* विंडोज8.1 मोबाइलला ओटीजी केबलने पेनड्राइव्ह जोडता येतो का? त्यासाठी काही अपडेट घ्यावी लागतात का? नवीन विंडोज 10 मध्ये ही सुविधा आहे का?
– यतिश शुक्ल, बेलापूर
* विंडोज 8.1मध्ये ओटीजी केबलने पेनड्राइव्ह जोडण्याची सुविधा ओएस बाजारात आल्यानंतर सुरू करण्यात आली. त्या फोनवर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल तर तुम्हाला बिंग सर्चमध्ये जाऊन यूएसबी असे सर्च करावे लागेल. ते केल्यानंतर येणाऱ्या पर्यायामध्ये तुम्हाला यूएसबीच्या सेटिंग्ज दिसतील त्यानुसार तुम्ही पेनड्राइव्ह जोडू शकता. याचबरोबर विंडोज 10मध्ये ओटीजी जोडणी सोप्या पद्धतीने देण्यात आली आहे. त्यासाठी कोणत्याही वेगळय़ा गोष्टीची गरज पडत नाही. तुम्ही ओटीजी केबलद्वारे पेन ड्राइव्ह जोडला की तुम्हाला गॅलरीमध्ये पेनड्राइव्ह जोडलेला दिसेल.

*मी एक व्यावसायिक कलाकार असून मला माझे स्वत:चे संकेतस्थळ विकसित करावयाचे आहे.
– संगीता अडसूळ, वर्धा</strong>
* संकेतस्थळ विकसित करण्यासाठी एचटीएमएल, मायएसक्यूएलसारख्या विविध संगणकीय भाषांची गरज पडते. या भाषा येणारे किंवा संकेतस्थळ विकसित करणारे व्यावसायिक तुम्हाला हे काम चोख करून देऊ शकतील. मात्र याला पोर्टल नावापासून अनेक बाबतीत खर्च करावा लागतो. जर तुम्हाला तुमचे संकेतस्थळ विकसित करावयाचे असेल तर तुम्ही गुगल किंवा वर्डपोस्टसारख्या संकेतस्थळांची मदत घेऊन मोफत संकेतस्थळ विकसित करू शकता. या संकेतस्थळांच्या साहय़ाने स्वत:च संकेतस्थळ विकसित करणे तसे सोपे असते. यासाठी तुम्ही लॉगइन केल्यानंतर ‘क्रिएट वेबसाइट’ हा पहिला पर्याय निवडा. यानंतर तुम्ही तुमच्या संकेतस्थळाचे नाव द्यावे. यानंतर मुख्य संकेतस्थळावर तुमच्या संकेतस्थळासाठी काही टेम्पलेट्स उपलब्ध असतात. त्यातून तुम्ही तुमच्या आवडीचे व संकेतस्थळाला साजेसे टेम्पलेट निवडावे. यानंतर आवश्यक ती माहिती भरून व छायाचित्र देऊन तुम्ही संकेतस्थळ पूर्ण करू शकता.
तंत्रस्वामी
या सदरासाठी lstechit@gmail.com वर प्रश्न पाठवा.