X

एक ईमेल, असंख्य वापरकर्ते

जीमेलची ईमेल सेवा ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सेवा आहे.

जीमेलची ईमेल सेवा ही जगभरात सर्वाधिक वापरली जाणारी सेवा आहे. अगदी खासगी कामापासून ते कंपनीच्या अकाउंट्सपर्यंत अनेक ठिकाणी जीमेलचे ईमेल आयडी वापरले जातात. याचं कारण म्हणजे जीमेल, खरंतर गुगलने पुरवलेली सहज सोपी सेवा. वापरकर्त्यांला कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल आणि त्याला सहजपणे आपली सेवा आणि उत्पादन वापरता येईल हाच विचार गुगल, अ‍ॅपलसारख्या कंपन्यांनी केला. आणि म्हणूनच त्या तंत्रज्ञान क्षेत्रातल्या दादा कंपन्या बनल्या. तसं जीमेल आयडी बनवणं काही कठीण नाही. पासवर्ड, मोबाइल नंबर वगैरे जुजबी माहिती भरली की अकाउंट तयार होतं. आणि त्यानंतर विमानाच्या तिकिटापासून ते कस्टमर सर्विसपर्यंत कुठल्याही कामासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. अत्यंत खाजगी असंच हे जीमेल अकाउंट असतं. पण अनेकदा काय होतं की काही कारणाने आपल्याला आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड कुणासोबत तरी शेअर करावा लागतो. काही महत्त्वाचे इमेल्स, डॉक्युमेंट्स कुणाला तरी फॉरवर्ड करायचे असतात. आणि नेमका आपल्याला इंटरनेट अ‍ॅक्सेस नसतो. काम तर फारच हातघाईला आलेलं असतं. अशावेळी मग कुणाला तरी आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड द्यवा लागतो. अर्थात माणूस कितीही विश्वसातला असला तरी अशा प्रकारे गुप्त माहिती कुणाला देणं जरा धोकादायकच असतं. म्हणजे त्या माणसाकडून समजा पासवर्ड वगैरे सारखी गोपनीय माहिती जर का गहाळ झाली तर मग मोठीच अडचण होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यापैकी अनेकजण विविध अकाउंट्सना एकच पासवर्ड वापरतात. अशावेळी मग विश्वसार्हतेची कसोटीच असते.

ही अडचण लक्षात घेऊनच जीमेलने एक खास फीचर सुरू केलेलं आहे. हे असं फीचर आहे की ज्याच्या मदतीने तुम्ही पासवर्ड शेअर न करता तुमच्या ईमेलचा अ‍ॅक्सेस त्या व्यक्तीला देऊ शकता. या फीचरला जीमेल डेलिगेट्स फीचर असं म्हणतं. साध्या अकाउंटसाठी अशी १० इतर अकाउंट्स किंवा डेलिगेट्स जोडता येऊ शकतात. तर वर्क अकाउंटसाठी ही मर्यादा २५ इतकी आहे. हा असा अ‍ॅक्सेस असणारी मंडळी काय काय करू शकतात? तर ते तुमचे इमेल्स वाचू शकतात, इमेल्स पाठवू तसंच डिलीटही करू शकतात. त्यांनी पाठवलेला ईमेल हा त्यांच्या ईमेल आयडीसहित तुमच्या मेसेज बॉक्समध्ये दिसतो. ही डेलिगेट्स मंडळी जीमेल कॉण्टॅक्ट्स मॅनेज करू शकतात. मात्र जीमेलचे सेटिंग्स मात्र बदलू शकत नाहीत. पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती त्यांना बदलता येत नाही. तसंच ते तुमच्या कॉण्टॅक्ट्स सोबत चॅटही करू शकत नाहीत.

जीमेलचं हे फिचर खरोखरच उपयुक्त आहे. त्यामुळे एकच ईमेल आयडी अनेकांना वापरता येऊ  शकतो. कस्टमर सर्विससारख्या क्षेत्रातल्या लोकांसाठी हे फिचर अत्यंत उपयुक्त आहे. हे डेलिगेट्स जीमेलमध्ये कसे आणायचे?

* जीमेल सुरू करून सेटिंग्समध्ये जा. सेटिंग्सच्या अकाउंट्स अँड इम्पोर्ट या टॅबवर क्लिक करा

* ग्रांट अ‍ॅक्सेस टू युअर अकाउंट असा एक ऑप्शन असेल. त्याखाली अ‍ॅड अनदर अकाउंट असं लिहिलेलं असेल. त्यावर क्लिक करा.

* डेलिगेट्सनी वाचलेले मेसेजेस “रेड” किंवा “अनरेड” ठेवायचे हे ठरवून त्यावर क्लिक करा.

* त्यानंतर ज्या व्यक्तीला अ‍ॅड करायचं आहे त्याचा ईमेल आयडी तिथे लिहा आणि कन्फर्म करा.

* ज्या डेलिगेट म्हणजे व्यक्तीचा ईमेल आयडी दिला आहे त्या व्यक्तीला एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर ती मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत क्लिक करणं बंधनकारक असतं. अन्यथा ती लिंक कालबा ठरते. एखाद्यने आपली ही रिक्वेस्ट मान्य केली आहे की नाही हे जर का बघायचं असेल तर पुन्हा अकाउंट्स आणि इम्पोर्ट या सेक्शनमध्ये जायचं. तिथे त्या व्यक्तीने रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट केली आहे की नाही ह्यची माहिती दिलेली असते.

गुगलच्या माहितीनुसार ह्य सा-या प्रकाराला साधारण ३० मिनिटं लागतात. ३० मिनिटांनंतर डेलिगेटला इमेल्सचा अ‍ॅक्सेस मिळतो.

समजा कालांतराने जर का हे डेलिगेट्स डिलीट करायचे असतील तर तशीही सोय गुगलने केलेली आहे.

* पुन्हा सेटिंग्समध्ये अकाउंट्स आणि इम्पोर्टमध्ये जायचं.

* ग्रांट अ‍ॅक्सेसच्या खाली जे ईमेल आयडी असतील त्यापैकी ज्या डेलिगेटला डिलीट करायचं आहे त्याच्या ईमेल आयडीवर क्लिक करायचं आणि डिलीट या ऑप्शनवर क्लिक करायचं.

तर मग आता तुम्ही तुमच्या अनुपस्थितीतही काही व्यक्तींच्या मार्फत कामं करवून घेऊ शकता. फक्त त्यांचे ईमेल आयडी घ्यायचे आणि त्यांना डेलिगेट बनवायचं की झालं काम.

  • Tags: gmail,
  • वाचा / प्रतिक्रिया द्या
    Outbrain