प्रेझेंटेशनची लायब्ररी

सर्चबारच्या साहाय्याने तुम्हाला हवा असलेला विषय तुम्ही शोधू शकता.

प्रेझेंटेशनची लायब्ररी

मागील काही लेखांमध्ये आपण िपटरेस्ट, इन्स्ट्रक्टेबल्स अशा काही साइट्सबद्दल माहिती घेतली होती. या साइट्सवर जगभरातील अनेक व्यक्तींनी आपले कलागुण वापरून तयार केलेल्या कलाकृती, तसेच तंत्रज्ञानाचा वापर करून केलेले नवनवे प्रयोग बघायला मिळतात. आज आपण ज्या साइटबद्दल जाणून घेणार आहोत त्यात विविध विषयांवर लोकांनी प्रेझेंटेशनमध्ये कशा प्रकारे मुद्दे मांडलेले आहेत हे बघायला मिळेल. तसेच त्यांचा उपयोग करून तुम्हाला प्रभावी प्रेझेंटेशन बनवता येईल.

या साइटचे नाव आहे <http://www.slideshare.net/&gt; . परंतु स्लाइड शेअर म्हणजे नक्की काय? येथे स्लाइड्स हा शब्द पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनशी निगडित आहे. आजच्या जगात अगदी शाळेपासून ते बिझनेस आणि कॉर्पोरेट जगतात प्रेझेंटेशन हा परवलीचा शब्द झालेला आहे. पूर्वी आपला मुद्दा/विचार लोकांना पटवण्यासाठी तो लेख किंवा निबंधाच्या रूपात लोकांना पाठवण्यात येई; परंतु आजकालच्या घाईगर्दीच्या दुनियेत लोकांना लांबलचक लेख वाचायला वेळ नसतो. त्यामुळे कोणतीही गोष्ट थोडक्यात आणि मुद्देसूद सांगायची झाल्यास ती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या रूपात दाखवली जाते. मग तो शाळेतील मुलांच्या गटाला दिलेला एखादा प्रोजेक्ट असो किंवा एखाद्या उद्योगाने सरकारला सादर केलेला हजारो कोटी रुपयांचा प्रकल्प असो.
असे प्रेझेंटेशन अनेक स्लाइड्सनी बनलेले असते. यातील प्रत्येक स्लाइडवर प्रकल्पातील एखाद्या घटकाशी/विषयाशी संबंधित मुद्दय़ांच्या रूपात माहिती दिली जाते. आवश्यक तिथे चित्रे, आकृत्या, तक्ते इत्यादी देता येतात हे बहुतेकांना माहिती आहेच. मायक्रोसॉफ्ट ऑफिस या सॉफ्टवेअर समूहामध्ये प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी पॉवरपॉइंट हे टूल आहे. (अशाच प्रकारची लिबर ऑफिस, ओपन ऑफिस इत्यादी अधिकृत सॉफ्टवेअर्स विनामूल्य उपलब्ध आहेत.)
ही साइट सर्व वयोगटांतील लोकांसाठी उपयुक्त आहे. या साइटवर तज्ज्ञ मंडळींनी विविध विषयांना वाहिलेली, जसे की करियर, तंत्रज्ञान, विज्ञान, खेळ, इंजिनीअरिंग, व्यक्तिमत्त्व विकास, बिझनेस अशी विविध प्रकारची प्रेझेंटेशन्स दिसतील. एखादे प्रेझेंटेशन तुम्हाला आवडले असल्यास ते इतरांशी शेअर करू शकता किंवा डाऊनलोड करून घेऊ शकता. (डाऊनलोड करून घेण्यासाठी स्वत:चे अकाऊंट तयार करावे लागते.) येथे प्रेझेंटेशनबरोबरच पीडीएफ आणि डॉक्युमेंट फॉरमटमधील फाइल्स शेअर केलेल्या आहेत.
सर्चबारच्या साहाय्याने तुम्हाला हवा असलेला विषय तुम्ही शोधू शकता. उदाहरणार्थ कॉम्प्युटर या विभागातील html या स्क्रिप्ट लँग्वेजबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर html हा विषय सर्च केल्यावर या विषयाशी संबंधित या साइटवर लोकांनी शेअर केलेली प्रेझेंटेशन्स तुम्हाला दिसतील. याच प्रकारे फोनिक्स, बॉडी लँग्वेज, पोल्यूशन इत्यादीसारखे विषय सर्च केल्यास त्यावरील उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचा साठा तुमच्यासमोर येईल.
तुम्हीसुद्धा तुमच्याजवळील माहिती प्रेझेंटेशन किंवा डॉक्युमेंटच्या रूपात येथे शेअर करून इतरांच्या उपयोगी पडू शकता.
विद्यार्थी तसेच कॉपोरेट जगतातील मंडळींना ही साइट म्हणजे एक वरदानच आहे.

manaliranade84@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Tech इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Information about presentation library

ताज्या बातम्या