स्मार्टफोनमुळे हौशे-गवश्यांप्रमाणेच सर्वसामान्य वापरकर्त्यांनाही छायाचित्रणाचे वेड लावले आहे. स्मार्टफोनमधून अगदी सहज टिपलेले छायाचित्रही अतिशय सुस्पष्ट आणि सुरेख कसे करता येईल, यासाठी प्रत्येक फोनमध्ये वैशिष्टय़पूर्ण सुविधा पुरवण्यात आलेल्या असतात. याखेरीज विविध अ‍ॅपच्या मदतीने मोबाइल कॅमेऱ्यांतून टिपलेली छायाचित्रे अधिक आकर्षकही बनवता येतात. परंतु, आता यापुढे एक पाऊल टाकत ‘कॅटरपिलर’ नावाच्या अमेरिकेतील कंपनीने ‘थर्मल’ म्हणजेच ‘औष्मिक’ कॅमेरा असलेल्या ‘कॅट एस६०’ नावाच्या स्मार्टफोनची निर्मिती केली आहे. हा स्मार्टफोन गेल्या शुक्रवारपासून, १७ मार्चपासून अ‍ॅमेझॉनच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भारतात विक्रीस उपलब्ध झाला आहे.

‘कॅट एस६०’चे सर्वात मोठे वैशिष्टय़ त्यातील ‘थर्मल’ कॅमेऱ्याची सुविधा हेच आहे. या मोबाइलच्या मागील बाजूस असलेला ‘एफएलआयआर लिप्टन थर्मल मायक्रोकॅमेरा’ हवेतील उष्णता, तापमान, दवबिंदू हे देखील ‘टिपू’ शकतो. इतकेच नव्हे तर विद्युत उपकरणांमधील ‘ओव्हरहीटिंग’ची समस्या शोधून काढण्यातही हा उपयुक्त ठरतो. ही सगळी वैशिष्टय़े कमी वाटत असतील तर, या कॅमेऱ्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मिट्ट काळोखातही या मोबाइलच्या कॅमेऱ्यातून छायाचित्रे काढता येतात.

गेल्या वर्षी पार पडलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेस या मोबाइल कंपन्यांच्या जागतिक मेळय़ात पहिल्यांदा सादर झालेला ‘कॅट एस६०’ हा अमेरिकेतील बांधकाम यंत्रे निर्माण करणारी कंपनी आणि ब्रिटनमधील ‘बुलिट मोबाइल’ यांच्या सहकार्यातून तयार झालेला मोबाइल आहे. या मोबाइलचा कॅमेरा ५० ते १०० फूट अंतरावरूनही एखाद्या पृष्ठभागावरील तापमान किंवा उष्णता यांचा अचूक अंदाज घेऊ शकतो. व्यावसायिक छायाचित्रकारांसोबतच या कॅमेऱ्याचा उपयोग विविध क्षेत्रातील अभियंते, क्रीडा चाहते यांना होऊ शकतो.

‘कॅट एस६०’चे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हा स्मार्टफोन उणे २५ अंश सेल्सियस इतक्या अतिथंड तापमानापासून ५५ अंश सेल्सियस इतक्या अतिउष्ण तापमानातही अतिशय योग्यपणे काम करतो. सहा फुटांच्या उंचीवरून पडल्यानंतरही या फोनला धक्का बसू शकत नाही आणि पाच मीटर खोल पाण्यात तासभर पडून राहिला तरी फोनवर काहीही परिणाम होणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.

या फोनमध्ये मागील बाजूस थर्मल कॅमेऱ्याखेरीज १३ मेगापिक्सेलचा कॅमेराही पुरवण्यात आला असून हा कॅमेरा पाण्याच्या आतही व्यवस्थित छायाचित्रे टिपू शकतो. स्मार्टफोनला पुढील बाजूस ५ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.

या फोनची अन्य वैशिष्टय़े

’ आपत्कालीन परिस्थितीत झटकन संपर्कासाठी ‘एसओएस’ बटणची सुविधा.

’ डय़ुअल सिम

’ अँड्रॉइड ६.० मार्शमॅलोवर आधारित.

’ ४.७ इंच आकाराचा एचडी डिस्प्ले

’ स्नॅपड्रॅगनचा १.२ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर

’ तीन जीबी रॅम

’ ३२ जीबी अंतर्गत स्टोअरेज.

’ १२८ जीबीपर्यंत स्टोअरेज क्षमता.

’ ३८०० एमएएचची बॅटरी. (३० तासांचा टॉकटाइम)

किंमत : ६४९९९ रुपये.

सेल्फीप्रेमींना ‘स्मार्ट’भेट

स्मार्टफोन्सच्या दुनियेत सेल्फी घेण्यासाठी उत्तम असणाऱ्या स्मार्टफोन्सना विशेष मागणी आहे. ग्राहकांची हिच निकड लक्षात घेऊन विवोने १६ मेगापिक्सलचा फंट्र कॅमेरा असणारा ‘विवो व्हाय६६’ हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. क्राऊन गोल्ड आणि मॅटे ब्लॅक या दोन रंगांत उपलब्ध असणारा हा स्मार्टफोन १४९९० रुपयांत भारतात विकला जाणार आहे.  भारतीय मोबाइल बाजारपेठेत आपले स्थान घट्ट करू पाहणाऱ्या विवोने सेल्फीप्रेमी तरुणाईवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळेच १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असतानाही त्याची किंमत १५ हजारांच्या घरात ठेवण्यात आली आहे. ‘विवो व्हाय६६’मध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेऱ्यासोबतच ‘मूनलाइट ग्लो डिस्प्ले फ्लॅश’ची सुविधादेखील पुरवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश आहे. या फोनसोबत विवोने ‘सावन’या ऑनलाइन संगीतसेवेचे सहा महिने मोफत सदस्यत्वही देऊ केले आहे.

या स्मार्टफोनची अन्य वैशिष्टय़े

’ अँड्रॉइड ६.० मार्शमेलोवर आधारित विवो फनटच ओएस ३.० ही ऑपरेटिंग सिस्टीम

’ ५.५ इंच स्क्रीन आणि एचडी आयपीएस डिस्प्ले.

’ ६४ बिट ऑक्टा कोअर प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम

’ ३२ जीबी इन बिल्ट स्टोरेज

’ २५६ जीबीपर्यंत स्टोअरेज क्षमता वाढवण्याची सुविधा.

’ ३००० एमएएच क्षमतेची बॅटरी

’ एकाच वेळी दोन किंवा जास्त अ‍ॅपवर काम करण्यासाठी ‘स्मार्ट स्क्रीन स्प्लीट’ची सुविधा. डोळय़ांवर ताण येऊ नये यासाठी ‘आय प्रोटेक्शन मोड’चा अंतर्भाव

’ किंमत: १४,९९० रुपये.