News Flash

आकाशमार्गाने जगपर्यटन

जगातील निसर्गरम्य आणि मानवनिर्मित स्थळे पाहायला सर्वानाच खूप आवडते. चित्रपटांमध्ये विशेषत: गाण्यांमध्ये आपल्याला अशी जगभरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवली जातात.

जगातील निसर्गरम्य आणि मानवनिर्मित स्थळे पाहायला सर्वानाच खूप आवडते. चित्रपटांमध्ये विशेषत: गाण्यांमध्ये आपल्याला अशी जगभरातील प्रेक्षणीय स्थळे दाखवली जातात. परंतु त्या वेळी कॅमेरा नट-नटय़ांवर फोकस केलेला असतो आणि काही क्षणात ते स्थळ डोळ्यासमोरून नाहीसे होते.
थोडय़ाफार फरकाने हीच परिस्थिती विविध चॅनेल्सवर दाखवल्या जाणाऱ्या प्रवासी स्थळांबद्दल असते परंतु ही स्थळे आपली उत्सुकता नक्कीच वाढवतात. जसे की, एखादे स्थळ चारही दिशांनी कसे दिसते? त्याच्या भोवतालचा परिसर कसा आहे? आकाशातून हे स्थळ कसे दिसत असेल? इत्यादी.
हे सर्व जर आपल्याला स्वत:च्या डोळ्यांनी त्या स्थळाला भेट देऊन बघता आले तर तो आनंद काही निराळाच. परंतु त्यासाठी तिकीट बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, राहण्याची व खाण्याची व्यवस्था आणि मुख्य म्हणजे भरलेला खिसा या सगळ्यांसाठी धावपळ करावी लागते. एवढे करूनही अंटाíक्टका-अलास्का याच्यासारख्या दुर्गम ठिकाणी जाणे शक्य होईलच असे नाही. परंतु आता हा आनंद आपल्याला घरबसल्याही मिळू शकेल, http://www.airpano.com/  या साइटच्या माध्यमातून. या साइटवर तुम्हाला विविध देशातील अतिशय नयनरम्य अशा स्थळांचे पॅनोरॅमिक व्हय़ू बघायला मिळतील. सध्या या साइटवर अडीचेहून अधिक पॅनोरमाज उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ, दुबई शहराचा नजारा आकाशातून बघताना तेथील एकूण २७ स्थळांचा पॅनोरॅमिक व्हय़ू बघता येईल. तो झूम करूनही तुम्हाला दिसेल. हा व्हय़ू ३६० अंशात फिरूनही बघता येतो. माऊसचा कर्सर हलवूनदेखील हा व्हय़ू विविध अँगलमधून तुम्ही बघू शकता. आपल्याला तर माहीतच आहे की, अंटाíक्टका खंडावर जगातील सर्वात कमी तापमान आढळते. या कारणास्तव तेथे कायमस्वरूपी राहणाऱ्या व्यक्तींची संख्या जवळजवळ शून्य आहे. त्यामुळे या स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून भेट देणाऱ्या व्यक्तींची संख्या बोटांवर मोजण्याइतकीच असावी. परंतु या साइटच्या माध्यमातून तुम्हाला या स्थळाला भेट देणे सहज शक्य होणार आहे. बर्फाच्छादित डोंगर, बर्फाचे डोंगर, निरभ्र आकाश, निळेशार पाणी, पेंग्विन, सील मासे इत्यादी बरेच काही तुम्ही येथे पाहू शकता.
ही साइट अधिक माहितीपूर्ण करण्यासाठी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. संगणकाच्या पडद्यावर काही ठिकाणी प्रश्नचिन्ह दिसतात त्यावर तुमचा माऊसचा कर्सर नेल्यावर त्या ठिकाणचे किंवा वास्तूचे नाव वाचायला मिळते. प्रत्येक ठिकाणचे वर्णन सांगणारे लेख अतिशय सुंदर फोटोंसकट वाचायला मिळतील.
काही स्थळांचे हेलिकॉप्टरमधून घेतलेले छोटे व्हिडीओज पाहून आपण मंत्रमुग्ध होतो. साइटच्या होमपेजवरील वर्ल्ड मॅपवर गेल्यास आपल्याला हव्या त्या देशात जाऊन त्यातील प्रेक्षणीय स्थळे निवडता येतील. त्याचप्रमाणे मेनूतील फोटो गॅलरीमध्ये उपलब्ध फोटो त्यांच्या नावाप्रमाणे शोधता येतील.
प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रेक्षणीय जगाची झलक घरच्या घरी पाहता येत असली तरी त्यापकी काही स्थळांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी ही साइट तुम्हाला नक्कीच उद्युक्त करेल.
मनाली रानडे
manaliranade84@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 6:39 am

Web Title: world tourism by air ways
Next Stories
1 नवीन फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा बॅकअप कसा घेऊ?
2 ‘मॅकबुक’च्या घोडदौडीला चिनी लगाम!, शिओमीचा लॅपटॉप येतोय..
3 चिनी अ‍ॅपल
Just Now!
X