टॅब्लेटला जोड नोटबुकची
अलीकडेच तैवान येथे झालेल्या कॉम्प्युटेक्स या संगणकाच्या क्षेत्रातील भविष्यात येणाऱ्या उत्पादनांच्या सोहळ्यामध्ये एसर या जगद्विख्यात कंपनीने एसर आयकॉनिआ डब्लू ३ हे नवे उत्पादन प्रदर्शित केले होते. या उत्पादनाला तंत्रज्ञांचा चांगला प्रतिसाद लाभला. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे एसरने याचे डिझाइन करताना सध्याच्या ग्राहकांना नेमके काय हवे आहे, त्याचा शोध घेत त्यानुसार त्याची रचना केली आहे.
टॅब्लेट हा ‘ऑन द गो’ असा उपकरणाचा प्रकार आहे. तो खूप सोयीचा असला तरी त्यावर एखादी गोष्ट अधिक प्रमाणावर टाइप करण्याचा प्रसंग येतो, त्या वेळेस तो काहीसा गैरसोयीचा वाटू लागतो. म्हणजे हेच काम लॅपटॉप किंवा नोटबुकवर करणे खूपच सोयीचे ठरले असते, असे वापरकर्त्यांला वाटू लागते. गैरसोय असते ती की बोर्डची. म्हणजेच टॅब्लेटवर टचस्क्रीन की बोर्ड असतो. पण तो केवळ लहानसा टेक्स्ट मेसेज टाइप करण्यासाठी उपयुक्त असतो. एखादे मोठे पत्र किंवा चार-पाच पानांचा मजकूर टाइप करावा लागतो तेव्हा मात्र तो त्रासदायक प्रकार वाटतो. त्या वेळेस असे वाटते की, स्वतंत्र की बोर्ड असायला हवा होता. नेमकी हीच बाब एसरने लक्षात घेऊन या नव्या उत्पादनाची रचना केली आहे.
हा ८.१ इंच आकाराचा टॅब्लेट असून त्यासाठी विंडोज ८ ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस होम आणि स्टुडंट २०१३ यावर प्री- इन्स्टॉल्ड आहे. वापरण्यासाठी अतिशय सोपा आणि सोयीचा असा हा प्रकार आहे. त्याचे वजन केवळ ५०० ग्रॅम्स एवढेच आहे. त्यामुळे त्याची ने-आण अतिशय सोयीची आहे.
टॅब्लेटवर टाइप करताना होणारी अडचण लक्षात घेऊनच कंपनीने यासोबत की-बोर्डचा एक वेगळा पर्यायही तुमच्यासमोर ठेवला आहे. हा वायरलेस असा की बोर्ड असून एकाच वेळेस त्याचा वापर चार्जिग डॉक म्हणूनही करता येतो. त्यामुळे एकाच वेळेस दोन कामे सहज होऊन जातात. शिवाय या की-बोर्डचा आकार १३.३ इंचाचा आहे. म्हणजेच नोटबुक किंवा लहान आकाराच्या लॅपटॉपएवढाच या की-बोर्डचा आकार आहे. दीर्घकाळ टायिपग करायचे असेल तर हा आकार अतिशय सोयीचा आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : अद्याप हे उत्पादन बाजारपेठेत आलेले नाही. कंपनीनेही त्याची अंदाजित किंमत जाहीर केलेली नाही.