मोबाइलचे संरक्षण

देशात ९४ कोटी मोबाइलधारक असल्याचे नुकतेच ट्रायने प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आले आहे. पण या सर्व मोबाइलधारकांपैकी किती जणांचा मोबाइल खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे.

देशात ९४ कोटी मोबाइलधारक असल्याचे नुकतेच ट्रायने प्रसिद्ध केलेल्या अहवालात समोर आले आहे. पण या सर्व मोबाइलधारकांपैकी किती जणांचा मोबाइल खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे. किती जण मोबाइलची सुरक्षा पाळतात. मोबाइल सुरक्षा म्हणजे मोबाइलमध्ये अँटिव्हायरस टाकला म्हणजे झाले असे नाही. आपल्या मोबाइलमध्ये अनेक महत्त्वाची तसेच वैयक्तिक माहिती असते. ती माहिती इतरांपासून सुरक्षित कशी ठेवता येईल यासाठी आपण फारसे काही करताना दिसत नाही. मोबाइलमधील माहिती चोरीपासून वाचण्यासाठी मोबाइल सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. मोबाइल सुरक्षित ठेवण्यासाठी पैसे खर्च करायची गरज नाही. तुमच्या मोबाइलमधील अंतर्गत सुविधांचाच वापर करून सुरक्षा कशी करता येईल हे पाहू या.

28पासवर्ड सेव्ह करू नका – ऑनलाइन सुविधांचा वापर करून आपण अनेक गोष्टी करत असतो. म्हणजे फोनचे बिल भरण्यापासून ते बाजारहाटापर्यंत अनेक गोष्टी मोबाइलवरून होतात. ज्या वेळेस आपण मोबाइलवर साइट सुरू करून लॉगइन करतो, त्या वेळेस आपल्याला तुमचा पासवर्ड सेव्ह करायचा का, असा प्रश्न विचारला जातो. अशा वेळी अनेकजण दर वेळेस कुठे पासवर्ड टाकायचा, या उद्देशाने पासवर्ड सेव्ह करतात. मात्र हे धोकादायक आहे. जर तुमचा मोबाइल हरवला तर तुमच्या सर्व ऑनलाइन व्यवहारांचे तुम्ही सेव्ह केलेले पासवर्ड मोबाइल चोराला सहज मिळू शकतात. ही काळजी विशेषत: बँकिंग किंवा पेमेंट गेटवेच्या अ‍ॅप्सच्या बाबतीत घ्यावी.

27अँड्रॉइडमधील इन-बिल्ट सुरक्षा वापरा – तुम्ही अँड्रॉइड जेलीबीन किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन लॉकचे पर्याय उपलब्ध आहेत. यात साध्या स्क्रीन लॉकसोबतच एनक्रिप्टेड स्क्रीनलॉकही वापरता येतात. यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहू शकतो. या फोन्समध्ये पासवर्ड, पिन, पॅटर्न आणि फेस अनलॉक अशा विविध प्रकारच्या लॉकिंग सुविधा उपलब्ध आहेत. पिन किंवा पॅटर्न लॉक करताना ते थोडे वेगळे किंवा अवघड ठेवा म्हणजे मोबाइल चोराला किंवा हॅकरला ते उघडता येणे शक्य होणार नाही. जर कुणाला लॉक उघडता आले नाही तर फोन चोरीला गेला तरी तुमची माहिती तो मिळवू शकणार नाही.

लॉक युवर अ‍ॅप्स – तुमचे सर्व अ‍ॅप्स लॉक असणे आवश्यक आहे. विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारखे अ‍ॅप्स तर लॉक असणे केव्हाही चांगले. अ‍ॅप लॉक करणे ही मोबाइल सुरक्षेची दुसरी पातळी असू शकते. ज्यामध्ये चोराने किंवा हॅकर्सने तुमचे मुख्य लॉक उघडण्यात यश मिळवले तरी अ‍ॅप लॉक असतील तर त्याला अ‍ॅप्समधली माहिती मिळवणे शक्य होणार नाही. यासाठी अ‍ॅपलॉकसारखे मोफत अ‍ॅप्सही तुम्ही वापरू शकता. यामध्ये प्रत्येक अ‍ॅप वेगळे लॉक करण्याची गरज नसते. तुम्ही या अ‍ॅप्सच्या मदतीने तुमचे ई-मेल अ‍ॅप किंवा संदेशवहन अ‍ॅप एकत्र आणून त्यांना एकत्रित एक लॉक ठेवू शकतात.

अ‍ॅप परमिशनचे महत्त्व – गुगल प्लेवरून अ‍ॅप इंस्टॉल करताना आपल्याला अ‍ॅप परमिशनची एक खिडकी दिसते. यामध्ये आपण एखादे अ‍ॅप इंस्टॉल करत असताना आपल्या मोबाइलमधील कोणकोणती माहिती वापरण्याचे अधिकार या अ‍ॅप कंपनीला देतो याची यादी असते. आपण ते सर्व न वाचता अ‍ॅक्सेप्ट करून मोकळे होतो. काही अ‍ॅप्समध्ये त्या अ‍ॅपला आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही परवानगी मागितली जाते. उदाहणार्थ, एखाद्या गेमच्या अ‍ॅपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सची माहिती घेतात. पण प्रत्यक्षात गेम खेळण्याचा आणि कॉन्टॅक्ट्सचा काहीच संबंध नसतो. तसेच एखाद्या अलार्म अ‍ॅपला तुमचे संदेश वाचण्याची गरज नसते. पण अनेक अलार्म अ‍ॅप्समध्ये संदेशासाठीची परवानगी घेतली जाते. यामुळे अशी अनावश्यक माहिती अनोळखी कंपनींना जाऊ नये यासाठी अ‍ॅप परमिशन्स नक्की वाचून घ्या. आपण जे अ‍ॅप घेत आहोत त्या अ‍ॅपला खरोखरीच या सर्व गोष्टींची गरज आहे का हेही पडताळून पाहा. कारण गुगल प्लेवरील सर्वच अ‍ॅप सुरक्षित असतात असे नाही. तसेच एखादे नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या अ‍ॅपचे रेटिंग तसेच त्याच्यावर वापरकर्त्यांच्या आलेल्या कमेंट्स आपण सहसा वाचत नाही. पण जर त्या वाचल्या तर आपल्याला नक्कीच अ‍ॅपविषयी काही माहिती मिळू शकते.

नेटवर्क सुरक्षा – अँड्रॉइड उपकरण हॅकर्सपासून वाचविण्यासाठी सर्वात महत्त्वाची काळजी घ्यायची असते ती म्हणजे नेटवर्क सुरक्षेची. सध्या अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा दिली जाते. पण मोफत वाय-फायचे नेटवर्क शंभर टक्के सुरक्षित असतेच असे नाही. यामुळे शक्यतो ते वापरणे टाळा. अगदीच तुम्हाला वापरायचे असेल तर त्या नेटवर्कचा वापर करून बँकिंगचे व्यवहार करणे टाळा. कारण अशा ठिकाणी हॅकर सहजपणे तुमच्या फोनमधील माहिती उचलून घेऊ शकतो. यावर उपाय म्हणजे तुम्ही तुमची माहिती हाइडनिंजा व्हीपीएनसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून वाचवू शकता. या अ‍ॅप्समुळे तुमच्या माहितीचे आऊटगोइंग कनेक्शन हे नेहमी एनक्रिप्टेड असेल. या अ‍ॅप्समुळे कुणालाही सहजासहजी तुमची माहिती मिळवता येणार नाही. याचबरोबर तुम्ही वायफाय प्रोटेक्टरसारख्या अ‍ॅपच्या माध्यमातून खुल्या वायफाय जोडणीतील सुरक्षित जोडणी मिळवू शकता.

मोबाइल सुरक्षा अ‍ॅप्स – मोबाइल सुरक्षेसाठी अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. यामध्ये काही मोफत अँटिव्हायरसेसचे अ‍ॅप्सही उपलब्ध आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुमच्या मोबाइलला प्राथमिक सुरक्षा मिळू शकते. तुम्ही जर अँटिव्हायरस विकत घेऊन मोबाइलमध्ये इन्स्टॉल केला तर तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये बिनदिक्कतपणे माहिती साठवून ठेवू शकता. कारण अनेक अँटिव्हायरस सुविधांमध्ये मोबाइल चोरीला गेला किंवा हॅक करण्यात आला तर त्यातील माहिती काढून घेऊन ती आपल्याला देण्याची सुविधा उपलब्ध असते.

बहुवापरकर्ते खाती सुरू करा – घरात एकच संगणक आणि तो चार जणांना वापरायचा असेल तर अनेकदा आपण प्रत्येकाचे यूजर अकाऊंट वेगळे तयार करतो. तसेच जर घरात एकच टॅबलेट असेल आणि तो तुम्ही, तुमची मुलं किंवा इतर कुणी वापरणार असतील आणि तुमची माहिती इतरांना कुणाला कळू द्यायची नसेल तर तुम्ही प्रत्येक वापरकर्त्यांचे वेगवेगळे खाते सुरू करा. जेणेकरून एकमेकांच्या माहितीत ढवळाढवळ करणे अवघड जाईल. यासाठी सेटिंग्जमध्ये यूजर असा विभाग आहे. या विभागात जाऊन तुम्ही हे करू शकता.

माहितीचा बॅकअप घेणे – स्मार्टफोनच्या युगात तुमच्या फोनमधील माहितीचा बॅकअप दिवसातून एकदा घेतला गेलाच पाहिजे. कारण फोन कधी आणि कोणत्या वेळी करप्ट होऊ शकतो याची शाश्वती आपण देऊ शकत नाही. तसेच हॅकिंग किंवा चोरीची भीतीही आहेच. अशा वेळी जर बॅकअप नसेल तर आपण मोबाइलमधील सर्व माहिती गमावू. आपल्याला चोरीला गेलेला फोन परत मिळाला तरी त्यातील माहिती काढून घेतली तर ती परत मिळू शकणार नाही. जर तुम्ही बॅकअप घेतला असेल आणि फोन तुम्ही रिस्टोअर केला तर तुम्ही बॅकअप घेतलेल्या वेळेपर्यंतची सर्व माहिती तुम्हाला पुन्हा मिळू शकते. काही महत्त्वाची माहिती तुम्ही क्लाऊड, तुमचा संगणक किंवा फ्लॅश ड्राइव्हमध्येही साठवून ठेवू शकता.

तुमचे हरवलेले उपकरण ट्रॅक करा – तुमच्याकडे बॅकअप आहे. त्यामुळे माहिती हरविण्याची भीती नाही. पण तुम्हाला तुमचा चोरीला गेलेला मोबाइलच हवा असेल तर तुम्हाला तो मोबाइल ट्रॅक करण्याची सुविधा असते. फोनमध्ये देण्यात आलेल्या जीपीएस प्रणालीमुळे हे शक्य आहे. पण या प्रणालीतून फोन ट्रॅक करावयाचा असेल तर फोनमधील जीपीएस ऑन असणे गरजेचे आहे. यासाठी काही अ‍ॅप्सही अ‍ॅप बाजारात उपलब्ध आहेत. यातील काही अ‍ॅप्स तर आपल्या उपकरणातील जीपीएस सुरू नसेल तरी ते सुरू करू शकतात.

रिमोट वाइप
जर तुमचा फोन चोरीला गेला आणि तो सापडण्याची काहीच चिन्हे नसतील तर तुम्ही त्यातील सर्व माहिती उडवून टाकू शकता. यासाठी तुमच्या फोनमध्ये माहिती वाइप करणारे अ‍ॅप्स असणे आवश्यक आहे. हे अ‍ॅप्स असतील तर तुम्ही संगणकावरून लॉगइन करून तुमच्या फोनमधील सर्व माहिती बसल्या जागेवरून उडवून टाकू शकता. जेणेकरून मोबाइलचोर तुमची माहिती मिळवू शकणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: How to protect your mobile

ताज्या बातम्या