टीव्हीवर जाहिराती आल्या की त्या अनेकदा म्यूट केल्या जातात. पण जाहिरातदारांचा ओढा आजपर्यंत टीव्ही वाहिन्यांकडेच होता. मात्र आता देशात स्मार्टफोन वापरकर्त्यांची संख्या वाढू लागल्यामुळे टीव्हीचा मोर्चा डिजिटल माध्यमाकडे वळू लागला आहे. यामुळेच आजमितीस जगभरात एका सेकंदाला दोन लाखांहून अधिक यूटय़ूब व्हिडीओज पाहिले जातात. या प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरातदारांनाही आपला मोर्चा टीव्हीकडून डिजिटल माध्यमाकडे वळविण्यास सुरू केला आहे. अडोबे या कंपनीने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. पाहू या हा अहवाल काय सांगतो.

सध्या तरुणाईला ‘टीनएजर्स’वरून ‘स्क्रीनएजर्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आजची तरुणाई दिवसाचे किमान दहा तास स्क्रीनसमोर असते. यामुळे या ‘स्क्रीनएजर्स’ तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध ब्रॅण्ड्सनी यापूर्वीच प्रयत्न केले आहेत. मात्र आता स्क्रीनसमोर बसणाऱ्यांची संख्या वाढू लागल्यामुळे त्यांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या विविध क्लृप्त्या लढवू लागल्या आहेत. यासाठी जाहिरात

कंपन्याही त्यांना मदत करू लागल्या आहेत. यामुळे सध्या बाजारात डिजिटल जाहिरातींना विशेष प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. ग्राहकांच्या इंटरनेटवापरानुसार त्यांना जाहिराती दाखविल्या जाण्याचा नवा ट्रेण्ड सध्या या बाजारात

दिसू लागला आहे. म्हणजे एखादा वाचक विम्याशी संबंधित लेख वाचत असेल किंवा व्हिडीओज पाहात असेल तर त्या वापरकर्त्यांला विम्याशी संबंधित जाहिराती उपलब्ध करून दिल्या जाऊ लागल्या आहेत. यामुळे तो वापरकर्ता साहजिकच ती जाहिरात पाहतो यामुळे डिजिटल जाहिराती पाहणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. तर वापरकर्तेही आपल्या आवडीच्या विषयांच्या जाहिराती दाखवाव्यात म्हणून सूचना करू लागले आहेत.

अडोबेच्या अहवालानुसार सुमारे ७५ टक्के भारतीय वापरकर्ते त्यांना आवडणाऱ्या (पर्सन्लाइज्ड) जाहिराती पाहणे पसंत करतात. तर ६३ टक्के भारतीय संकेतस्थळे त्यांच्या आवडीनुसार दिसण्यासाठी वैयक्तिक माहिती वापरण्यास परवानगी देतात. यामुळे ते एखाद्या संकेतस्थळावर गेल्यावर त्यांना त्यांच्या आवडीचे लेख वाचावयास मिळतात किंवा व्हिडीओज पाहायला मिळतात. याचा अनुभव आपण गुगलसर्चमध्ये सातत्याने घेत असतो. याचबरोबर आता आपल्या ई-मेलमधील माहितीनुसार त्यावरील जाहिरातीही झळकू लागल्या आहेत.

तर ५९ टक्के भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांना टीव्ही, रेडिओवरील जाहिरातींपेक्षा डिजिटल जाहिराती अधिक उपयुक्त आणि पाहाव्यास वाटतात, असा तपशीलही या अहवालासमोर आला आहे. तर ७३ टक्के वापरकर्त्यांना विविध ब्रॅण्ड्सतर्फे दाखविण्यात येणाऱ्या जाहिराती उपयुक्त असतात असे वाटते. या जाहिरातींमुळे आम्हाला नवीन उत्पादनांची माहिती मिळतेच. याचबरोबर आम्ही इतर कोणत्या सेवा घेऊ

शकतो याची माहितीही मिळते, असे या वापरकर्त्यांचे म्हणणे आहे. तर या जाहिराती आणखी आकर्षक व माहितीपूर्ण व्हाव्यातअसे ६३ टक्के वापरकर्त्यांना वाटत असल्याचे या अहवालात समोर आले आहे. देशात मोबाइलचा वापर इतका वाढेल व त्यावर जाहिराती करण्यासाठी आपल्याला वेगळा निधी वापरावा लागेल याचा अंदाज अगदी मागच्या वर्षांपर्यंत नसल्याचे बाजारातील ८९ टक्के कंपन्यांनी मान्य केले.

सध्या बाजारात ठोकळेबाज जाहिरातींऐवजी प्रोग्रॅमॅटिक जाहिरातींवर विशेष भर दिला जाऊ लागला आहे. याचा वापर आयपीएलमध्येही होत असल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये जाहिराती झळकण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचेही समोर येत आहे.

आजमितीस भारतात तब्बल ३४ टक्के लोक मोबाइलवर व्हिडीओ पाहतात यातील ४१ टक्के हे १८ ते ३४ या वयोगटातील आहेत. या ‘स्क्रीनएजर्स’ना आकर्षित करण्यासाठी अनेक ब्रॅण्ड्स प्रयत्न करू लागले आहेत. यामुळे डिजिटल जाहिरातींवरील गुंतवणूक वाढू लागल्याचे प्रोग्रॅमॅटिक जाहिरात सेवा देणाऱ्या व्हटरेझ या कंपनीचे संस्थापक आशीष शाह यांनी सांगितले. ‘स्क्रीनएजर्स’ची संख्या दिवसागणिक वाढत जाणार आहे. यामुळे या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या सज्ज झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये काही सेकंदात संगणकीय गणिताच्या आधारे वापरकर्त्यांच्या आवडीच्या विषयाच्या जाहिराती झळकविणाऱ्या प्रोग्रॅमॅटिक प्रणालीला विश़्ोष प्राधान्य दिले जात आहे. यामुळे जाहिरात पाहणाऱ्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या वाढू लागल्याचेही त्यांनी नमूद केले. यामुळे भविष्यात ‘स्क्रीनएजर्स’च्या आवडीनुसार अधिकाधिक ब्रॅण्ड्स डिजिटल जाहिरातींकडे वळतील व तेथील त्यांची गुंतवणूकही वाढवतील, असे भाकीतही त्यांनी व्यक्त केले.

– नीरज पंडित @ nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com