अन्न, वस्त्र, निवाऱ्यानंतर आरोग्य हा सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय. आजच्या बदलत्या युगात आरोग्य सेवेतही बरेच बदल झाले आहेत. पूर्वीची फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोठय़ा शहरात तरी अभावानेच आढळते. पूर्वी आजारी पडल्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे विश्वासाने घेऊन आपण बरे होत होतो. पण आज ही परिस्थिती बदलली आहे. डॉक्टर प्रत्यक्ष औषधे देण्याऐवजी आता प्रिस्क्रिप्शन लिहून देतात. कधी कधी चाचण्याही करायला सांगतात. आणि इथेच आज आपण पाहणार असलेल्या अ‍ॅपची गरज सुरू होते.
आज आरोग्य सेवेचे पूर्ण व्यावसायिकीकरण झालेले आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेली एखाद्या कंपनीची औषधे खूपच महाग असतात, त्याच वेळी दुसऱ्या कंपनीने उत्पादित केलेले तेच औषध खूप कमी किमतीतही मिळू शकते. कंपन्यांनी किती नफा घ्यायचा, जाहिराती, प्रसिद्धी, प्रमोशन करण्यासाठी किती खर्च करतात यावर औषधांच्या किमती ठरतात! त्यातील कच्चा माल आणि प्रक्रियांवर नव्हे. त्यामुळे डॉक्टरांनी एखाद्या कंपनीचे महागडे औषध लिहून दिले असेल आणि दुसऱ्या चांगल्या कंपनीचे तेच औषध स्वस्तात मिळत असल्यास ते घ्यावे का, हे आपण डॉक्टरांना विचारू शकतो. १ एमजी- सेव्ह ऑन मेडिसिन/ लॅब टेस्ट (1 mg-Save on Medicine/ Lab Tests) हे नाव असलेल्या अ‍ॅपची आज थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. या उपयुक्त अ‍ॅपमध्ये औषधांची ओळख, ती कोणत्या आजारांवर दिली जातात, औषधांचे साइड इफेक्ट्स याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपले आरोग्याबद्दलचे प्रश्न आपण पॅनेलवरील डॉक्टरांना विचारू शकतो ज्याची हे डॉक्टर्स ऑनलाइन उत्तरे देतात. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला औषधे घेण्याच्या वेळांसाठी रिमाइंडरही लावता येतो.
हे सर्व असले तरी या अ‍ॅपचा मुख्य उपयोग म्हणजे डॉक्टरांनी सांगितलेली औषधे किंवा टेस्ट दुसऱ्या कोणत्या कंपन्या किंवा लॅब्ज काय काय किमतीत देत आहेत याची यादी देतात. उदाहरणार्थ, ताप-सर्दी-डोकेदुखीसाठी सामान्यत: क्रोसिनसारखे औषध घेतले जाते. औषधाचे नाव अ‍ॅपवर टाकल्यास औषध कोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध असते (उदाहरणार्थ, गोळ्या, लिक्विड, सस्पेन्शन, इंजेक्शन, इत्यादी) आणि असल्यास त्याच्या वेगवेगळ्या उपलब्ध पॉवर्स यांची यादी दिसते. त्याचप्रमाणे आपण बघत असलेल्या औषधामध्ये कोणते जेनेरिक औषध वापरले गेले आहे, उदाहरणार्थ, क्रोसिनमधील पॅरासिटेमॉल ५०० मिग्रॅ या जेनेरिक औषधाचे नाव सांगून क्रोसिनला इतर कंपन्यांची कुठली पर्यायी औषधे आहेत, त्यांच्या किमती क्रोसिनपेक्षा किती टक्के जास्त किंवा कमी आहेत या माहितीसह त्यांची यादी दाखवली जाते.
जेव्हा तुम्हाला एखादे औषध दीर्घकाळ घ्यायचे असेल (उदाहरणार्थ, मधुमेह, रक्तदाब इत्यादींवरील औषधे) त्या वेळी किमतीतला फरक महत्त्वाचा ठरू शकतो. आपण कमी किमतीचा पर्याय निवडतो त्या वेळी सदर कंपनी खात्रीलायक आहे किंवा नाही याबद्दल सतर्क राहणे चांगले. ही माहिती तुम्हाला डॉक्टर्स आणि फार्मासिस्ट देऊ शकतात. आजच्या काळात ज्या वेळी वैद्यकीय खर्च सतत वाढत आहेत तेव्हा हे अ‍ॅप वापरून तुम्हाला त्या खर्चामध्ये थोडासा दिलासा मिळू शकेल अशी खात्री वाटते.
मनाली रानडे manaliranade84@gmail.com