बेनक्यू एक्सएल २४११ टी : गेमिंग मॉनिटर
प्रत्येक जण आपापल्या गरजेनुसार संगणक घेत असतो. कार्यालयीन कामकाज किंवा घरगुती कामकाजाबरोबरच घरामध्ये लहान मुले असतील किंवा गेम्सची आवड असलेली मुले असतील तर गेमिंग हाही महत्त्वाचा उद्देश असू शकतो. मग गेमिंगसाठी संगणक खरेदी करताना गेमिंगची सहउपकरणे जशी प्राधान्याने घेतली जातात म्हणजेच खास गेमिंग माऊस किंवा की बोर्ड जसा खरेदी केला जातो, तसेच प्राधान्य मॉनिटरलादेखील दिले जाते. शेवटी गेमिंगमध्ये तुम्हाला समोर मॉनिटरवर पाहूनच तर खेळायचे असते. त्यामुळे अलीकडे अनेक जण खास गेमिंग मॉनिटरला प्राधान्य देताना दिसतात.
असा हा गेमिंगला प्राधान्य देणारा ग्राहक वर्ग लक्षात घेऊन बेनक्यू या प्रख्यात कंपनीने आता गेमिंगसाठी खास हाय परफॉर्मन्स गेमिंग मॉनिटर बाजारात आणला आहे. हा २४ इंची डिस्प्ले असून हार्डकोअर गेमरसाठीच त्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळेच त्याचा रीफ्रेश रेट १२० हर्टझ् ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अतिशय वेगवान गेम्समध्येही तुम्हाला जराही मागे पडण्याची कोणतीही भीती या मॉनिटवर नाही. शिवाय प्रतिमेची सुस्पष्टता हाही तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. यासाठी ब्लॅक इ क्वालिझर कलर इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळेच पराकोटीची सुस्पष्टता आपल्याला प्रतिमेमध्ये मिळते. त्याशिवाय प्रतिमेच्या डिस्प्लेचे सर्व कंट्रोल्सही तेवढेच शार्प आहेत. त्यामुळे गेम्समध्ये दिसणाऱ्या डार्क किंवा अंधाऱ्या बाजू यादेखील सुस्पष्ट पद्धतीने पाहाता येतात. गेम्समध्ये ही खरी गरज असते. कारण एरवी साध्या मॉनिटरवर ब्राइटनेस वाढवावा लागतो. पण असे केल्यास अंधाऱ्या जागेतील बाबी व्यवस्थित दिसत असल्या तरी ज्या बाजू प्रकाशमान आहेत, त्या अधिक प्रकाशमान होऊन तिथे मात्र धुरकट दिसू लागते. त्याचा फटका गेम्स खेळणाऱ्यास बसतो. म्हणून या गेमिंग मॉनिटरसाठी हे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २२,५००/-

ट्रान्सेन्ड एमपी ३५० : संगीत व फिटनेस एकसाथ
आताशा खरे तर तुमचा मोबाइल हाच खरा सोबती झाला आहे. कारण या मोबाइलमध्येच तुम्हाला लागणाऱ्या सर्व बाबी असतात. म्हणजेच गाणी ऐकायची असतील तर एमपीथ्री प्लेअरही असतो किंवा बाजारात उपलब्ध असणारे इतर प्लेअर्सही असतात. किंवा तुम्हाला लागणारी विविध म्युझिक अ‍ॅप्सही असतात. शिवाय गेल्या अनेक महिन्यांमध्ये ‘ऑन द गो’ असताना संगीत ऐकणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. फिटनेस अ‍ॅप्सचा वापरही जिममध्ये मोठय़ा प्रमाणावर होताना दिसतो.
असे असले तरीही प्रत्यक्षात एमपीथ्री प्लेअर्स काही अद्याप बाजारातून बाद झालेले नाहीत. पूर्वी मोबाइल बाजारपेठेत आल्यानंतर त्यापूर्वी मेसेजिंगसाठी वापरले जाणारे पेजर्स बाजारपेठेतून बाद झाले होते. त्याचप्रमाणे लहानसे केवळ शंभर रुपयांना मिळणारे एफएम रेडिओ इअरफोनसह बाजारात आले ते प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र मोबाइलमध्येच एफएम रेडिओ आल्यानंतर ते केवळ एफएम ऐकवणारे उपकरण बाद झाले. पण आश्चर्यकारकरीत्या एक बाब अद्याप चांगलीच टिकलेली दिसते ती म्हणजे एमपीथ्री प्लेअर्स.
हीच बाब लक्षात घेऊन ट्रान्सेन्ड या कंपनीने एमपी ३५० हे नवे मॉडेल बाजारात आणले आहे. दिसायला स्टायलिश तरीही वापरायला रफटफ, वॉटरप्रूफ असे हे मॉडेल आहे. त्याच्यावर असलेले कव्हर विविध प्रकारच्या ऋतूंमध्ये त्याचे व्यवस्थित रक्षण करते.
या एमपीथ्रीमध्ये एका फिटनेस ट्रॅकरचीही सोय करण्यात आली आहे. त्यात तुम्हाला तुमचे फिटनेस लक्ष्य नोंदवून त्यानुसार तुमचा वर्कआऊट करता येईल. त्याला एक स्पोर्टस् क्लिप असून त्यामुळे शर्टला खिशाजवळही तो अडकवता येऊ शकतो. इझी ग्रिप हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़. त्याचबरोबर व्यवस्थित वाचता येऊ शकेल, अशा एलईडी डिस्प्लेची सोयही यामध्ये आहे.
आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. त्यामुळे पावसात भिजतानाही गाणी ऐकण्याचा आनंद लुटण्यासाठी या उपकरणाचा विचार करण्यास हरकत नाही.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. २,६५०/-

रफटफ टॅब्लेट : पॅनासॉनिक जेटी- बी१
टॅब्लेट हा येणाऱ्या काळात सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार असेल. टॅब्लेटने सध्या लॅपटॉप किंवा नोटबुक्सच्या विक्रीला मोठाच तडाखा दिला आहे. येत्या काही दिवसांत हळूहळू मोबाइलचा वापरही कमी होईल आणि संवादासाठी मोबाइलऐवजी टॅब्लेटचाच वापर केला जाईल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे.
पण अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्यांना टॅब्लेट हा चांगला पर्याय ठरत नाही. कारण तो वापरण्याच्या दृष्टीने अतिशय नाजूक असतो. म्हणूनच समुद्रावरच्या तेलविहिरीवर काम करणारे, किंवा वाळवंटामध्ये काम करणारे इंजिनीअर्स यांना नजरेसमोर ठेवून अतिशय रफटफ असा जेटी – बी १ हे टफपॅड पॅनासॉनिक या विख्यात कंपनीने बाजारात आणले आहे. सात इंच आकाराचे हे टफपॅड अँड्रॉइडच्या जेली बीन या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करते. वापरायला सोपे आणि ने- आण करायला टफ अशी त्याची रचना आहे. अगदी भरदिवसा उन्हामध्येही त्याचा डिस्प्ले अतिशय उत्तम दिसतो. त्यावर सर्व बाबी व्यवस्थित वाचता किंवा पाहाता येतात. त्यासाठी १.५ गिगाहर्टझ् डय़ुएल कोअर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. शिवाय तो तुटणे, फुटणे आदींपासून
संरक्षितही आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ६९,०००/-