माणसांना होणाऱ्या आजारांवर उपाय म्हणून औषधं, लसी वगैरे असतात. आजार झाले की गोळ्या-काढय़ांचा भडिमार सुरू होतो. आजार होऊनच नये म्हणून खबरदारीचे काही उपायही असतातच. मुळातच शरीर निरोगी राहावं आणि काही आजार झालाच तर त्यातून लवकरात लवकर बाहेर पडता यावं यासाठी हे खबरदारीचे उपाय असतात. जी गोष्ट मानवी शरीराची तीच गोष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तूंची. खास करून कॉम्प्युटर्स, लॅपटॉप, मोबाइल फोन्सची. ज्याप्रमाणे एखादा व्हायरस माणसासाठी घातक असतो तसाच तो या यांत्रिक मेंदूंसाठीही असतो. आणि जसे इलाज एखाद्या आजारी माणसासाठी केले जातात तसेच ते यांच्यासाठीही केले जातात. आपल्यासाठी डॉक्टर असतो तसं या ‘स्मार्ट डिव्हाइसेस’साठी ‘अँटिव्हायरस सॉफ्टवेअर ’असतं. डॉक्टरांचं काम आपल्याला साधारण माहीत असतं. पण ही ‘अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्स’ काम कसं करतात?
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम असतो, जो फाइल्स स्कॅन करतो आणि त्यातील व्हायरस असणाऱ्या फाइल्स किंवा सॉफ्टवेअर्स डिलीट करतो. सामान्यत: अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्स ही दोन प्रकारे कामे करतात.
१. डेटाबेस किंवा व्हायरस डिक्शनरीमध्ये असणाऱ्या व्हायरसची डिव्हाइसमधली उपस्थिती तपासणं.
२. एखाद्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची कार्यपद्धती संशयास्पद असेल तर ती तपासणं.
हे दोन्ही प्रकार कसं काम करतात ते आपण बघू या.
व्हायरस डिक्शनरी
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्सची स्वत:ची अशी एक डिक्शनरी असते जिला डेटाबेससुद्धा म्हटलं जातं. ह्य डेटाबेसमध्ये जगभरात अस्तित्वात असणाऱ्या कॉम्प्युटर व्हायरस म्हणजेच कॉम्प्युटर कोड्स असतात. जेव्हा हे सॉफ्टवेअर फाइल तपासतं तेव्हा ते हा डेटाबेस चाळत असतं. कॉम्प्युटरमध्ये असणारा कोड म्हणजेच व्हायरस आणि डेटाबेसमध्ये असलेला कोड जर जुळत असेल तर मग पुढचं काम अँटिव्हायरस सॉफ्टवेअरकडून केलं जातं. एक तर ती फाइल डिलीट केली जाते किंवा क्वारंटाइन होते. क्वारंटाइन म्हणजे अमुक एक फाइल इतर कुठल्याही सॉफ्टवेअर्सना अ‍ॅक्सेस करता येत नाही.
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्सची ही कार्यपद्धती सक्षम ठेवायची असेल तर ठरावीक काळाने ते अपडेट करणं गरजेचं असतं. दर वर्षी साधारण ५० हजार नवे व्हायरस तयार होत असतात. अशा परिस्थितीत जर का सॉफ्टवेअर अपडेटेड नसेल तर कॉम्प्युटर आणि त्यामधल्या माहितीला थेट धोका पोहोचू शकतो.
डिक्शनरीवर आधारित अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्स हे फाइल बनवणं, उघडणं, बंद करणं आणि ईमेल करणं अशा प्रक्रिया सतत तपासत असतं. ही तपासणी करत असताना त्यामध्ये व्हायरस असेल तर पटकन निदर्शनास येतं. याशिवाय दिवसाच्या एका ठरावीक वेळी पूर्वनियोजित कॉम्प्युटरचं संपूर्ण स्कॅनिंग केलं जातं. हे स्कॅॅनिंग हार्डडिस्कमधील सर्व फाइल्स स्कॅन करतं.
अर्थात डिक्शनरीवर आधारित सॉफ्टवेअर्स ही कार्यक्षम असली तरी व्हायरसेस बनवणारी गँग ही नेहमीच एक पाऊल पुढे असते. त्यामुळे अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्स कंपन्या आणि व्हायरस गँग यांच्या कायम चढाओढ ही असणारच.
संशयास्पद हालचाली टिपणारं सॉफ्टवेअर
ही पद्धत जरा वेगळी आहे. यामध्ये व्हायरस तपासला जात नाही तर संपूर्ण कॉम्प्युटर प्रोग्रामची कार्यप्रणाली तपासली जाते. जर का एखादा प्रोग्राम (व्हायरस) दुसऱ्या कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये काही फेरफार करायची प्रयत्न करत असेल तर ते तपासण्याची ताकद या सॉफ्टवेअर्समध्ये असते. आणि तसं होत असेल तर कॉम्प्युटर नोटिफिकेशन देतो.
या अशा कार्यपद्धतीमुळेच डिक्शनरीवर आधारित सॉफ्टवेअर्सपेक्षा ही सॉफ्टवेअर्स उजवी ठरतात. कारण नवीन व्हायरस डेटाबेसमध्ये असो किंवा नसो, कॉम्प्युटर प्रोग्रामची कार्यपद्धतीच जर का संशयास्पद वाटली तर लगेचच ते कळून येतं. पण या पद्धतीचा तोटा असा की यामुळे युजर्सना सतत अ‍ॅक्सेप्ट-कॅन्सलचा खेळ खेळावा लागतो.
या दोन पद्धतींपेक्षा दुसरी पद्धती म्हणजे सॅण्डबॉक्स. ऑपरेटिंग सिस्टम लोड होत असतानाच अशा पद्धतीची सॉफ्टवेअर्स सिस्टम तपासतात. त्याशिवाय युजरने सांगितल्याशिवाय ही सॉफ्टवेअर्स कामकाज सुरू करत नाहीत.
अँटिव्हायरस सॉफ्टवेअर्स कॉम्प्युटरमध्ये असणं हे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. ही सॉफ्टवेअर्स साधारण कशी काम करतात, ते आपण पाहिलं. पण इतकी ढिगाने सॉफ्टवेअर्स उपलब्ध असताना योग्य असा अँटिव्हायरस कसा निवडायचा हेसुद्धा आपण बघणार आहोत.

गुगल खात्याची सुरक्षा
गुगलवरील खाते हे सध्या एखाद्या बँक खात्याइतकेच महत्त्वाचे बनले आहे. घरातल्या संगणकापासून कार्यालयातील संगणकापर्यंत आणि स्मार्टफोनपासून लॅपटॉपपर्यंतच्या प्रत्येक उपकरणावर गुगलच्या खात्यानिशी ‘लॉगइन’ केले जात असल्याने व एकाच खात्याच्या आधारे ही सर्व उपकरणे एकमेकांशी ‘सिंक’ अर्थात ‘समरूप’ करण्यात येत असल्याने या खात्यावर वापरकर्त्यांची संपूर्ण माहिती, डेटा जमा असतो. अशा परिस्थितीत हे खाते दुसऱ्या कुणाच्या हातात पडले किंवा हॅक झाले तर वापरकर्त्यांसाठी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण या खात्यांच्या माध्यमातून हॅकर्स केवळ वापरकर्त्यांची वैयक्तिक माहितीच नव्हे तर त्याच्या आर्थिक व्यवहारांची, बँक खात्यांची, एवढेच नाही तर त्याच्या मित्रमंडळींची माहितीही चोरू शकतात. त्यामुळे गुगल खात्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे अतिशय महत्त्वाचे आहे. गुगलनेही वापरकर्त्यांसाठी सुरक्षिततेशी संबंधित अनेक सुविधा पुरवल्या आहेत. अशाच काही उपायांवर एक दृष्टिक्षेप-
’ गुगलचे खाते हाताळताना अडचण येत असल्यास त्या उपकरणावरील ‘फायरवॉल’ किंवा ‘अँटिव्हायरस प्रोग्रॅम’ बंद करून पाहा. जर खाते व्यवस्थित काम करीत असल्यास संबंधित सॉफ्टवेअरमध्ये काही तांत्रिक दोष असल्याचे समजा.
’ तुमचे गुगल खाते अचानक ‘लॉक’ झाल्यास ते खाते पुन्हा खुले करता यावे, यासाठी गुगलने ‘रिकव्हरी मेल’ची सुविधा दिलेली आहे. या सुविधेचा वापर करा.
’ खात्याची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी वेळोवेळी त्याचा पासवर्ड बदला.
’ गुगल अकाऊंटच्या वेबपेजवर ‘सिक्युरिटी चेकअप’चा पर्याय असतो. या पर्यायाचा वापर करून आठवडय़ातून किमान एकदा आपल्या खात्याची सुरक्षा तपासून पाहा.
’ ‘गुगल प्लस’च्या खात्यात विविध ‘सर्कल’मधील व्यक्तींची नोंद असते. ही मंडळी तुमच्या ‘गुगल प्लस’ सर्कलमध्ये कोण कोण आहेत, हे पाहू शकतात. हे टाळण्यासाठी स्क्रीनच्या डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात असलेल्या मेनूमध्ये जाऊन ‘प्रायव्हसी सेटिंग’मध्ये जा. तेथून तुम्हाला कोणत्या व्यक्तींना तुमचे ‘सर्कल’ पाहता येईल, हे ठरवता येईल.
’ तुमच्या गुगल खात्यात तुम्ही एकापेक्षा अधिक ई-मेलची नोंद करू शकता. त्याआधारे तुम्ही ही सर्व ई-मेल एकमेकांशी जोडूही शकता.
’ तुमच्या मोबाइलमधील कोणकोणते अ‍ॅप गुगल खात्याचा वापर करतात हे जाणून घेण्यासाठी ‘कनेक्टेड अ‍ॅप्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिसेस’ हा पर्याय निवडून ‘अकाऊंट परमिशन्स’ तपासून पाहा.

पुष्कर सामंत pushkar.samant @gmail.com