बुडीत खाती चाललेल्या नोकियाला मायक्रोसॉफ्ट खरेदी करणार, अशी चर्चा गेले वर्षभर सुरू होती. गेल्याच महिन्यात त्याची अधिकृत घोषणा झाली. या घोषणेपूर्वी नोकियाने बाजारात आणलेला अखेरचा हॅण्डसेट म्हणजे नोकिया लुमिआ ६२५ . आकाराने सर्वात मोठा डिस्प्ले असलेला आणि फोरजीची सुविधा असलेला हा   फोन नोकिया बजेट स्मार्टफोन म्हणून बाजारात आणला आहे.
मागच्या बाजूस असलेले कव्हर काढले की डावीकडे असलेला स्लीम स्लॉट आणि  त्याखाली असलेला मायक्रो एसडी कार्डाचा स्लॉट नजरेस पडतो. या स्मार्टफोनसाठी मायक्रो सिम कार्ड वापरावे लागते. उपकरणाच्या वरच्या बाजूस हेडफोन जॅक आहे तर खालच्या बाजूस चार्जिंग/ यूएसबी पोर्ट आहे. स्क्रीनच्या खालच्या बाजूस तीन टच बटनस् आहेत त्यात बॅक, िवडोज आणि सर्च अशा तीन बटनांचा समावेश आहे.
प्रोसेसर
या स्मार्टफोनसाठी १.२ गिगाहर्टझ् डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला असून त्यासाठी ५१२ एमबी रॅम वापरण्यात आले आहे. लुमिआ ६२५च्या किंमतीच्या आजूबाजूस जाणाऱ्या अनेक स्मार्टफोनमध्ये १ जीबी रॅमचा वापर करण्यात आला आहे. मात्र एखादे अ‍ॅप सुरू केल्यानंतर होणारा किरकोळ विलंब वगळता फारसा त्रास वापर करताना होत नाही. किमत कमी करतानाच्या कसरतीमध्ये रॅम कमी करण्यात आले असावे.
आयपीएस पण क्लीअरब्लॅक नाही
या डिस्प्लेसाठी नोकियाने आयपीएस पॅनलचा वापर केला आहे. मात्र हे पॅनल क्लीअरब्लॅक प्रकारात मोडणारे नाही. त्यामुळे कमी रिझोल्युशनप्रमाणेच सुस्पष्टतेवर परिणाम होतो. याउलट यापूर्वी बाजारात आलेल्या लुमिआ ६२०ला मात्र कंपनीने क्लीअरब्लॅक पॅनल दिले होते. त्यामुळे तजेलदार रंग प्रत्यक्षात त्यावर पाहताना तेवढे तजेलदार वाटत नाहीत. या आयपीएस पॅनलचा सर्वाधिक सुखावणारा भाग हा त्याच्या मोठय़ा आकाराचा असून हे पॅनल फोनच्या पूर्ण आकाराएवढे आहे. म्हणजे दर्शनी भाग हा पूर्णपणे आयपीएस पॅनलने व्यापलेला आहे. मधोमध स्क्रीन आणि चारही बाजूला काहीशी जागा सोडलेली असे इतर स्मार्टफोनच्या स्क्रीनसारखे हे डिझाईन नाही.
स्क्रीन रिझोल्युशन निराशाजनक
नोकियाने याच्या स्क्रीनचा आकार वाढवलेला असल्याने त्याच्या रिझोल्युशनमध्येही चांगली वाढ अपेक्षित होती. त्यासाठीचे आदर्श रिझोल्युशन हे खरे तर १२८० गुणिे ७२० ठरले असते. पण लुमिआ ६२५ आपल्याला या बाबतीत सपशेल निराश करतो. कारण त्याच्या स्क्रीनचा आकार वाढलेला असला तरी त्याचे रिझोल्युशन मात्र तुलनेने कमी म्हणजेच ८०० गुणिले ४८० पिक्सेल्स एवढेच आहे. त्यामुळे समोर डिस्प्लेवर दिसणाऱ्या चित्रणाच्या सुस्पष्टतेवर त्याचा थेट परिणाम होतो.
डिस्प्ले
नोकियाने आजवर बाजारात आणलेल्या लुमिआ मालिकेतील स्मार्टफोन्समध्ये या लुमिआ ६२५ चा डिस्प्ले स्क्रीन सर्वात मोठा म्हणजेच ४.७ इंचाचा आहे. लुमिआच्या सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या लुमिआ ९२५चा स्क्रीनदेखील यापेक्षा ०.२ इंचांनी कमी आहे. स्क्रीनच्या आकाराबरोबरच त्याच्या वजनामध्येही वाढ झाली आहे. लुमिआ ९२५चे वजन १३९ ग्रॅम्स होते. या हॅण्डसेटचे वजन १५९ ग्रॅम्स एवढे आहे.
ऑपरेटिंग सिस्टिम
लुमिआ स्मार्टफोन मालिकेमध्ये नोकियाने सर्वच स्मार्टफोनसाठी विंडोज ८ मोबाईल ही ऑपरेटिंग सिस्टिम वापरली आहे. अनेकांना विंडोजची सवय असल्याने ही सिस्टिम वापरणे खूप सोपे आहे, असे मानसिकरित्या वाटते. खरेतर मोबाईलसाठीची विंडोज आणि डेस्कटॉपसाठीची विंडोज या फरक आहे. त्यातही विंडोज८ मध्ये तर बराच फरक आहे. फार तर डेस्कटॉपवर िवडोज ८ असलेल्यांना ती सुलभ वाटू शकते इतकेच.
अ‍ॅप्स
लुमिआ ६२५मध्ये भरपूर अ‍ॅप्स देण्याचा प्रयत्न नोकियाने केला आहे. नोकियामधील सर्वाधिक लोकप्रिय असलेली मॅप्स आणि नोकिया म्युझिक ही दोन्ही अ‍ॅप्स यामध्ये प्री- लोडेड स्वरूपात उपलब्ध आहेत.
व्हॉइस गायडेड नेविगेशन
यामध्ये व्हॉइस गायडेड नेविगेशनची सोय आहे. ही सोय ऑफलाइन वापरण्याची सोयही यामध्ये आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही देशाचा नकासा नोकिया मॅप्समध्ये डाऊनलोड करण्याची सोयही आहे.
व्हिडिओ रेकॉर्डिंग
या कॅमेऱ्यावर केलेले व्हिडिओ रेकॉर्डिग मात्र एचडी असून ते चांगल्या प्रतीचे होत असल्याचे रिव्ह्य़ू दरम्यान लक्षात आले.
५ मेगापिक्सेल कॅमेरा
लुमिआ ६२५बरोबर नोकियाने पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. या कॅमेऱ्यावर फोटो टिपत असताना सर्वाधिक मजा येते ती यासोबत असलेल्या नोकिया स्मार्ट कॅम अ‍ॅपमुळे. आपण फोटो टिपण्यासाठी शटरवर क्लिक केले की, त्या दरम्यान वेगवेगळी सात छायाचित्र टिपली जातात. आणि त्यातील सर्वोत्तम वाटणारे छायाचित्र निवडण्याची सोय आपल्याला उपलब्ध असते.
बॅटरी क्षमता
लुमिआ ६२५ साठी २००० एमएएच क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे. पूर्ण चाज्र्ड केल्यानंतर ती थ्रीजी वापरामध्येही दिवसभर टिकते, असा अनुभव रिव्ह्य़ू दरम्यान आला. एखादा चित्रपट पाहिल्यानंतर किंवा सलग डाऊनलोड केल्यानंतर ती साधारणपणे सहा ते साडेसहा तास चालते.
स्पेशल इफेक्टस्
याशिवाय विविध स्पेशल इफेक्टस् असलेले फोटोही या मदतीने टिपता येतात. एखाद्या फोटोमध्ये मागे दिसणारी गोष्ट किंवा वस्तू काढूनही टाकता येते आणि एखादी वस्तू वेगात स्थिर असली तरी ती वेगात असल्याप्रमाणे चित्रणही करता येते. एकाच वेळेस सात फोटो टिपले जात असल्यामुळे वेगात असलेल्या गोष्टीच्या मागच्या बाजूस असलेली वस्तू काढून टाकणे सहज शक्य होते.
ल्युमिआच्या  ६२५ या मॉडेलचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे त्यावर टिपलेल्या छायाचित्रातील रंगांमध्ये बऱ्यापैकी वास्तवता असल्याचे लक्षात येते. मेगापिक्सेल तसे तुलनेने कमी असले तरी बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये टिपलेले फोटो चांगले येतात. फोटो मोठा करताना त्याचे पिक्सेल फारसे फाटत नाहीत.
पण कमी प्रकाशातील फोटोच्या बाबतीत मात्र असा अनुभव दर खेपेस येत नाही. काही वेळेस कमी प्रकाशामध्येही चांगले फोटो येतात तर अनेकदा मात्र कमी प्रकाशातील फोटो सुस्पष्ट नसतात. एकूणच याची तुलना त्याच्या किंमतीशी केली तर किंमतीच्या तुलनेत हा कॅमेरा चांगला आहे, अशा निष्कर्षांप्रत आपण पोहोचतो. पण सॅमसंगच्या गॅलेक्सी एस ड्यूओस किंवा ग्रँड क्वात्रोस या दोन्ही मॉडेल्समधील कॅमेरे यापेक्षाही चांगले काम करतात, असे लक्षात येते.
निष्कर्ष
सध्या सर्वानाच आकारने मोठा असलेला स्क्रीन तोही कमी किंमतीत हवा असतो तो देण्याचे काम सध्या नोकिया या ब्रॅण्डेड कंपनीने केले आहे. त्यामुळे दिसायला चांगला मोठय़ा आकाराचा ब्रॅण्डेड फोन देण्यात कंपनीला यश आले आहे. त्याचे स्क्रीनचे रिझोल्युशन अधिक चांगले असते तर मजा आली असती. किंवा स्क्रीन क्लीअरब्लॅक असता तरी सुस्पष्टता वाढली असती. डिझाइनच्या बाबतीत बोलायचे तर हा दिसायला चांगला, सुटसुटीत, कमी जाडीचा आणि आकर्षक असा स्मार्टफोन आहे. लुमिआ ६२५ चे पाठीमागच्या बाजूस असलेले कव्हर हिरवा, पिवळा अशा अनेकविध रंगांमध्ये उपलब्ध आहे. तरुणांना तो अधिक आकर्षित करू शकतो.  त्याचा यूजर इंटरफेसही चांगला असून मायक्रोसॉफ्ट ऑफिस सूट फोनसोबतच येत असल्याने त्याचा वापर करून काम करणे सोपे आहे.  यावसायिकांनादेखील त्याचा वापर नियमित कामांसाठी करता येईल.  कॅमेरा खूप चांगला नसला तरी बरा म्हणावा, असा आहे. नोकिया लुमिआच्या किंमतीमध्येच त्यामध्ये यूवर मूव्हीज हे प्री- लोडेड अ‍ॅप देण्यात आले आहे. नोकिया लुमिआ ७२० मध्ये चांगला कॅमेरा एनएफसी सुविधा आहे फक्त त्याचा स्क्रीन याच्यापेक्षा तुलनेने काहीसा कमी आकाराचा म्हणजेच ४.३ इंचाचा आहे, एवढेच. त्यामुळे विंडोज फोन घ्यायचा असेल तर कदाचित लुमिआ ६२५ पेक्षा ७२०चा पर्याय चांगला ठरावा.