24 November 2017

News Flash

‘आयफोन ८’ची उत्कंठा शिगेला

‘आयफोन ८’च्या सादरीकरणासाठी जागतिक व्यासपीठ सज्ज झालं आहे.

 आसिफ बागवान | Updated: September 12, 2017 6:06 PM

‘आयफोन ८’च्या सादरीकरणासाठी जागतिक व्यासपीठ सज्ज झालं आहे.

‘अ‍ॅपल’चा कोणताही जागतिक कार्यक्रम होण्याचे जाहीर होताच, त्यात काय असेल, कोणता फोन वा ऑपरेटिंग सिस्टीम सादर केली जाईल, कंपनी आगामी काळात काय नवीन उत्पादन आणणार आहे, आदींची चर्चा सुरू होते. यंदा ही चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू असून त्याची उत्तरे आज, मंगळवारी रात्री आपल्याला मिळणार आहेत. ‘आयफोन ७’ बाजारात दाखल झाल्यानंतर होत असलेल्या या परिषदेत साहजिकच ‘आयफोन ८’ची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, ‘आयफोन ८’ हा याच नावाने जाहीर होईल की त्याचे नाव काहीतरी वेगळे असेल, याबाबतही यंदा उत्कंठा आहे.

‘आयफोन’ या नावाभोवती इतकं मोठं वलय आहे की, स्मार्टफोनच्या जगतातील तो जणू ‘सुपरस्टार’च! एखाद्या प्रसिद्ध सिनेकलाकाराने नवीन चित्रपटात काम करण्यास सुरुवात करण्याआधीपासूनच त्या चित्रपटाची चर्चा सुरू होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच त्यातील विविध बाबींवर समाजमाध्यमांत चर्चा झडते आणि सरतेशेवटी चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा पहिल्या शोपासून प्रेक्षकांची तोबा गर्दी उसळते. ‘आयफोन’चं अगदी तसंच आहे.

‘अ‍ॅपल’चा हा मोबाइल स्मार्टफोन असला तरी कुणी त्याला ‘स्मार्टफोन’ म्हणत नाही. कारण, ‘स्मार्टफोन’ म्हटलं की त्याला बाजारातील सर्वच स्मार्टफोनच्या पंगतीत आणून बसवल्यासारखं होतं आणि ‘आयफोन’ हा तर एकमेव. म्हणूनच ‘आयफोन’ची उत्कंठा आणि चर्चा त्याच्या आगमनाच्याच काय पण निर्मितीच्या आधीपासूनच सुरू झालेली असते. आतापर्यंत ‘अ‍ॅपल’ने सादर केलेल्या ‘आयफोन’च्या प्रत्येक नव्या आवृत्तीच्या निमित्ताने आपल्याला ही गोष्ट लक्षात आली असेलच. इतकंच काय, आयफोनची एक नवीन आवृत्ती बाजारात दाखल होत असते, तेव्हा त्यापुढच्या आवृत्तीमध्ये काय असेल, याचे अंदाज आणि दावे सुरू झालेले असतात. एकूणच ‘आयफोन’ला स्मार्टफोनच्या दुनियेत अढळपद बहाल करण्यात आलेलं आहे. अन्य कोणत्याही कंपनीने कितीही उत्कृष्ट स्मार्टफोन बाजारात आणला, तरी आयफोनबद्दलची लोकप्रियता कमी होत नाही. मंगळवारी, १२ सप्टेंबर रोजी ‘आयफोन ८’ची घोषणा होणार असल्याच्या बातमीनं सगळय़ा समाजमाध्यमांत आठवडाभरापासून चर्चेला ऊत आला आहे.

खरं तर, कॅलिफोर्नियातील कूपर्टिनो येथील अ‍ॅपलच्या नव्या संकुलातील ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मध्ये भारतीय वेळेनुसार रात्री साडेदहाच्या सुमारास होत असलेल्या अ‍ॅपलच्या परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत ‘आयफोन ८’चा उल्लेखही नाही. किंबहुना ‘आयफोन’ सादरीकरणासाठी आयोजित करण्यात आलेल्या आजवरच्या कोणत्याही परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेत ‘अ‍ॅपल’नं तसा उल्लेख केलेला नाही. त्यामुळेच यंदाची परिषद ही ‘आयफोन ८’बाबतच असणार, असे अंदाज बांधले जात आहेत. आजवरच्या अ‍ॅपलच्या कोणत्याही ‘वार्षिक सप्टेंबर प्रदर्शन’ परिषदेची जितकी उत्सुकता दिसते, तितकीच उत्सुकता यंदाही आहे. विविध संकेतस्थळांनी ही परिषद ‘लाइव्ह’ प्रक्षेपित करणार असल्याची जाहिरातबाजी सुरू केली आहे. जगभरातील वृत्तवाहिन्यांच्याही नजरा या परिषदेकडे लागल्या आहेत. एकूणच ‘आयफोन ८’च्या सादरीकरणासाठी जागतिक व्यासपीठ सज्ज झालं आहे.

‘आयफोन ८’मध्ये काय असेल, याबाबत इंटरनेटच्या महाजालात धुंडाळल्यास असंख्य शक्यता आणि दावे पाहायला मिळतात. त्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे ‘आयफोन ८’ हा ‘आयफोन ८’ म्हणून नव्हे तर, ‘आयफोन एक्स’ म्हणून सादर केला जाईल! ‘अ‍ॅपल’चा पहिला आयफोन निर्माण झाल्याला यंदा नोव्हेंबरमध्ये दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळेच ‘आयफोन ८’ला ‘आयफोन एक्स’ या नावाने सादर करण्यात येईल, अशी शक्यता आहे. त्याचवेळी ‘आयफोन एक्स’ आणि ‘आयफोन ८’ असे दोन वेगवेगळे फोन या परिषदेत दाखवले जातील, अशीही चर्चा आहे. याखेरीज ‘आयफोन ७ एस’ आणि ‘आयफोन ७ एस प्लस’ हेदेखील मंगळवारच्या परिषदेत जाहीर केले जातील. एवढेच नव्हे तर, अ‍ॅपलचा ‘फोर के अ‍ॅपल टीव्ही’, अ‍ॅपलचा स्मार्ट स्पीकर ‘होमपोड’ यांचेही या परिषदेत सादरीकरण केले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

मंगळवारच्या परिषदेचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, ही परिषद पहिल्यांदाच अ‍ॅपलच्या नव्या संकुलात पार पडत आहे. कॅलिफोर्नियातील कूपर्टिनो येथे अंतराळ यानाच्या आकारात उभारण्यात आलेल्या अ‍ॅपलच्या मुख्यालयाच्या तळघरातील ‘स्टीव्ह जॉब्स थिएटर’मध्ये हा कार्यक्रम होणार आहे.

‘आयफोन ८’ची घोषणा मंगळवारी होणार असली, तरी तो प्रत्यक्षात आणखी आठवडाभरानंतर बाजारात दाखल होईल. आजवरचे सर्व आयफोन शुक्रवारी बाजारात आले. त्याच शिरस्त्याप्रमाणे ‘आयफोन ८’ किंवा ‘आयफोन एक्स’ २२ सप्टेंबर रोजी ग्राहकांच्या हाती मिळेल, असे सांगण्यात येत आहे. ‘आयफोन ८’च्या निर्मितीत काही अडचणी उद्भवल्यामुळे त्याचे सादरीकरण आणि बाजारप्रवेश लांबणीवर पडेल, अशीही चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत होती. परंतु, ‘अ‍ॅपल’ने याचा इन्कार केला आहे.

‘आयफोन ८’ संपूर्ण जगभरातील बाजारांत एकाच वेळी उपलब्ध होईल. खरंतर आयफोनच्या गेल्या दोन-तीन आवृत्त्यांपासून अ‍ॅपलने भारतालाही आपली बाजारपेठ मानण्यास सुरुवात केली. त्याआधी ‘आयफोन’ची जास्त किंमत भारतीय ग्राहकांना खरेदीपासून परावृत्त करेल, अशी भीती अ‍ॅपलला होती. परंतु, गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनच्या दुनियेत भारतीय बाजारपेठ अव्वल स्थानी येऊ लागल्याने ‘आयफोन’ही भारतीय बाजाराला आपलंसं करू पाहात आहे. सरासरी भारतीय ग्राहकांच्या दृष्टीने ‘आयफोन’ अजूनही महाग असला, तरी तो श्रीमंती आणि प्रतिष्ठेचे मानचिन्ह बनला आहे. त्यामुळे ‘आयफोन’च्या ग्राहकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्यावर्षी अ‍ॅपलच्या जागतिक विक्री व नफ्याने १५ वर्षांतील पहिली घसरण नोंदवली असताना, भारतात आयफोनच्या विक्रीत ५० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. यातूनच आयफोनचे भारतीयांशी नाते घट्ट होत चालले आहे, हे दिसून येते. त्यामुळे मंगळवारी रात्री साडेदहा वाजता होणाऱ्या अ‍ॅपलच्या परिषदेकडे भारतीयांचेही डोळे लागले नसतील तर नवलच!

‘आयफोन ८’मध्ये काय?

‘आयफोन ८’मध्ये वायरलेस चार्जिगची सुविधा असेल अशी चर्चा आहे. याशिवाय फेशियल रेकग्निशन, काठविरहित डिस्प्ले अशी वैशिष्टय़े यात असतील. तसेच या फोनमध्ये ‘होम बटण’ नसेल व स्क्रीनच्या खाली ‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल, अशीही चर्चा सुरू आहे.

‘आयफोन ८’ किती रुपयांत?

‘आयफोन ८’च्या दराबाबत येत्या काही तासांत उलगडा होणार असला तरी तो साधारण ९९९ डॉलरमध्ये अमेरिकी बाजारात उपलब्ध होईल, अशी चर्चा आहे. भारतात हा फोन साधारणपणे ६३ ते ६५ हजारांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आयफोन ७च्या तुलनेत आयफोन ८ किमान ४० टक्के महाग असेल, असेही सांगण्यात येत आहे.

आयफोनचा प्रवास

मॉडेल                सादरीकरण तारीख

ओरिजनल                          ९ नोव्हेंबर २००७

थ्रीजी                                  ११ जुलै २००८

थ्रीजी एस                           १९ जून २००९

४                                        २४ जून २०१०

४ एस                                 १४ ऑक्टोबर २०११

५                                        २१ सप्टेंबर २०१२

५ एस / ५ सी                     २० सप्टेंबर २०१३

६ / ६ प्लस                       १९ सप्टेंबर २०१४

६ एस / ६ एस प्लस          २५ सप्टेंबर २०१५

एसई                                 ३१ मार्च २०१६

७                                     १६ सप्टेंबर २०१६

 आसिफ बागवान –  asif.bagwan@expressindia.com

First Published on September 12, 2017 4:51 am

Web Title: apple to launch iphone 8 soon
टॅग Iphone 8