14 December 2017

News Flash

सार्वजनिक चार्जिग धोक्याचे?

सार्वजनिक चार्जिग स्टेशन किंवा अनोळखी संगणकावरील यूएसबी चार्जिग करणे महागात पडू शकते.

लोकसत्ता टीम | Updated: April 18, 2017 2:20 AM

सार्वजनिक चार्जिग स्टेशन किंवा अनोळखी संगणकावरील यूएसबी चार्जिग करणे महागात पडू शकते.

अलीकडे स्मार्टफोनचा वापर इतका वाढला आहे की, सकाळी पूर्णपणे चार्ज करून ठेवलेला स्मार्टफोन पूर्ण दिवसभर कधीच पुरत नाही. पर्यायाने आपल्याला मोबाइलचा चार्जर किंवा पोर्टेबल चार्जर जवळ बाळगावाच लागतो. परंतु, कधीकधी विशेषत: प्रवासादरम्यान आपला पोर्टेबल चार्जरही मोबाइलची ‘भूक’ भागवण्यात असमर्थ ठरतो आणि मग कुठे सार्वजनिक चार्जिगची सुविधा उपलब्ध आहे का, यासाठी आपली शोधाशोध सुरू होते.  परंतु, सार्वजनिक ठिकाणी चार्जिग तुमच्या मोबाइलसाठी धोक्याचे ठरू शकते, असा इशारा आता तज्ज्ञांनी दिला आहे.

न्यूयॉर्क इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीने केलेल्या नवीन संशोधनानुसार सार्वजनिक चार्जिग स्टेशन किंवा अनोळखी संगणकावरील यूएसबी चार्जिग करणे महागात पडू शकते. भारतीय वंशाचे संगणकतज्ज्ञ किरण बलगणी यांचा समावेश असलेल्या या पथकाने केलेल्या अभ्यासानुसार, अशा प्रकारे चार्जिग करत असताना वापरकर्ते कोणत्या संकेतस्थळांना भेट देतात, हेही हॅकर्स पाहू शकतात. अनेकदा एखाद्या सार्वजनिक चार्जिग पॉइंटमध्ये जाणूनबुजून बदल करून चार्जिगदरम्यान वापरकर्त्यांच्या मोबाइलमधील माहिती चोरली जाऊ शकते. अनेकदा विमानतळावर गेल्यानंतर प्रवासी पहिल्यांदा चार्जिग पॉइंटकडे वळतात. अनेकदा डेटा केबलशिवायही हॅकर्स वापरकर्त्यांची माहिती वापरू शकतात. यासाठी ते साइड चॅनेलचा वापर करतात. संकेतस्थळांच्या वेबपेजवर त्यांची लोडक्षमता आणि ऊर्जावापर यांच्याही नोंदी होत असतात. या नोंदीच्या आधारे हॅकर्स वापरकर्त्यांची संकेतस्थळे माहीत करून घेतात.

हे संशोधन सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी चार्जिगच्या माध्यमातून वापरकर्त्यांचे फोन हॅक करून त्यावर विविध हल्ले करून तपासणी केली. याअंतर्गत बॅटरी चार्जिगची पातळी, ब्राउजर कॅक, स्क्रीन टॅप, वायफाय वापर या गोष्टींच्या आधारे ही पाहणी करण्यात आली. बऱ्याचदा मोबाइल पूर्णपणे चार्ज झालेला असल्यास हल्ले करण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मोबाइल चार्ज करून घेताना नीट काळजी घेण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.

First Published on April 18, 2017 2:20 am

Web Title: charging point in public places are dangerous