14 December 2017

News Flash

सप्तरंगी संगीत

दिवा लावल्यास तीन ते चार तास काम करू शकतो.

नीरज पंडित | Updated: May 9, 2017 5:22 AM

टय़ूथ स्पीकर टच लॅम्प बाजारात दाखल केला आहे.

एखाद्या रम्य संध्याकाळी मावळत्या सूर्याकडे पाहत छानसे संगीत ऐकत बसावे अशी इच्छा अनेकांच्या मनात असते. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात रम्य संध्याकाळ पाहणे अनेकांना शक्यच होत नाही. संगीतप्रेमींची ही गरज भागविण्यासाठी अ‍ॅम्बरन इंडिया या कंपनीने नुकताच बीटी- ६००० हा ब्लूटय़ूथ स्पीकर टच लॅम्प बाजारात दाखल केला आहे. पाहू या कसा आहे हा स्पीकर.

पॉवरबँकच्या बाजारात स्वत:ला पहिल्या क्रमांकावर पोहोचवलेल्या या कंपनीने अनेक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्मिती सुरू केली आहे. यामध्ये स्पीकर, हेडफोन अशा उपकरणांचा समावेश आहे. या वेळेस त्यांनी ब्लूटय़ूथ टच लॅम्प स्पीकर बाजारात आणला आहे. ध्वनिलहरींनुसार रंगाच्या रेषा नाचणारे अनेक स्पीकर्स आपण पाहिले आहेत. पण स्पीकरसोबतच रात्रीचा मंद दिवा म्हणून वापरता येणारा अनोखा स्पीकर अ‍ॅम्बरन इंडिया या कंपनीने बाजारात आणला आहे. या स्पीकरवर आपण हात लावाला की रंग बदलतो. इतकेच नव्हे तर प्रकाश कमी जास्त करण्याची सुविधाही यामध्ये देण्यात आली आहे. यामुळे सध्या बाजारात असलेल्या वेगवेगळय़ा स्पीकर्सच्या तुलनेत हा जरा हटके ठरतो. हा स्पीकर ब्लूटय़ूथ असल्यामुळे आपण आपल्या ब्लूटय़ूथ असलेल्या उपकरणाशी जोडता येऊ शकते. या स्पीकरच्या वरच्या बाजूला आपण हात लावला की रंग बदलतो. यात सात रंगांच्या छटा देण्यात आल्या आहेत. एलईडी दिवे वापरण्यात आल्यामुळे प्रकाश मंद राहतो. यामध्ये प्रकाश कमी-जास्त करण्याची सुविधाही देण्यात आली आहे. यामुळे या उजेडात गाणी ऐकता ऐकता वाचनही करता येऊ शकते. या स्पीकरचा आकार सिलिंडरसारखा आहे. यामुळे तो कोणत्याही कोपऱ्यात ठेवला तरी छान वाटतो. याचबरोबर हा स्पीकर वर लटकविण्यासाठी त्याला हँडलही देण्यात आले आहे. यामध्ये सुपरबास प्रणाली देण्यात आली आहे. याचबरोबर याचा पायाही चांगला देण्यात आला आहे. यामुळे आवाजाचा दर्जा खूप चांगला होतो. हा केवळ स्पीकर नसून यामध्ये आपण फोनची जोडणी केल्यास गाणी ऐकता ऐकता फोन आला तर हँड्स फ्री कॉलिंगचा पर्याय यामध्ये आहे. यात वायररहित माइकही देण्यात आला आहे. यामध्ये ब्लूटय़ूथ ३.० तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. याचबरोबर तीन आरएमएस स्पीकर आऊटपूट देण्यात आले आहे. यामुळे यातून येणारा आवाज हा कानाला सुखावह वाटतोच, याचबरोबर तो एका वन बीएचके घरासाठी पुरेसाही ठरतो. या स्पीकरची रेंज दहा मीटर इतकी असून एवढय़ा अंतरावरून आपण स्पीकरची जोडणी करू शकतो. यामुळे एका खोलीत लॅपटॉप अथवा टॅबवर काम करीत असताना दुसऱ्या कुणाला गाणी ऐकायची असतील तर तेही करणे शक्य होते. याला ब्लूटय़ूथ जोडणी करावयाची नसल्यास एयूएक्स केबलही देण्यात आली आहे. यामुळे आपण थेट जोडणी करू शकतो. इतकेच नव्हे तर यामध्ये मेमरी कार्डचा स्लॉट देण्यात आला आहे. यामुळे आपण गाण्यांनी भरलेले कार्ड जरी या स्पीकरच्या एसडी कार्ड स्लॉटमध्ये ठेवले की त्यातील एमपीथ्री प्लेअरच्या मदतीने त्यातील गाणी वाजू शकतात. यात गाणी पुढे आणि मागे करण्याचीही सोय आहे. यामुळे हा स्पीकर एक म्युझिक प्लेअरही होऊ शकतो. या स्पीकरला १२०० एमएएचची बॅटरी क्षमता देण्यात आली आहे. यामुळे हा स्पीकर दिवा न लावता सहा ते सात तास काम करू शकतो. दिवा लावल्यास तीन ते चार तास काम करू शकतो.

किंमत : १९९९ रुपये.

– नीरज पंडित

 

‘क्लाऊडवॉकर’चा स्मार्ट टीव्ही

1‘क्लाऊडवॉकर स्ट्रिमिंग टेक्नॉलॉजीज’ या कंपनीने नुकताच ६५ इंची ‘क्लाऊड टीव्ही’ बाजारात आणला आहे. अल्ट्रा एचडी (४के) असलेला हा स्मार्ट एलईडी टीव्ही ‘फ्लॅट’ आणि ‘कव्‍‌र्ह’ अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे. त्यापैकी ‘फ्लॅट’ टीव्हीची किंमत ९४८९९ रुपये तर ‘कव्‍‌र्ह’ टीव्हीची किंमत १,३५,९८९ रुपये इतकी आहे. या टीव्हीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे यात ‘स्क्रीन शिफ्ट’ची सुविधा पुरवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी एकाच स्क्रीनवर ‘लाइव्ह टीव्ही’ आणि ‘डिजिटल कंटेट’ एकत्रितपणे बाजूबाजूला (स्प्लिट) पाहता येतात. या दोन्ही टीव्हींमध्ये ३ एचडीएमआय तर २ यूएसबी पोर्ट पुरवण्यात आले आहेत. सध्या हा टीव्ही फ्लिपकार्ट या ईकामर्स संकेतस्थळावर उपलब्ध असून तेथे जुन्या टीव्हीच्या मोबदल्यात ‘क्लाऊड’ टीव्हीवर २२ हजार रुपयांपर्यंतची सूट देण्यात येत आहे.

‘आयटेल’चा ‘विश ए४१’ स्मार्टफोन

2मुंबई : आयटेल मोबाइलने ‘विश ए४१’ आणि ‘विश ए २१’ हे दोन नवीन स्मार्टफोन बाजारात आणले असून हे ‘व्हीओएलटीई’ सक्षम ४जी स्मार्टफोन आहेत. ‘विश ए ४१’ची किंमत ५८४० रुपये तर ‘विश ए २१’ची किंमत ५३९० रुपये इतकी आहे. ‘विश ए ४१’मध्ये ‘स्मार्ट की’ हे वैशिष्टय़ पुरवण्यात आले असून त्यानुसार एका क्लिकवर फोन घेणे/बंद करणे, फोटो काढणे अशा गोष्टी करता येतात. ‘विश ए ४१’मध्ये एक जीबी रॅम व १.३ गिगाहार्टझ क्वाड-कोअर प्रोसेसर पुरवण्यात आला असून त्यात आठ जीबी इंटर्नल स्टोअरेज देण्यात आली आहे. ही क्षमता मायक्रोएसडी कार्डनिशी ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. ‘विश ए ४१’मध्ये पाच इंची डिस्प्ले व अँड्रॉइड मार्शमेलो (६.०) पुरवण्यात आले असून यामध्ये २४०० एमएएच इतकी बॅटरी आहे. यात मागील बाजूस ५ मेगापिक्सेल ऑटोफोकस कॅमेरा व दोन मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा पुरवण्यात आला आहे.

‘स्वाइप’चे आणखी दोन स्मार्ट फोन

3भारतीय बाजारपेठेतील कमी किंमत श्रेणीतील ग्राहकांवर लक्ष केंद्रित ठेवून ‘स्वाइप’ या कंपनीने ‘एलाइट स्टार’ या नावाने आणखी दोन स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. यामध्ये एक जीबी रॅम व आठ जीबी अंतर्गत स्टोअरेज क्षमता असलेल्या ‘गोल्ड’ आणि एक जीबी रॅम व १६ जीबी अंतर्गत स्टोअरेज क्षमता असलेल्या फोनचा समावेश आहे. दोन्ही फोन अँड्रॉइड ६.० ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत असून त्यात ‘इंडस’ ही स्वतंत्र ऑपरेटिंग प्रणालीही अंतर्भूत करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे भारतीय भाषेत फोन हाताळू इच्छिणाऱ्यांना फायदा होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. दोन्ही फोन ४जीवर आधारित असून मागील बाजूस पाच मेगापिक्सेल कॅमेरा व पुढील बाजूस १.३ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यापैकी आठ जीबी स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत ३६९९ रुपये तर १६ जीबी स्टोअरेज असलेल्या फोनची किंमत ३९९९ रुपये इतकी आहे.

First Published on May 9, 2017 5:21 am

Web Title: bluetooth speaker with touch lamp