देशातील सर्वाधिक मोबाइल वापरकर्ते ग्रामीण भागात राहत असून त्यांच्याकडून कमी किमतींच्या मोबाइलची मोठी मागणी केली जात आहे. या ग्राहकांना इंग्रजी भाषा वापरण्यात अडचणी येत असल्याने त्यांच्यासाठी स्थानिक भाषेच्या मोबाइलची सर्वाधिक गरज निर्माण झाली होती. हे संधी लक्षात घेऊन लाव्हा इंटरनॅशनल कंपनीने भारतातील स्थानिक भाषांचा समावेश असलेल्या ‘केकेटी अल्ट्रा प्लस युनिऑन’ या मोबाइल हँडसेटची निर्मिती केली. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया अभियाना अंतर्गत तयार केलेल्या या हँडसेटमध्ये देशातील २२ भारतीय भाषांचा समावेश करण्यात आला आहे. या मोबाइल हँडसेटवरून भारतीय भाषांमध्ये एसएमएस करणे तसेच इतर पर्याय वापरणे सहज शक्य झाले आहे. इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी, आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, कन्नड, कश्मिरी, मैथिली, मणिपुरी, मल्याळम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळ, तेलगु आणि उर्दू या भारतीय भाषांचा यात समावेश करण्यात आला असून या मोबाइलची किंमत अवघी १५०० रुपये इतकी आहे.
‘केकेटी अल्ट्रा प्लस युनिअर’विषयी..
वापरण्यासाठी सोयीचा असणाऱ्या या फोनच्या हँडसेटची स्क्रीन २.४ इंचाची असून त्यात डय़ुअल सिमची सुविधा, जीएसएम ऑपरेटिंग फ्रीक्वेन्सी तसेच १८ तासांचा टॉक टाइम असणारी १७५० एमएएच लियॉन बॅटरी, व्हीजीए कॅमेरा या सुविधा त्यात देण्यात आल्या आहे. यामध्ये वायरलेस एफएम सेवा, ३.५ मिमी ऑडिओ जॅकच्या माध्यमातून ऑडियो-व्हीडिओ प्लेबॅकचा पर्यायही या फोनमध्ये देण्यात आले आहे. शिवाय डय़ुअल चार्जिग सुविधेमुळे हा फोन पिन चार्जर आणि यूएसबी केबल अशा दोन्ही माध्यमांतून हा फोन चार्ज करता येतो. कॉल फीचर्समध्ये हँडस् फ्री मोड आणि ऑटो रिडायल या सुविधांचा समावेश आहे. शिवाय ब्ल्यूटूथही यात उपलब्ध आहे.
भाषांचा अडथळा ओलांडावा
‘केकेटी अल्ट्रा प्लस युनियन’ फोनच्या सादरीकरणासाठी लाव्हा इंटरनॅशनलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि प्रोडक्ट हेड गौरव निगम उपस्थित होते. मौल्यवान तंत्रज्ञान देशातील नागरिकांना सहजी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असून त्या अनुशंगाने या हँडसेटची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या हँडसेटच्या मदतीने ग्राहकांनी भाषांचा अडथळा ओलांडावा आणि आपल्या आप्तस्वकियांशी संपर्क साधावा. आपल्या भावना आपल्या मातृभाषेत व्यक्त कराव्यात, असे ते म्हणाले.