जगभरात दर आठवडय़ाला तीन अब्ज तास व्हिडीओ गेम्स खेळले जातात. या क्षेत्राचा व्यवसाय तब्बल १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आहे. हा व्यवसाय चित्रपटसृष्टीच्या व्यवसायाच्या दुप्पट आणि संगीत व्यवसायाच्या तिप्पट आहे. ट्विच टीव्हीसारख्या गेमिंग वाहिन्याही या बाजारात आहेत. या वाहिनीला दरमाह तब्बल साडेचार कोटींहून अधिक प्रेक्षक आहेत. अशा या गेमिंगबाबत आपल्याला समोर दिसणारे चित्रच माहिती असते. पण त्यासाठी लागणारे हार्डवेअर्स आणि मानवी बुद्धिमत्ता याकडे गेमर्स फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. व्हिडीओ गेम खेळायचा म्हटला तर संगणकात चांगल्या दर्जाचे ग्राफिक कार्ड असणे महत्त्वाचे असते. हे ग्राफिक कार्ड विकसित करणाऱ्या ‘एनविडिया ग्राफिक्स प्रा. लि.’ या कंपनीचे दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल धुपर यांच्याशी गेमिंग क्षेत्राबाबत साधलेला संवाद..

प्रश्न : भारतातील संगणक गेमिंग क्षेत्राची सद्य:स्थिती काय आहे.
उत्तर : जगभरात गेमिंगची मोठी बाजारपेठ आहे. दर आठवडय़ाला तीन अब्ज तास व्हिडीओ गेम्स खेळले जातात. या क्षेत्राचा व्यवसाय तब्बल १०० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आहे. हा व्यवसाय चित्रपटसृष्टीच्या व्यवसायाच्या दुप्पट आणि संगीत व्यवसायाच्या तिप्पट आहे. ट्विच टीव्हीसारख्या गेमिंग वाहिन्याही या बाजारात आहेत. या वाहिनीला दरमाह तब्बल साडेचार कोटींहून अधिक प्रेक्षक आहेत. यामुळेच आजघडीला सर्वाधिक पैसे देणारा व्यवसाय म्हणून याकडे पाहिले जात आहे. जर आपण जगातिक आकडेवारी पाहिली तर प्रत्येक सात जणांमागे एक जण गेम खेळतो. जर भारतातील आकडेवारी पाहिली तर देशात सुमारे चौदा कोटी लोक उच्च दर्जाच्या इंटरनेटशी जोडले गेलेले आहेत. त्यापैकी सुमारे साडेसात कोटीहून अधिक नियमित गेमर्स आहेत. याचबरोबर आपल्या देशातील इंटरनेटच्या किमती आणि त्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांची संख्या जास्त आहे. यामुळे ऑनलाइन गेम विकसित करण्यात मोठे आव्हान आहे. गेम्स खेळल्यामुळे केवळ नुकसानच होते असे नाही. आज गेमिंग क्षेत्रात मोठय़ा संधी आहेत. या क्षेत्रात नोकरी देताना गेम न खेळणाऱ्यांच्या तुलनेत गेम खळणाऱ्यांना तीन पटीने अधिक प्राधान्य दिले जाते. सुरुवातीला संगणकावर कन्सोलच्या माध्यमातून गेम खेळणारा काळ होता. कालांतराने याचे रूपांतर मोबाइल गेमिंगमध्ये होऊ लागले. अनेकदा लोकांना कन्सोलवर गेम्स खेळायचे असतात, पण एका जागी बसून ते खेळावे लागत असल्यामुळे ते मोबाइल किंवा टॅबलेटकडे वळतात. यामुळे गेमिंग क्षेत्रात बदल करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. यासाठी कन्सोल, टॅबलेट आणि मोबाइल हे सर्व लिंक करण्याची गरज निर्माण झाली. हे आव्हानात्मक काम सध्या एनव्हिडीयामध्ये सुरू आहे. यामुळे गेमरला त्याला पाहिजे तिथे पाहिजे त्या उपकरणावर गेम खेळता येणे शक्य होणार आहे.
प्रश्न : मोबाइल गेमिंगमुळे संगणक गेमिंगवर काही फरक पडला आहे का?
उत्तर : मोबाइल वापरकर्त्यांची संख्या खूप जास्त आहे ही बाब मोबाइल गेमिंगसाठी खूपच चांगली आहे. यामुळे गेम विकसित करणाऱ्या तसेच गेमशी संबंधित कंपन्यांना याचा अधिक फायदा होत आहे. मोबइलमुळे लोकांना गेम्स खेळण्याची सवय लागते. बहुतांश लोक हे मोबाइलचा वापर गेम खेळण्यासाठी करतात. परदेशात अनेक मोठे गेमर्स हे सुरुवातीला मोबाइल गेम्स खेळत होते नंतर त्यांना आवड निर्माण झाली आणि त्यांनी संगणक आणि कन्सोलच्या खेळांकडे आपला मोर्चा वळविला. आपल्या देशात गेम खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे समजले जाते. या मानसिकतेत बदल होत आहे. आपल्या देशातील तरुणांमध्ये हा ट्रेंड थोडा वेगळा आहे. अनेक तरुण हे संगणकाकडून कन्सोल गेमिंगकडे वळले आहेत. देशातील बहुतांश तरुणांकडे संगणक आहे किंवा किमान नोटबुक तरी आहे. २०१५-२०१६ या आर्थिक वर्षांत भारतीय बाजारात मोठय़ा प्रमाणावर गेमिंग नोटबुक्स दाखल झाल्या आहेत. या सर्वामुळे मनोरंजनासाठी लोक गेम्सकडे वळू लागले आहेत. परिणामी देशातील गेमिंग व्यवसाय वाढू लागला आहे. आज जर आम्ही कोणत्याही कॅफेमध्ये गेलो  तर तरुण मुले एकमेकांसोबत गेम्स खेळण्यात मग्न असतात. अनेक तरुण आठवडय़ाच्या सुट्टय़ांना बाहेर जाण्यापेक्षा ‘लॅन’ गेम्स खेळणे पसंत करू लागले आहेत. पालकांची मानसिकताही बदलू लागली आहे आणि त्यांनी मुलांच्या मनोरंजनासाठी गेम्सना स्थान दिले आहे. यामुळेच गेल्या वर्षांच्या तुलनेत गेमर्सची संख्या दुप्पट झाली आहे.

प्रश्न : कोणताही गेम खेळण्यासाठी ग्राफिक कार्ड खूप महत्त्वाचे असते. सध्या बाजारात येत असलेल्या व्हीएफएक्स किंवा अ‍ॅनिमेटेड कंपन्या कोणते धोरण आखत आहे.
उत्तर : प्रत्येक गेम खेळणाऱ्याला जास्त क्षमतेचे ग्राफिक्स पाहिजे असते. ज्यामुळे ते गेम प्रत्यक्ष अनुभवू शकतात. काही वर्षांपूर्वीचे गेम्स जर पाहिले तर त्यामध्ये ठोकळेबाज पद्धतीने उभे केलेले वातावरण आणि पात्रे असावयाची. कालांतराने हे रूप बदलत गेले आणि ते खरे भासवण्याकडे जाऊ लागले. यासाठी त्रिमितीसह, आभासी वास्तव, वास्तवादी चित्र उभे करणे असे अनेक प्रयोग होऊ लागले. ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हार्डवेअरचा खरोखरीत महत्त्वाचा वाटा असतो. यासाठी एनव्हिडीया नेहमीत तंत्रज्ञान विकसित करते व विकासकांना त्यांचे गेम्स लोकांपर्यंत पूर्ण क्षमतेने नेण्यास मदत करत असते.
प्रश्न : बाजारात दाखल झालेल्या ‘९७० फोर के’ या अत्याधुनिक जीपीयू प्रोव्हायडरमध्ये काय नावीन्य आहे.
उत्तर : हे कार्ड अत्याधुनिक मॅक्सवेल मालिकेतील रचनेवर आधारित आहे. यामध्ये कमीत कमी वीज वापरून जास्त काम कसे करता येईल यावर विशेष भर देण्यात आला आहे. हेच तंत्रज्ञान जीटीएक्स ९८० आणि जीटीएक्स ९८० टाय या मॉडेल्समध्येही वापरण्यात आले आहे. सुरुवातीचे जीटीएक्स ९५० आणि जीटीएक्स ९६० या प्रासेसेसर मध्येही विजेचा वापर कमी केला जात होता. मात्र ते कार्ड गेमरला चांगला अनुभव देऊ शकत नव्हते. याचबरोबर नवीन तंत्रज्ञानात गेमर्सना जीफोर्ससारखा अनुभव देणारे सॉफ्टवेअर्सही पुरविण्यात आले आहेत. यामुळे शॅडो प्ले, गेम स्ट्रीमसारख्या सुविधा वापरता येणार आहेत.

प्रश्न : वीज बचत करणाऱ्या कार्डाचा तुम्हाला नेमका फायदा काय?
उत्तर : आम्ही जेव्हा बाजारात पाहणी करतो तेव्हा असे लक्षात येते की, लोकांना जास्त क्षमतेचे कार्ड हवे असतात. पण त्यामुळे जास्त वीज खर्च होते. यामुळे हे कार्ड घेणाऱ्यांवर परिणाम होत असे. यात वीज
बचतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे त्याचा फायदा ग्राहकांना तसेच कंपनीलाही झाला आहे. ग्राहकांना कमी वीज खर्चून चांगल्या दर्जाचे ग्राफिक कार्ड मिळू शकते.

प्रश्न : ग्राफिक कार्ड व्यवसायाच्या भविष्याकडे तुम्ही कसे बघता.
उत्तर : सुरुवातीला गेम हे खूप साधे आणि कृत्रिम असायचे. यानंतर ते वास्तवाकडे वळू लागले. जसे ते वास्तवाकडे वळू लागले तशी ते खेळण्यासाठीची क्षमताही वाढवण्याची गरजही वाढू लागली. यामध्ये ग्राफिक कार्डची महत्त्वाची भूमिका आहे. २०१६ या वर्षांकडे तंत्रज्ञान विश्वात ‘आभासी वास्तव’ वर्ष म्हणून पाहिले जात आहे. यामुळे या वर्षांत आणखी नवीन गेम्स बाजारात येतील. ते इतक्या उच्च दर्जाचे असतील की लोकांना काही क्षण वास्तव आणि आभासी वास्तव यात विचार करावा लागेल. २०१५च्या अखेरीस गेमिंगची ‘एएए’ ही मालिका दाखल झाली. त्याची पुढची आवृत्ती या वर्षांत दाखल होणार आहे. हे गेम्स वास्तवापर्यंत पोहचवणारे आहेत. अशा गेम्सची निर्मिती हे आमच्यासाठी आव्हान असणार असून त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणखी चांगल्या दर्जाचे ग्राफिक कार्ड भविष्यात विकसित केले जातील. २०१६ हे वर्षच गेमिंग क्षेत्राला इतक्या पुढे नेऊन ठेवणार आहे की २०१७मध्ये काय होईल याचा अंदाज बांधणेच अवघड आहे.

प्रश्न : भारतीय गेम चाहत्यांसमोरचे मोठे आव्हान काय?
उत्तर : भारतीय गेम चाहत्यांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे आपल्या देशात आजही सर्वांपर्यंत इंटरनेट पोहचू शकलेले नाही. केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत ते सर्वांपर्यंत पोहचेल अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक खासगी सहयोगातून इंटरनेट परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. जेव्हा इंटरनेट सर्वांपर्यंत पोहचेल तेव्हा भारतातील कोणतीही व्यक्त त्याला पाहिजे तो गेम पाहिजे त्यावेळी पाहिजे त्या उपकरणावर खेळू शकेल.

प्रश्न : ‘मेक इन इंडिया’चा फायदा एनव्हिडीया कशा प्रकारे घेऊ शकते?
उत्तर : साधरणत: बारा वर्षांपूर्वीच कंपनीचे संस्थानक जेन-हसुन यांनी भाकीत मांडले होते की भारतात मोठय़ा प्रमाणावर बुद्धिमत्ता आहे त्याचा वापर जगातील इतर भागांबरोबरच भारतातही व्हायला हवा. या उद्देशाने पुणे, बेंगळुरू आणि हैद्राबाद येथे ‘डिझाइन हाऊस’ स्थापन करण्यात आले. कंपनीच्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी २० टक्के कर्मचारी एकटय़ा भारतात आहेत. मेक इन इंडिया हे उत्पादनाच्या पलीकडेही आहे. जे आजही आम्ही डिझाइन आणि अन्य कामांच्या माध्यमातून करत आहोत. ते काम असेच सुरू राहील आणि त्याचा फायदा केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील इतर देशांनाही होत राहील.

niraj.pandit@expressindia.com