तंत्रज्ञान जगताचा महामेळा म्हणून ओळखला जाणारा ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ (सीईएस) गेल्या आठवडय़ात अमेरिकेतील लास वेगास शहरात पार पडला. या प्रदर्शनात जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या सहभागी होत असतात. त्यामुळे वर्षभरात कोणकोणती नवी उपकरणे, नवीन तंत्रज्ञान, नवीन साधने येऊ घातली आहेत, याची चुणूक या प्रदर्शनाच्या माध्यमातून येते. यंदाचा ‘सीईएस’ मात्र बऱ्याच अर्थाने वेगळा ठरला. यंदाच्या प्रदर्शनात नावीन्यपूर्ण अशी उपकरणं किंवा तंत्रज्ञान फारच अभावाने पाहायला मिळाली. बहुतांश तंत्र उपकरणे गेल्या वर्षीच्या ‘सीईएस’मधून चर्चिली गेली होती. त्यामुळे प्रदर्शनाला भेट देणाऱ्या तंत्रप्रेमींची काहीशी निराशा झाली. परंतु, गेल्या वर्षी जे स्वप्न तंत्रज्ञांनी सादर केले होते, त्याची वास्तव आवृत्ती यंदाच्या प्रदर्शनात पाहायला मिळाली. अर्थात त्यातही अनेक रंजक, नावीन्यपूर्ण गोष्टी होत्याच. अशाच काही अफलातून उपकरणांचा वेध..

स्मार्टफोन गुंडाळता येणार?
स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस प्रचंड वेगाने प्रगती होत आहे. एचडी किंवा अल्ट्रा एचडी डिस्प्लेपाठोपाठ तंत्रजगताने गेल्या वर्षी ‘कव्‍‌र्हड’ स्क्रीन असलेले स्मार्टफोन अनुभवले. मात्र, यंदाच्या ‘सीईएस’मध्ये एलजीने वर्तमानपत्राप्रमाणे गुंडाळी करता येणारा ‘डिस्प्ले’ सादर करून साऱ्यांनाच चकित केले. एलजीने सुमारे १८ इंच अर्थात दीड फूट लांबीचा गुंडाळता येणारा ‘डिस्प्ले’ प्रदर्शनात मांडला होता. हे तंत्रज्ञान भविष्यात अनेक नवीन उपकरणांना वाट करून देणारं आहे. अशा प्रकारच्या डिस्प्लेमुळे शरीराच्या कोणत्याही भागावर गुंडाळता येणारे डिस्प्ले असलेले वेअरेबल्स घडवणं शक्य होईल. शिवाय घडी घालून ठेवता येणारा स्मार्टफोनही बनवणे शक्य होईल.

सेल्फी घेणारा ‘ड्रोन’
आजकाल सेल्फीची प्रचंड क्रेझ आहे. आपल्या अवतीभवतीच्या गोष्टींना स्वत:सहित छायाचित्रात कैद करण्याचा प्रयत्न जीवघेणा ठरू शकतो, हे मुंबईत शनिवारी घडलेल्या घटनेतून दिसून आले. असे असले तरी, सेल्फीबद्दलचे वेड कमी होण्याचे लक्षण नाही. हे लक्षात घेऊनच ‘ऑनअगो फ्लाय’ नावाचे कॅमेराड्रोन उपकरण ‘सीईएस’मध्ये मांडण्यात आले. पाच इंच लांबी-रुंदी आणि दोन इंच उंचीचे हे उपकरण तळहातावर सहज मावते. तळहातावर ठेवलेले हे उपकरण हवेत उडवताच सक्रिय होते आणि उडू लागते. त्याला १५ मेगापिक्सेलचा कॅमेरा जोडण्यात आला असून आपल्या स्मार्टफोननीशी ते नियंत्रित करता येते. या ड्रोनच्या साह्याने सहज सेल्फी काढता येऊ शकेल. विशेष म्हणजे, तळहात समोर धरताच ते अलगद हातावर येऊन विसावते. या ‘ड्रोन’च्या साह्याने व्हिडीओ शूटिंगही करणे सोपे आहे. यातील एकच अडचण म्हणजे, हे उपकरण एकावेळी केवळ १५ मिनिटे हवेत तरंगू शकते. मात्र, सेल्फी काढण्यासाठी हा वेळ पुरेसा आहे नाही का? या उपकरणाची किंमत २०० डॉलर अर्थात १२ ते १५ हजार रुपये इतकी आहे.

वायरलेस पेनड्राइव्ह
पेनड्राइव्ह किंवा ‘यूएसबी’ ही सध्याची आत्यंतिक गरज आहे. वापरकर्त्यांला अधिक साठवण क्षमता देणारे हे उपकरण आता जवळजवळ १२८ जीबीपर्यंतच्या स्टोअरेजमध्ये उपलब्ध झाले आहे. मात्र, यंदाच्या सीईएसमध्ये त्याहून पुढे जात २०० जीबी क्षमतेचे पेनड्राइव्ह मांडण्यात आले होते. ‘सॅनडिस्क कनेक्ट वायरलेस स्टिक’ नावाच्या या पेनड्राइव्हचे सर्वात मोठे वैशिष्टय़ म्हणजे, ते कॉम्प्युटरशी थेट न जोडता वायफायच्या माध्यमातून फाइल ट्रान्सफर करणे शक्य आहे. विशेषत: यूएसबी स्लॉट नसलेले अल्ट्रापोर्टेबल लॅपटॉप आणि स्मार्टफोन यांना हे पेनड्राइव्ह अतिशय उपयुक्त आहे. २०० जीबी क्षमतेच्या पेनड्राइव्हची किंमत साधारण १२० डॉलर इतकी आहे. मात्र, ६४ जीबीचेही पेनड्राइव्ह उपलब्ध असून ते सुमारे ४५ डॉलरला उपलब्ध आहे.
कपडे शरीराच्या नोंदी ठेवणार
फिटनेस अर्थात तंदुरुस्तीच्या नोंदी ठेवणारे ‘वेअरेबल्स’ अलीकडे लोकप्रिय झाले आहेत. अशा गॅझेटच्या माध्यमातून आपल्या हालचाली, चालणे, धावणे, जेवणे अशा सर्व क्रियांतून निर्माण/खर्च होणारी ऊर्जा याची नोंद घेतली जाते. त्यातच भर म्हणून ‘मॉन्ट्रेल’ कंपनीने ‘हेक्सास्कीन’ नावाचे स्मार्ट शर्ट ‘सीईएस’मध्ये मांडले. हे शर्ट परिधान करणाऱ्याच्या शरीरातील सर्व क्रिया-प्रक्रियांची नोंद ठेवते. सध्या या शर्टची किंमत सुमारे साडेचारशे डॉलर असून ते कॅनडामध्ये उपलब्ध आहे.

सौरचुलीचा नवा अवतार
पारंपरिक ऊर्जास्रोतांच्या कमतरतेमुळे आता अपारंपरिक ऊर्जा साधनांकडे लक्ष वळू लागले आहे. सौरचूल हे त्यापैकीच एक उपकरण. याच सौरचुलींना ‘मॉडर्न’ चेहरा देणारे ‘गोसन स्टोव्ह’ ‘सीईएस’मध्ये मांडण्यात आले होते. एखाद्या सिलिंडरच्या आकाराचे हे ‘स्टोव्ह’ ग्रिल खाद्यपदार्थासाठी अतिशय उपयुक्त आहेत. अवघ्या दहा ते १२ मिनिटांत हे स्टोव्ह ५५० सेल्सियस उष्णता निर्माण करू शकतात. त्यामुळे यावर जेवण पटकन शिजते असा हे बनवणाऱ्या कंपनीचा दावा आहे. हे स्टोव्ह २४० डॉलरच्या अर्थात १५ हजार रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहेत. पण या स्टोव्हमुळे गॅसवर होणारा खर्च टळणार असल्याने ते अतिशय किफायती आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

टचस्क्रीन असलेला भव्य फ्रीज
‘स्मार्ट होम’ ही संकल्पना आता मूळ धरू लागली आहे. अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिक घरे बांधतानाच या पद्धतीचा अवलंब करून ग्राहकांना नावीन्यपूर्ण सेवा देत आहेत. या संकल्पनेला पुरेपूर पूरक ठरणारा सॅमसंगचा भव्य फ्रीज ‘सीईएस’मध्ये आकर्षणाचे केंद्र ठरला. घरातील दरवाजांच्या आकारातील या डबलडोअर फ्रीजचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्याला एक मोठी टचस्क्रीन जोडण्यात आली आहे. या टचस्क्रीनच्या साह्याने तुम्ही फ्रीज नियंत्रित करू शकता. या फ्रीजमध्ये तीन कॅमेरे बसवण्यात आले असून प्रत्येक फ्रीजमधून एखादी वस्तू घेतल्यानंतर हे कॅमेरे उपलब्ध साठय़ाचे फोटो घेतात. त्यामुळे फ्रीज न उघडता केवळ टचस्क्रीनवरूनच वापरकर्त्यांला आतमधील वस्तू/पदार्थाची सद्य:स्थिती समजू शकते. शिवाय या टचस्क्रीनच्या साह्याने घरातील मंडळी एकमेकांना संदेशदेखील पाठवू शकतात. तसेच सॅमसंगच्या स्मार्ट टीव्ही कनेक्ट करून या फ्रीजवर गाणी, व्हिडीओ पाहणेही शक्य आहे. इतक्या सुविधा असलेल्या फ्रीजची किंमत काय असेल? फक्त ५ हजार डॉलर! अर्थात साडेतीन लाख रुपये!!

चालताबोलता दुभाष्या
परदेशात गेल्यानंतर तेथील स्थानिक भाषेचे मोजके शब्दही माहीत नसतील तर भलतीच कोंडी होते. मग हातवारे करून आपले म्हणणे पटवून देण्याची कसरत करावी लागते. बरं पुस्तकांतून किंवा मोबाइलमधून शब्द शोधण्याचे काम कटकटीचे आणि वेळखाऊ आहे. ही समस्या ‘इली’ नावाचा ट्रान्स्लेटर सहज दूर करतो. हे एक वेअरेबल उपकरण असून ते आपण आपल्या भाषेत बोललेले शब्द काही सेकंदात मोठय़ा आवाजात समोरच्या व्यक्तीच्या भाषेत व्यक्त करतो. सध्या हे इंग्रजी, चिनी आणि जपानी या तीन भाषांवर काम करते. या उपकरणाची किंमत सुमारे २०० डॉलर इतकी आहे.

आसिफ बागवान
asifbagwan@expressindia.com