मोबाइलमध्ये दोन कॅमेरे असताताच. एक पुढे आणि एक मागे. पण अलीकडे बाजारात आलेल्या बहुतांश स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेरे दिसू लागले आहेत. डय़ुअल कॅमेरा ही नव्या स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ बनले आहे. पण डय़ुअल कॅमेरा कशासाठी? त्याचा नेमका उपयोग काय?

कॅमेरा हे स्मार्टफोनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. प्रत्यक्ष कॅमेरा जवळ असला तरी स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहक चांगल्या क्षमतेचा, जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनला पसंती देत असतात. त्यामुळे मोबाइल बनवणाऱ्या कंपन्या नवीन स्मार्टफोन निर्माण करताना त्याच्या कॅमेऱ्यावर विशेष लक्ष देत असतात. यातच आता नवीन कल दिसू लागला आहे, तो म्हणजे डय़ुअल कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा. कोणत्याही स्मार्टफोनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी किंवा बॅक आणि फंट्र असे दोन कॅमेरे असतातच; परंतु, अलीकडच्या काळात पुढच्या बाजूस कॅमेरा पुरवण्यासोबतच मागील बाजूस दोन कॅमेरे असलेले स्मार्टफोन बाजारात येत आहेत. मागील बाजूस दोन वेगवेगळ्या मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे पुरवण्यापेक्षा जास्त मेगापिक्सेलचा एकच कॅमेरा पुरवला असता तर काय बिघडले असते, असा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकाला पडतोच. तसेच मागील बाजूस असलेला एक कॅमेरा व्यवस्थितपणे काम करत असताना आता दोन कॅमेऱ्यांमुळे काय फरक पडणार, असा प्रश्न ग्राहक विचारतातच. त्यामुळेच या लेखात आपण डय़ुअल कॅमेऱ्याबाबत जाणून घेऊ.

डय़ुअल कॅमेरा कुठे असतो?

स्मार्टफोनच्या मागील बाजूस पाहिले असता आपल्याला कॅमेऱ्याची लेन्स दिसते. ही लेन्स दिसून येते. स्मार्टफोनच्या एकूण हार्डवेअरमध्ये कॅमेऱ्याला खूपच कमी जागा असते. स्मार्टफोनची जाडी कमी ठेवण्यासाठी छोटा कॅमेरा असणे आवश्यक असते. या छोटय़ा कॅमेरा मॉडय़ुलमध्ये लेन्सशी संबंधित भाग, इमेज सेन्सर अशी सूक्ष्म उपकरणे बसवली जातात.

डय़ुअल कॅमेऱ्यामध्ये फोनच्या मागील बाजूस दोन लेन्स असतात. या लेन्स आडव्या किंवा उभ्या रेषेत एकमेकांच्या शेजारी बसवण्यात आलेल्या असतात. अशा प्रकारे फोनमध्ये दोन कॅमेरा मॉडय़ुल बसवता येतात. साहजिकच दोन मॉडय़ुलमुळे कॅमेऱ्याच्या छायाचित्रणाचा दर्जा उंचावतो. यापैकी एक कॅमेरा मुख्य कॅमेऱ्याची भूमिका बजावतो, तर दुसरा कॅमेरा मुख्य कॅमेऱ्याच्या छायाचित्रणाच्या दर्जात सुधारणा आणण्याचे काम करत असतो. छायाचित्र अधिक उजळ करण्यासाठी किंवा छायाचित्रातील दृश्य विस्तारण्यासाठी किंवा पाश्र्वभूमी ब्लर अर्थात अस्पष्ट करण्यासाठी या दुसऱ्या कॅमेऱ्याचा उपयोग होतो.

डय़ुअल कॅमेऱ्याचा उपयोग काय?

सेकंडरी अर्थात दुसरा कॅमेरा विविध गोष्टींसाठी उपयुक्त ठरू शकतो. छायाचित्र अधिक सुस्पष्ट करण्यासाठी, अल्ट्रा वाइड अँगलच्या माध्यमातून छायाचित्र विस्तारण्यासाठी किंवा छायाचित्रातील ठरावीक एका गोष्टीवर फोकस करण्यासाठी दुसरा कॅमेरा उपयोगी ठरतो. या कॅमेऱ्याचा उपयोग बऱ्याचदा ऑप्टिकल झूमसाठीही करता येतो. डय़ुअल कॅमेऱ्यामुळे छायाचित्रांचा दर्जा सुधारतो. यामध्ये सेन्सरचा आकार, पिक्सेलचा आकार, प्रकिया या गोष्टींचा मोठा वाटा असतो.