार आहे.

क्वाड एचडी आणि फोर के
36एचडीने खऱ्या अर्थाने जगाला हाय डेफिनेशन करून टाकलं. मात्र, म्हणता म्हणता एचडीची जागा अल्ट्रा एचडीने घेतली आणि एचडी क्वाड एचडी बनून स्मार्टफोनमध्ये विराजमान झाला. गेल्या वर्षी मोटोरोला ड्रॉइड टबरे आणि सॅमसंग गॅलक्सी नोट ४ यामध्ये क्वाड एचडी डिस्प्ले पाहायला मिळाला.
हाच ट्रेंड उच्च किंमत श्रेणीतील टॅब्लेटमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यातच टीव्हीच्या दुनियेत ‘फोर के’ प्रकाराने हातपाय पसरवायला सुरुवात केली असल्याने कंपन्यांची नजर आता त्या तंत्रज्ञानाकडे वळल्यास नवल वाटू नये.

स्मार्ट फोनमध्ये ‘स्लो मोशन’ व्हिडीओ
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यांनी मेगापिक्सेलच्या बाबतीत आकडय़ांची चढण कायम ठेवली असतानाच कॅमेऱ्यातील 35तंत्रज्ञानही अधिक उपयुक्त होत आहे. २०१२ मध्ये नोकिया लुमिया ९२० मध्ये ‘ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन’ असणारा कॅमेरा पुरवण्यात आला. या तंत्रज्ञानामुळे मंद प्रकाशातही चांगली छायाचित्रे टिपता येतात. त्या वेळी अचाट वाटणारे तंत्रज्ञान आता आयफोन ६ प्लस, एलजी जी३ आणि सॅमसंग गॅलक्सी नोट ४मधील कॅमेऱ्यातही उपलब्ध झाले आहे. या वर्षी मोबाइल फोनच्या कॅमेऱ्यात यापुढची पायरी म्हणून ऑटोमेटिक एचडी रेकॉर्डिग आणि स्लो मोशन व्हिडीओ या सुविधाही या वर्षी पाहायला मिळतील.

सुपरफास्ट एलटीई
थ्रीजी-फोरजीमुळे स्मार्टफोनवरील इंटरनेटचा वेग कमालीचा वाढला आहे; पण हा काही शेवट नाही. 37युरोपमधील अनेक देश तसेच ऑस्ट्रेलियामध्ये सहाव्या श्रेणीतील सुपरफास्ट एलटीई इंटरनेटचे तंत्रज्ञान सुरू होऊ घातले आहे. या तंत्रज्ञानामुळे मोबाइलवरही ३०० एमबीपीएस इतका स्पीड मिळू शकेल. त्यातच क्वॉलकॉमनेही या वर्षी कॅट९ मोडेम आणण्याचे प्रयत्न चालवले आहेत. तसेच झाले तर केबल इंटरनेटपेक्षाही अधिक वेगाने मोबाइलवर इंटरनेट सर्फिग करता येणार आहे.

बॅटरीचा आकार वाढता वाढे
स्मार्टफोनच्या ग्राहकांत प्रचंड संख्येने वाढ होत असली तरी अपुऱ्या क्षमतेची बॅटरी ही ग्राहकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते; परंतु बॅटरीची क्षमता वाढवायची म्हटले की, बॅटरीची जाडी आणि वजन वाढते. त्यामुळे कमी जाडीचे ‘स्लिम’ स्मार्टफोन बनवण्याच्या कंपन्यांच्या प्रयत्नांना खीळ बसते. त्यामुळेच येत्या काळात बॅटरीचा आकार वाढतच राहील, असे दिसते.

सॉफ्टवेअरवर भर
38स्मार्टफोनच्या हार्डवेअरमध्ये यंदा फारसा बदल होण्याची शक्यता नसली तरी त्याचे सॉफ्टवेअर सतत प्रगत करण्यात कंपन्यांचा भर असणार आहे. वेअरेबल गॅझेट किंवा व्हॉइस कमांडसारख्या सुविधांमध्ये अधिकाधिक प्रगती होण्याची शक्यता आहे.

टॅब्लेटचे ‘अच्छे दिन’ जाणार?
एकीकडे नवनवीन तंत्रज्ञान बाजारात कमाल करण्याच्या तयारीत असताना आताआतापर्यंत प्रचंड लोकप्रिय ठरत असलेला टॅब्लेट मात्र हळूहळू उतरणीला लागण्याची शक्यता आहे. याचं कारणही टॅब्लेटच्या आतापर्यंतच्या मोठय़ा खरेदीतच दडलं आहे. सध्या टॅब्लेट बाळगणाऱ्यांना तो ‘अपग्रेड’ करून नवा टॅब्लेट घेण्यामध्ये फारसा रस नसल्याचे दिसून येते. त्यातच मोठय़ा आकाराचे स्मार्टफोन, लॅपटॉपची वाढती लवचीकता पाहता टॅब्लेटसाठी ‘बुरे दिन’ येण्याची चिन्हे आहेत.

गुगलचे ‘प्रोजेक्ट अ‍ॅरा’ फसणार?
स्मार्टफोनधारकांना आपल्या गरजेनुसार मोबाइलमधील वेगवेगळे भाग बदलण्याची सुविधा देणारा ‘प्रोजेक्ट अ‍ॅरा’ स्मार्टफोन गुगलने मांडला होता. तेव्हापासूनच सातत्याने चर्चेत असलेल्या ‘प्रोजेक्ट अ‍ॅरा’चे आगमन या वर्षी होईल, असे दिसते. मात्र, या स्मार्टफोनची बॅटरी हा तापदायक विषय ठरण्याची चिन्हे आहेत. कमी क्षमतेच्या बॅटरीमुळे हा स्मार्टफोनही महागडा ठरण्याची शक्यता आहे.