मुंबईसारख्या धकाधकीच्या शहरी जीवनात हॉटेलमध्ये खाणे ही गरजेची बाब झालेली आहे. ऑफिसमधील कामाच्या ताणामुळे नवरा-बायको दोघांनाही घरी यायला उशीर होत असतो किंवा एखाद्या दिवशी केवळ नेहमीच्या चवीपेक्षा वेगळे काही खायची इच्छा झाली म्हणून शहरातील मंडळी घर किंवा ऑफिसच्या जवळपासच्या हॉटेल्सचा आधार शोधत असतात. पुष्कळ वेळेला घर किंवा ऑफिसमधून हॉटेलमध्ये जाण्यास वेळ आणि शक्ती नसते. अशा वेळी हॉटेलमध्ये फोन करून हवे ते खाद्यपदार्थ घरी मागवण्याची पद्धतही आता रुळली आहे.
आता याही क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञानाने क्रांती होऊ घातलेली आहे. तुमच्या स्मार्ट फोनवर Swiggy Food Order & Delivery (स्विगी) हे विनामूल्य अ‍ॅप डाऊनलोड करून सुरू केलेत की फोनमधील ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (GPS) द्वारे तुमचे सध्याचे ठिकाण अ‍ॅपला कळते. या ठिकाणाच्या आसपासची स्विगीकडे नोंदलेली हॉटेल्स आत्ता उघडी आहेत काय आणि त्यांच्याकडे कोणकोणते पदार्थ उपलब्ध आहेत याचे मेन्यूकार्डच किमतींसह तुमच्यासमोर येते. यातील हवे ते पदार्थ तुम्ही निवडू शकता. (सर्व पदार्थ एकाच हॉटेलमधून निवडले पाहिजेत असे बंधन नाही.) तुम्ही कुठल्या प्रकारे पैसे देणार (रोख, क्रेडिट, डेबिट कार्ड किंवा इतर) याची माहिती दिल्यावर तुमची ऑर्डर नोंदवली जाते. विशेष म्हणजे हे खाद्यपदार्थ घेऊन येणारी व्यक्ती हॉटेलमधून निघाली की त्याच्या स्मार्टफोनमधील ॅढर द्वारे ती कुठपर्यंत पोहोचली आहे याचे ठिकाण ग्राहकाला समजू शकते. त्यामुळे अन्नपदार्थ आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल याचा अंदाज येतो आणि मनाला निश्चिंतता येते.
या सेवेसाठी स्विगीला हॉटेल्सकडून पदार्थाच्या किमतीवर कमिशन मिळते. त्यामुळे ग्राहकाला वेगळा चार्ज द्यावा लागत नाही. तसेच घरपोच पदार्थ देण्यासाठी किमान रकमेच्या खरेदीची अट नाही. ही सेवा सध्या महाराष्ट्रातील मुंबई व पुणे या शहरांमध्ये आणि भारतातील दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, गुरगाव या महानगरांमध्ये उपलब्ध आहे.
या अ‍ॅपमध्ये हॉटेल्सच्या यादीबरोबरच त्या त्या हॉटेलमधील लोकप्रिय डिशेस त्यांच्या फोटोसहित दाखवलेल्या असतात. त्यामुळे ग्राहकांना निवड करण्यास मदत होऊ शकते. तसेच हे अ‍ॅप तुम्ही पूर्वी कोणकोणत्या डिशेस घेतल्या होत्या याची नोंद ठेवते. त्यामुळे घाईगर्दीच्या वेळी तुम्हाला जलद निवड करता येते. ऑर्डर देताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार पदार्थ कमी-अधिक तिखट सांगू शकता. तुम्ही पूर्णपणे शाकाहारी असाल तर फक्त शाकाहारीचा मेन्यू दाखवण्याची सोय या अ‍ॅपमध्ये आहे.
याच प्रकारातले इतरही काही अ‍ॅप्स गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. अर्थात ती वापरताना काही सोयी आणि अटी वेगळ्या असू शकतात. खाण्याच्या दर्दीनी त्याची तुलनात्मक नोंद घ्यावी.
मनाली रानडे – manaliranade84@gmail.com