जुलै महिना उजाडला की लगबग सुरू होते ती प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची. गेल्या दोन वर्षांपासून हे विवरणपत्र ऑनलाइन भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी भारतीय प्राप्तिकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. मात्र अनेकांना त्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करून विवरणपत्र भरणे अवघड वाटू लागले. याचाच फायदा घेऊन काही खाजगी कंपन्यांनी सोप्या पद्धतीने विवरणपत्र भरणारे संकेतस्थळ आणि मोबाइल अ‍ॅप्स बाजारात आणले आहेत. पाहूयात कोणते संकेतस्थळ आणि अ‍ॅप बाजारात आहेत.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी सीएकडे जाऊन त्याच्याकडे कागदपत्र दिले की झाले असा अनेकांचा समज आहे. अर्थात सीए मंडळी ही कामे अगदी चोख करतात. मात्र ई-फायलिंगमुळे हे काम एखादी अर्थसाक्षर व्यक्तीही घरबसल्या करू शकते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते ते म्हणजे देशाच्या प्राप्तिकर विभागाचे. मात्र या संकेतस्थळाची रचना वापरकर्त्यांना भावेल आणि सोपी वाटेल अशी नसल्यामुळे संकेतस्थळावर आल्यावर अनेकांचा गोंधळ उडतो. यामुळे पहिल्या वर्षी अनेकांनी या संकेतस्थळावर जाऊन विवरणपत्र भरण्यापेक्षा सीएकडे जाऊनच विवरणपत्र भरणे पसंत केले. मात्र वापरकर्त्यांना सोप्या वाटतील अशी काही संकेतस्थळे आणि मोबाइल अ‍ॅप्स बाजारात उपलब्ध झाली आहेत. ही संकेतस्थळे आपल्याला सोप्या पद्धतीने आपली माहिती भरण्यास सांगून माहिती भरून झाली की ती प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळाशी जोडून देतात. याचबरोबर हे भरत असताना आपल्याला कुठे काही अडचण आली तर त्याचे मार्गदर्शनही करतात. अनेकदा तर अर्थसल्लाही देतात. अर्थसल्ला वगळता इतर सर्व माहिती आणि विवरणपत्र सादर करण्याची प्रक्रिया सर्वच संकेतस्थळांवर मोफत उपलब्ध आहे. पाहुयात अशीच काही संकेतस्थळे.

क्लिअर टॅक्स
‘अ’ अननसाचा इतक्या सोप्या पद्धतीने अर्थ बाराखडीची शिकवणी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे प्रथमच जर कुणी स्वत:हून ऑनलाइन विवरणपत्र सादर करत असेल तर ू’ीं१३ं७.्रल्ल हे संकेतस्थळ तुम्हाला उपयोगी ठरू शकते. जेव्हा आपण हे संकेतस्थळ सुरू करतो तेव्हा आपल्याला दोन पर्याय दिसतात. यात एका पर्यायात आपण संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या पुढील रकान्यात आपला तपशील भरत जायचा किंवा दुसऱ्या पर्यायात आपल्याकडे स्कॅन किंवा पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असलेला फॉर्म-16 अपलोड केल्यावर सर्व माहिती आपोआप भरली जाते. याचबरोबरीला तुम्हाला संकेतस्थळावर लॉगइन करून तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचे नाव, पॅन, पत्ता आदी तपशील भरावयाचा आहे. जर तुम्ही या कोणत्याही प्रक्रियेत अडकलात तर त्याबाबत संकेतस्थळावर मार्गदर्शनपर सूचना उपलब्ध आहेत. याहीपलीकडे जाऊन तुम्हाला सीएचे मार्गदर्शन हवे असेल तर तेही काही रक्कम घेऊन उपलब्ध करून दिले जाते. अर्ज भरण्याची प्रक्रिया संपल्यावर तुमचा तपशील प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करून तुम्हाला विवरणपत्र भरल्याची पोच संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळते. याचबरोबर या संकेतस्थळाचे अँड्रॉइड अ‍ॅप असून त्यांनी नुकतेच टूजीवर वापरता येईल अशी आवृत्ती बाजारात आणली आहे.

एच अँड आर ब्लॉक
क्लिअर टॅक्ससारखीच सेवा देणारे हे संकेतस्थळ असून हेही वापरकर्त्यांना विवरणपत्र भरणे अधिक सुलभ करते. यावरही आपण स्कॅन किंवा पीडीएफ केलेला फॉर्म-16 जर भरला तर सर्व तपशील ऑपोआप भरला जातो. या संकेतस्थळाचा वापर कसा करता येऊ शकतो याचा तपशील सांगणारे व्हिडीओज उपलब्ध असून संकेतस्थळावरील तज्ज्ञ आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी उपलब्ध असतात. या संकेतस्थळाच्या वतीने नुकतेच टॅक्स चॅट नावाचे अ‍ॅप बाजारात आणले असून या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही विवरणपत्र कसे भरायचे इथपासून ते आपले एखादे उत्पन्न कोणत्या रकान्यात दाखवायचे, कोणत्या उत्पन्नावर किती करसवलत आहे आदी माहिती मिळवू शकतो. जर आपल्याला विवरणपत्र भरल्यावर त्यात काही त्रुटी आढळल्यास तर ते विवरणपत्र सीएकडून तपासून घ्यायची सुविधाही या संकेतस्थळावर काही रक्कम भरून उपलब्ध आहे. याचबरोबर संकेतस्थळावर काही क्रमांकही देण्यात आले आहेत जेथे फोन करून तुम्ही थेट तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकतात.

टॅक्सस्माइल
या संकेतस्थळाचे वेगळेपण सांगायचे तर आपण कोणत्याही पानावर गेलो तरी आवश्यक दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि थेट चॅट करण्याची लिंक सतत समोर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे वापरकर्त्यांला अडचण आल्यास थेट ती दूर करणे सहज शक्य होते. या संकेतस्थळाने ई-फायलिंगसाठी मोफत हेल्पलाइन उपलब्ध करून दिली आहे. हे संकेतस्थळ आधीच्या संकेतस्थळांच्या तुलनेत रचनेमध्ये वेगळे असले तरी ते फार गोंधळवून टाकणारे नाही. मात्र या संकेतस्थळाचा फायदा घेण्यासाठी तुमचे उत्पन्न हे पाच लाखांपेक्षा कमी असायला हवे. यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना काही रक्कम भरून फायलिंग करता येऊ शकते. ही या संकेतस्थळाची दुबळी बाजू म्हणता येऊ शकते.

टॅक्सपॅनर
वरील सर्व संकेतस्थळांवर मोफत सुविधा असताना या संकेतस्थळावर मात्र पैसे भरून ही सेवा घ्यावी लागते. फॉर्म-16 मधले तपशील सादर करण्यासाठीही काही रक्कम भरावी लागते. ज्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे अशा ग्राहकांना या संकेतस्थळावर काही सवलत देण्यात येत होती. मात्र या संकेतस्थळावरील ई-फायलिंग प्रक्रिया ही इतर सर्व संकेतस्थळांच्या तुलनेत अधिक सोपी आहे. कारण आपण अर्ज भण्याची प्रक्रिया करत असताना आपल्याला सतत मार्गदर्शन करण्यात येते. यामुळे कोठेही अडचण आली तरी आपण फोन अथवा ई-मेल न पाठवता ती दूर करू शकतो. यामधील सेवांच्या माध्यमातून आपण सीएचे मार्गदर्शनही घेऊ शकणार आहोत.

खाजगी कंपनीच्या संकेतस्थळांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्राप्तिकर विभागाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहणे कधीही फायदेशीर आणि सुरक्षित ठरेल. अनेक बँका विपणनाचा भाग म्हणून या कंपन्यांचे ई-मेल्स पाठवत असतात. मात्र प्राप्तिकर विभागाचे संकेतस्थळही सहज आणि सुलभ असून तेथून विवरणपत्र भरणे कधीही फायदेशीर ठरू शकते.
– प्रवीण देशपांडे, सनदी लेखाकार

– नीरज पंडित -Niraj.pandit@expressindia.com