सध्या संगणक वापरकर्त्यांना एक नवीन समस्या फार मोठय़ा प्रमाणावर सतावत आहे, ती म्हणजे संगणकावर इंटरनेट सर्फिग करताना विनाकारण येणाऱ्या जाहिराती. प्रत्येक वेळी ते जेव्हा नवीन पेज उघडतात तेव्हा नवनवीन जाहिराती त्यांच्या संगणकाच्या स्क्रीनवर त्यांना  दिसत असतात. या जाहिराती खूप मोठय़ा प्रमाणात त्यांच्या कामात व्यत्यय आणतात आणि  संगणकावर काम करणे त्यांना कठीण होते. बऱ्याचदा अशा जाहिराती घालविण्यासाठी स्क्रीनच्या विशिष्ट भागावर क्लिक केल्याखेरीज त्या जाहिराती जात नाहीत. संगणकात स्वयंचलितपणे जाहिराती प्ले, प्रदर्शित करणे अशा प्रकारे काम करणाऱ्या सॉफ्टवेअर्सना ‘अ‍ॅडवेअर’ म्हणतात. संगणक वापरकर्त्यांच्या संगणकाच्या स्क्रीनवर सतत जाहिरातींचा मारा करणं व त्याला त्यांच्या वेबसाइटवर घेऊन जाणं हे उद्दिष्ट या प्रोग्राम्सचे असते. हा मालवेअर्सचाच प्रकार समजला जातो.

सोपा उपाय : संगणकातील कुकी फाइल्स वेळोवेळी डिलिट करणे हा या विनाकारण जाहिरातींपासून सुटका मिळविण्याचा सर्वोत्तम उपाय आहे.

अ‍ॅडवेअर येण्याचे कारण :

या जाहिराती दिसण्याचे कारण ‘स्पायवेअर’ही असू शकते. ‘स्पायवेअर’ एखाद्या सॉफ्टवेअरसोबत चोरून आपल्या संगणकात प्रवेश करतात आणि स्क्रीनवर सतत जाहिराती दाखविणे, आपला यूजर आयडी आणि पासवर्ड हॅकपर्यंत पोहोचविणे, आपला ईमेल आयडी वापरून इतरांना स्पॅम मेल पाठविणे, आपला संगणक बंद पाडणे, अथवा इंटरनेट आणि संगणकाचा वेग मंदावणे अशी नुकसानदायक कामे करतात.

स्पायवेअरवर उपाय :

त्यांना नष्ट करण्यासाठी स्पायबॉट नावाचे एक मोफत सॉफ्टवेअर अतिशय गुणकारी ठरू शकते. ‘स्पायबॉट सर्च अ‍ॅण्ड डिस्ट्रॉय’ हे असेच एक ‘अ‍ॅडवेअर’ आणि ‘स्पायवेअर’ डिटेक्शन आणि ‘रिमुवल सॉफ्टवेअर’ आहे. ‘स्पायबॉट सर्च अ‍ॅण्ड डिस्ट्रॉय’ संगणकावरील ‘अँटीवायरस सॉफ्टवेअर’ला चकमा देऊन संगणकात शिरलेल्या ‘अ‍ॅडवेअर’, ‘स्पायवेअर’, ‘ट्रोजन्स’, ‘कि-लॉगर्स’ इत्यादींना हटविण्यासाठी मदत करते. ‘स्पायबॉट सर्च अ‍ॅण्ड डिस्ट्रॉय’ थोडय़ा फार ‘अँटीवायरस’ सुविधाही पुरविते जसे ‘ट्रोजन्स’, ‘रुटकीट’पासून संरक्षण. स्पायबॉट सर्च अ‍ॅण्ड डिस्ट्रॉय’चे वैशिष्टय़ असलेली ‘इम्युनाईझ’ यंत्रणा ‘स्पायवेअर’ इंस्टॉल होण्याआधीच त्यांना रोखते.

अ‍ॅडवेअरपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी काळजी घ्या 

  • आपला विश्वास असलेल्या स्रोतांवरूनच केवळ डाऊनलोड करा. जेव्हा साशंक असता, तेव्हा महत्त्वाच्या साइटसाठी विश्वसनीय बुकमार्क वापरा.
  • आपण एका ईमेलमधील दुव्याचे अनुसरण करताना काळजी घ्या. आपल्या ब्राउझरमधून थेट पत्ता प्रविष्ट करून वेबसाइटना भेट देणे चांगले.
  • ब्राउझर अपडेट त्वरेने स्थापित करा किंवा नवीनतम आवृत्तीवर स्वयंचलितपणे अपडेट करणारे ‘क्रोम’सारखे एक ब्राउझर निवडा. मालवेअर असल्याचा संशय असलेल्या एखाद्या वेबसाइटवर जाण्याचा प्रयत्न आपण केल्यास अनेक ब्राउझर आपल्याला चेतावणी देतील.
  • सावध राहा की मालवेअरदेखील ब्राऊझर अ‍ॅड-ऑनच्या रूपातदेखील येऊ शकते, त्यामुळे आपल्याला विश्वास वाटतो तेच विस्तार स्थापन करा.
  • अज्ञात प्रकारच्या फाइल्स किंवा आपण अपरिचित ब्राउझर सूचना किंवा चेतावण्या पाहिल्यास उघडू नका.

प्रा. योगेश हांडगे

(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कॉम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)