प्रश्न –  मला सोनी एक्स्पेरिया टी२ अल्ट्रा आणि एचटीसी डिझायर ८१६ यादोन्ही पकी कोणता फोन चांगला आहे हे सांगा. यातील फरक काय आहे हे मला जाणून घ्यायचे आहे.     – राजू इंगावले
उत्तर – या दोन्ही फोनमधील फरक जाणून घेत असताना आपण काही गोष्टी पाहूयात. त्यात दोन्ही फोनमध्ये सोनीची बॅटरी क्षमता ही एचटीसीच्या तुलनेत ४०० एमएएचने जास्त आहे. यामुळे स्वाभाविकच एचटीसीच्या तुलनेत या फोनचे वजन १० ग्रॅमने वाढले आहे. एचटीसीमध्ये तुम्हाला रंगाचा पर्याय उपलब्ध नाही. सोनीचा डिस्प्ले सहा इंचांचा, तर एचटीसीचा ५.५ इंचांचा आहे. डिस्प्लेमधील इतर गोष्टी या दोन्ही फोनमध्ये सारख्याच आहेत. हार्डवेअर आणि मेमरीच्या बाबतीत एचटीसी बाजी मारतो. एचटीसीमध्ये १.६ गीगाहार्टझचा क्वाडकोर प्रोसेसर आणि १.५ जीबी रॅम आहे. हीच सोनीमध्ये १.४ गीगाहार्टझचा क्वाडकोर प्रोसेसर आणि १ जीबी रॅम आहे. दोन्ही फोनमध्ये इंटर्नल मेमरी आठ जीबी आहे. मात्र एचटीसीमध्ये ही आपण १२८ जीबीने वाढवू शकतो, तर सोनीमध्ये केवळ ३२ जीबीने वाढवू शकतो. दोन्हीचा मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा आहे. तर फ्रंट कॅमेऱ्यामध्ये एचटीसी पुन्हा बाजी मारतो. याचा फ्रंट कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एचटीसी ४.४ अँड्रॉइड, तर सोनीमध्ये ४.३ अँड्रॉइड ओएस आहे. दोन्हीमध्ये कनेक्टिविटी सारखीच आहे. एचटीसीमध्ये दोन्ही नॅनो सिमकार्ड, तर सोनीमध्ये मायक्रो सिमकार्ड वापरावे लागते. या दोन्हीच्या तुलनेत एचटीसीचे पारडे जड आहे. यामुळे तुम्ही हा पर्याय स्वीकारायला हरकत नाही.
प्रश्न –  माझ्या मोबाइलमध्ये २००० एमएएचची बॅटरी आहे. त्याऐवजी मी ३००० एमएएचची बॅटरी वापरू शकतो का? नसेल तर बॅटरी क्षमता वाढविण्यासाठी काय करावे?                                                                           – विकास नारनवरे
उत्तर – आपल्या फोनची बॅटरी क्षमता आणि फोनमधील हार्डवेअर यांचा ताळमेळ असतो. यामुळे फोनच्या बॅटरी क्षमतेपेक्षा जास्त क्षमता असलेली बॅटरी फोनमध्ये वापरू नये. तुम्हाला बॅटरी बॅकअप वाढवायचा असेल तर तुम्ही त्यासाठी बॅटरी सेव्हर अ‍ॅप्स डाऊनलोड करा किंवा पॉवर बँक जवळ बाळगा; पण पॉवर बँक ही चांगल्या ब्रँडेड कंपनीची वापरलेली केव्हाही चांगले.
या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.