ऑल इन वन

स्मार्टफोनच्या दुनियेची सूत्रे हलवणाऱ्या अँड्रॉइडची मालकी असलेल्या गुगलने याच आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत ‘अँड्रॉइड वन’ आधारित तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच केले.

स्मार्टफोनच्या दुनियेची सूत्रे हलवणाऱ्या अँड्रॉइडची मालकी असलेल्या गुगलने याच आठवडय़ात भारतीय बाजारपेठेत ‘अँड्रॉइड वन’ आधारित तीन वेगवेगळ्या कंपन्यांचे स्मार्टफोन लाँच केले. पहिल्यांदा भारतात सादर झालेल्या या स्मार्टफोनची सध्या इंटरनेटवरून जोरदार विक्री सुरू आहे. पहिल्यांदाच स्मार्टफोन वापरू पाहणाऱ्यांना अँड्रॉइडकडे खेचण्यासाठी गुगलने हे स्वस्त दरातील स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. पण या फोनची वैशिष्टय़े केवळ नवीन वापरकर्त्यांलाच नव्हे तर मध्यम किंमत श्रेणीतील स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांनाही आकर्षित करणारी आहेत.
स्वस्त तरीही आकर्षक..
‘अँड्रॉइड वन’ची भारतात घोषणा करताना गुगलने मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइस या तीन कंपन्यांच्या या यंत्रणेवर आधारित स्मार्टफोनची घोषणा केली. हे तिन्ही फोन सारख्याच हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षमतेचे आहेत आणि त्यांची किंमतही सारखीच आहे. या तिन्ही फोन्समध्ये अँड्रॉइड ‘किटकॅट’ ही अद्ययावत कार्यप्रणाली आहे. इतक्या कमी किंमत श्रेणीत ‘किटकॅट’ यंत्रणा अन्य कोणत्याही स्मार्टफोन्समध्ये नाही. तिन्ही फोन्समध्ये डय़ुअल सिम, एफएम टय़ुनर आणि सारखाच प्रोसेसर आहे. शिवाय गुगलचे यूटय़ुब, जी मेल, गुगल मॅप्स, गुगल ट्रान्स्लेट हे सर्व अ‍ॅप्स त्यात आधीपासून लोड केलेले आहेत. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे या तीन फोन्ससोबत गुगलने एअरटेलची खास ऑफरही आणली आहे. या अंतर्गत ग्राहकांना अँड्रॉइडचे अपडेट मोफत डाऊनलोड करता येणार आहेत. म्हणजे त्यासाठी वापर होणाऱ्या डेटावर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच त्यांना सुरुवातीचे सहा महिने दरमहा २०० एमबीपर्यंतचे अ‍ॅप्सही मोफत डाउनलोड करता येणार आहेत. याशिवाय गुगल क्रोमवरून इंटरनेट ब्राउजिंग करताना डेटाचाही कमी वापर होणार आहे.
अ‍ॅपलने गेल्या आठवडय़ात अमेरिकेत आयफोन ६ लाँच केला. भारतात हा फोन यायला ऑक्टोबर उजाडेल. पण त्याआधी अ‍ॅपलचा तगडा प्रतिस्पर्धी असलेल्या गुगलने आपल्या नव्या स्मार्ट कल्पनेनिशी भारतीय बाजारात खळबळ निर्माण केली आहे. गुगलच्या ‘अँड्रॉइड वन’ या सॉफ्टवेअरवर आधारित मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइस या तीन कंपन्यांचे स्मार्टफोन या आठवडय़ाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आले. जगभरात पहिल्यांदा भारतीय बाजारात दाखल करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत अवघी ६३९९-६४९९ रुपये एवढी आहे. ही किंमत पाहताच हे स्मार्टफोन अगदीच सामान्य आणि कमी ताकदीचे असतील, असे वाटू शकते. पण हे स्मार्टफोन ‘ऑल इन वन’ आहेत, असं म्हणायला हरकत नाही.
‘अँड्रॉइड वन’ म्हणजे काय?
‘अँड्रॉइड वन’ हे कोणतंही नवं सॉफ्टवेअर नाही. तर ते बाजारात विविध कंपन्यांच्या स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या अँड्रॉइडची मूळ आवृत्ती आहे. गुगलच्या अँड्रॉइड यंत्रणेवर आधारित असलेले स्मार्टफोन बनवताना अनेक कंपन्या आपल्या आवश्यकतेनुसार मूळ आवृत्तीमध्ये बदल करत असतात. त्यामुळे एकाच अँड्रॉइड सिस्टीमवर आधारित  स्मार्टफोन्समध्ये थोडाफार फरक जाणवतो. पण ‘अँड्रॉइड वन’ हे गुगलच्या फॅक्टरीतून निघालेलं थेट सॉफ्टवेअर आहे. त्यात कोणतीही छेडछाड नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, गुगलच्या नवनवीन अँड्रॉइड सिस्टीम पहिल्यांदा ‘अँड्रॉइड वन’ स्मार्टफोनवर अपडेट होतील. तसेच गुगल प्लेवर उपलब्ध असलेले अ‍ॅप्स आणि त्यांचे अपडेट्स पहिल्यांदा या स्मार्टफोनमध्ये दिसतील. म्हणूनच याचे नाव ‘अँड्रॉइड वन’ असे ठेवण्यात आले आहे.
स्मार्टफोनच्या बाजारात अ‍ॅपलच्या आयफोनला टक्कर देणारी अँड्रॉइड यंत्रणा उभारून ती अनेक कंपन्यांना पुरवणाऱ्या गुगलने ‘अँॅड्रॉइड वन’ची शक्कल लढवण्यामागचे मुख्य कारण भारतासारख्या देशांत सर्वसामान्यांना परवडतील अशा दरांत फोन पुरवून त्यांना स्मार्ट बनवणे हे आहे. ‘अँड्रॉइड वन’ला सुरुवातीस मिळत असलेला प्रतिसाद पाहिल्यास त्यात गुगल यशस्वी होत असल्याचे दिसते.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास ए १
डिस्प्ले  – ४.५ इंच
प्रोसेसर – १.३ गिगाहार्टझ
कॅमेरा –  मागील ५ मेगापिक्सेल, पुढे २ मेगापिक्सेल
रॅम –  एक जीबी
बॅटरी – १७०० एमएएच
स्टोअरेज –  इंटर्नल ४ जीबी, एक्स्टर्नल ३२ जीबी
किंमत- ६४९९

कार्बन स्पार्कल व्ही
डिस्प्ले – ४.५ इंच
प्रोसेसर – १.३ गिगाहार्टझ
कॅमेरा –  मागील ५ मेगापिक्सेल, पुढे २ मेगापिक्सेल
रॅम –  एक जीबी
बॅटरी – १७०० एमएएच
स्टोअरेज-  इंटर्नल ४ जीबी, एक्स्टर्नल ३२ जीबी
किंमत – ६३९९

स्पाइस ड्रीम उनो
डिस्प्ले – ४.५ इंच.
रिझोल्युशन – ४८० बाय ८५४ पिक्सेल
प्रोसेसर – १.३ गिगाहार्ट्झ मीडिया ट्रेक प्रोसेसर
कॅमेरा – मागे ५ मेगापिक्सेल, पुढे २ मेगापिक्सेल
स्टोअरेज –  इंटर्नल ४ जीबी, एक्स्टर्नल ३२ जीबी
बॅटरी – १७०० एमएएच
किंमत – ६२९९ रु.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All in one

ताज्या बातम्या