बाल हनुमानाने आकाशातील सूर्याच्या दिशेने झेप घेतली होती. थोडीशी अतिशयोक्ती करायची झाली तर म्हणता येईल की, हनुमान हा पहिला अंतराळवीर होता, ज्याला सूर्यमालेचे संशोधन करावेसे वाटले!
खगोलशास्त्र या विषयाचा आवाका खूप मोठा आहे. त्याची सुरुवात शाळेत आपण सूर्यमालेच्या अभ्यासाने केली. ग्रह, उपग्रह, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादींविषयी आपण थोडेफार जाणून घेतले. पण आपली सूर्यमाला हा काही फक्त शाळेत शिकण्याचा विषय नव्हे. आजही या विषयावर जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस सखोल अभ्यास उत्साहाने करीत असतात. ते आपल्यासमोर नेहमीच नवनवीन माहिती आणत असतात.
आज आपण अमेरिकेतील जगप्रसिद्ध संस्था नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) यांच्या <http://solarsystem.nasa.gov/&gt; या वेबसाइटद्वारे आपल्या सूर्यमालेविषयी अद्ययावत संशोधनाची माहिती घेऊ या.
वृत्तपत्रातून नुकतेच तुम्ही वाचले असेल की, शेजारील मंगळ ग्रहावर द्रव स्वरूपात पाणी अस्तित्वात आहे याचा खात्रीपूर्वक पुरावा शास्त्रज्ञांना उपलब्ध झाला आहे. असे पाणी सापडणे म्हणजे सूक्ष्म स्वरूपात जीवसृष्टी सापडण्याची शक्यता मोठय़ा प्रमाणात असणे! या शक्यतेमुळे शास्त्रज्ञ खूप उत्साहित झाले आहेत. १९६५ साली नासाने मंगळाचा शोध घेण्याच्या दृष्टीने मरिनर- ४ हे अंतराळयान धाडले, त्याला या वर्षी पन्नास वष्रे पूर्ण होत आहेत. या कालावधीत मंगळाच्या पृष्ठभागावर स्वयंचलित वाहने (रोव्हर्स) चालवली. यासंबंधी तपशीलवार माहिती या वेबसाइटवर प्लॅनेट्सवर क्लिक केल्यावर त्याखालील ‘मार्स’मध्ये मिळू शकेल.
प्लुटोचा शोध १९३० साली लागला. तेव्हापासून २००६ पर्यंत त्याला सूर्यमालेतील नववा ग्रह समजण्यात येत असे. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने केलेल्या ग्रहांच्या व्याख्येनुसार प्लूटोला ग्रहांच्या यादीतून वगळून बटुग्रहांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. हे तुम्हाला प्लूटोवर क्लिक केल्यास वाचता येईल.
मिशन्स या विभागात नासाने हाती घेतलेल्या (भूतकाळातील, वर्तमानकाळातील तसेच भविष्यकाळातील) उपक्रमांविषयी माहिती जाणून घेता येईल. गॅलरीजमध्ये विविध अंतराळयानांचे आणि अंतराळयानांनी काढलेले अतिशय सुंदर फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळतात.
या साइटवर जायला मुलांनाही आवडेल. त्यांच्यासाठी खेळ आणि स्वत करून बघता येतील असे प्रॉजेक्ट आहेत. सोपी आणि कठीण अशी दोन्ही प्रकारची जिग्सॉ पझल्स आहेत. तसेच येथे एक गमतीदार टूल आहे. पृथ्वीवर आपले वजन किती आहे हे आपण जाणतोच. पण या टूलच्या साहाय्याने चंद्र, मंगळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपले वजन किती भरेल हेही जाणून घेता येईल.
ज्या वाचकांना अवकाशाविषयी मराठीतून जाणून घ्यायचे असेल त्यांच्यासाठी <http://www.avakashvedh.com/&gt; ही एक उत्तम साइट आहे. सूर्यमालेची ओळख, प्रश्नमंजूषा, भारतीय खगोलशास्त्रज्ञ यांसारख्या अनेक गोष्टी येथे उपलब्ध आहेत.

– मनाली रानडे
manaliranade84@gmail.com