14 December 2017

News Flash

खरी ओळख

वास्तवाप्रमाणेच सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतही अशाच प्रकारचा खटाटोप करावा लागतो.

पुष्कर सामंत | Updated: April 18, 2017 2:29 AM

प्रातिनिधिक छायाचित्र.

स्वत:चं अस्तित्व, ओळख निर्माण करण्यासाठी माणूस आयुष्यभर झटत असतो म्हणे. म्हणजे एखाद्या विशिष्ट क्षेत्रात नाव कमावणं हे मोठं जिकिरीचं काम आहे. क्षेत्र जितकं मोठं तितकं नाव कमावणं कठीण. शाळेत असताना एकाच नावाची दोन-तीन मुलं असली की घोळ व्हायचा. नेमकं कोणत्या नावाच्या रमेशला हाक मारली हे काही कळायचं नाही. कदाचित नाव कमावण्याचा आणि अस्तित्व निर्माण करण्याचा सारा मामला तिथूनच सुरू होत असावा.

वास्तवाप्रमाणेच सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतही अशाच प्रकारचा खटाटोप करावा लागतो. म्हणजे त्या दुनियेत जन्म घेतला की त्यानंतर स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. त्यात पुन्हा स्वत:ची कंपनी किंवा एखादा ब्रँड असेल तर मग ही ओळख निर्माण करावीच लागते. हे ओळखूनच फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सनी व्हेरिफाइड अकाऊंट्स नावाची संकल्पना सुरू केली आहे. सोश ल मीडियाच्या आभासी दुनियेत आपल्याला हवी असणारी नेमकी आणि खरी व्यक्ती (सामान्यत: महनीय किंवा ख्यातनाम) किंवा ब्रँड किंवा कंपनी कुठली हे कळण्यासाठी या संकल्पनेचा किंवा सुविधेचा वापर केला जातो. नावाच्या पुढे निळी खूण किंवा ब्लू टिकमार्क असणं हे अकाऊंट व्हेरिफाइड असल्याचं आणि पर्यायाने आयुष्यात ओळख निर्माण झाल्याचं लक्षण मानलं जातं. फेसबुकपेक्षा ट्विटरवर अशी निळी खूण असणे  विश्वासार्हतेचं प्रतीक मानलं जातं.

जेव्हा या सोशल नेटवर्किंग साइट्सनी ही सुविधा सुरू केली तेव्हापासूनच आपल्या अकाऊंटवर ही निळी खूण आणणं हे एक सोशल स्टेट्स बनू लागलं. पण त्यापलीकडे असणारा एक फायदा म्हणजे आभासी दुनियेत एक ठोस अशी ओळख बनते. थोडक्यात सांगायचं तर त्या आभासी दुनियेतले आपण हे खरोखरच आपण आहोत हे ती निळी खूण दर्शवते. हे म्हणजे अंदाज अपना अपना सिनेमातल्या ‘मार्क इधर है, मैं हू तेजा’ या संवादासारखं आहे. असो. सध्याच्या घडीला जनमानसापर्यंत आणि सेलिब्रेटीजसाठी विशेषत: तरुणाईपर्यंत स्वत:चा आवाज पोहोचवण्यासाठी हे एक उत्तम माध्यम आहे. मार्केटिंग आणि स्वत:चा उद्योगधंदा विस्तारण्यासाठी हे असं व्हेरिफाइड अकाऊंट खरोखर उपयोगी ठरतं. त्यामुळे तुमचा स्वत:चा असा एखादा छोटासा व्यवसाय असेल तर असं व्हेरिफाइड अकाऊंट तुमच्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

ट्विटरकडून या सगळ्या माहितीची पडताळणी केली जाईल आणि मिशन स्टेटमेंटची विचारणा केली जाईल. कदाचित या प्रक्रियेमध्ये तुम्हाला ओळखपत्रांच्या स्कॅन कॉपीची विचारणा होणार नाही. हे सगळं झालं की लवकरच ट्विटरकडून तुम्हाला व्हेरिफिकेशन पूर्ण झालं की नाही याबाबतचा ईमेल येईल. जर का व्हेरिफिकेशन नाकारलं गेलं तर ईमेल मिळाल्यापासून ३० दिवसांनंतर पुन्हा प्रयत्न करता येऊ  शकतात. ट्विटर कोणती अकाऊंट्स व्हेरिफाय करते आणि कोणत्या आधारावर करते हे गुलदस्त्यातच आहे. पण सर्वासाठी व्हेरिफिकेशनची प्रक्रिया मात्र हीच आहे. त्यामुळे तुम्हीही ही प्रक्रिया अवलंबून बघू शकता.

ट्विटर अकाऊंट व्हेरिफिकेशन कसं करायचं

अकाऊंट व्हेरिफिकेशनसाठी ट्विटरने एक नियमावली घालून दिलेली आहे. आणि त्या नियमावलीनुसार जर एखादं अकाऊंट असेल तर ते व्हेरिफाय होण्याची शक्यता जास्त असते. साधारण आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींची यादी खाली देत आहोत.

* तुमच्या नावाशी जवळीक साधणारं असं ट्विटर अकाऊंटचं नाव.

* अधिकृत मोबाइल किंवा फोन नंबर

* निश्चित असा ईमेल आयडी. (कार्पोरेट किंवा कंपनीचं अकाऊंट असेल तर तो ईमेल आयडी वापरावा)

* अकाऊंटवर सविस्तर माहिती. उदा. स्वत:चं क्षेत्र, उद्योग, व्यवसाय स्वत:बद्दलची अवांतर माहिती वगैरे.

* स्वत:चा किंवा कंपनीच्या लोगोचा खराखुरा फोटो. (खराखुरा हा शब्दप्रयोग करण्याचं कारण म्हणजे भलताच फोटो वापरला तर साहजिक अकाऊंट व्हेरिफाय होणार नाही.)

* हेडर फोटो. फेसबुकवर जसा कव्हर फोटो असतो तसा हेडर फोटो ट्विटरवर ठेवावा. कंपनी असेल तर त्या ब्रँडची माहिती चित्ररूपात देणारा फोटो वापरला जाऊ  शकतो.

* जन्म तारीख. (कंपनी, ब्रँड असेल तर त्याची आवश्यकता नाही.) वेबसाइटची लिंक देणं महत्त्वाचं ठरतं.

* ट्विटरच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये ट्वीट्स ‘पब्लिक’ अशी सेट केलेली असावीत.

* स्वत:बद्दलची माहिती देणारा एक निबंध. एखाद्या क्षेत्रात तुम्ही केलेली भरीव कामगिरी त्या निबंधामध्ये विशद करू शकता. आणि ट्विटरने तुम्हाला व्हेरिफाय का करावं हेही त्या निबंधामध्ये नमूद करावं. ज्याला मिशन स्टेटमेंट असं म्हणतात.

* सरकारी ओळखपत्राची स्कॅन कॉपी. पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे.

* या सगळ्याची जुळवाजुळव झाली की verification.twitter.com या वेबसाइटवर जायचं आणि टप्प्याटप्प्याने फॉर्म भरायचा.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com

First Published on April 18, 2017 2:29 am

Web Title: article about verified social media account