स्मार्टफोन्स असो की टॅब्लेट, दोन्हीसाठी महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे स्क्रीन. मोठा स्क्रीन, चांगलं रिझोल्युशन, पिक्चर क्वालिटी घटक मोबाइल खरेदी करताना महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वेगाने विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानासोबत स्मार्टफोनची उपयुक्तता वाढत आहे हे वास्तव आहे. त्यासोबत या स्क्रीनमध्येही बदल होत आहेत. पण या सगळ्यासोबतच एक महत्त्वाचा बदल होतोय तो म्हणजे स्क्रीन ग्लास ही अधिकाधिक मजबूत होत जातेय. आणि सध्या असणाऱ्या बहुतांश स्मार्टफोन्समध्ये असणारी भक्कम स्क्रीन म्हणजे गोरिल्ला ग्लास.

कॉर्निग या कंपनीने ही ग्लास तयार तयार केली होती. सध्याच्या इलेक्ट्रॉनिक लाइफस्टाइलसाठी बनवण्यात आलेली ही खास काच आहे. स्कॅ्रच आणि इम्पॅक्ट रेझिस्टंट या दोन वैशिष्टय़ांमुळे जवळपास सर्वच स्मार्टफोन्समध्ये या काचेचा वापर आता केला जाऊ  लागलाय. टचस्क्रीनमध्ये व्यत्यय येऊ  नये आणि एकूणच स्मार्टफोनच जड होऊ  नये यासाठी मुद्दाम ही काच पातळ बनवण्यात आली आहे. पण तरीसुद्धा ही काच इतकी मजबूत कशी. इतर काचा आणि या काचेत असा नेमका फरक तरी काय आहे हे जाणून घेणं म्हणजे शाळेतल्या रसायनशास्त्राची एक सैर केल्यासारखं आहे.

इतर प्रकारच्या काचा आणि गोरिल्ला काच यात काही फरक आहेत. इतर प्रकारच्या व्यावसायिक काचा (कमर्शिअल ग्लासेस यासाठी म्हणतात कारण त्या कॉर्पोरेटपासून ते इतर प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेससाठी वापरल्या जातात.) बनवताना वाळू म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साइड, लाइमस्टोन म्हणजेच चुनखडीचा दगड आणि सोडियम काबरेनेट वापरलं जातं. गोरिल्ला ग्लाससाठीही प्रामुख्याने याच घटकांचा वापर केला जातो. सिलिकॉन डायऑक्साइडसोबत इतर दोन रसायनं मिसळली जातात आणि त्यातून तयार झालेली वितळलेल्या रूपातली काच म्हणजे अ‍ॅल्युमिनोसिलिकेट. ही काच एका विशेष प्रकारच्या टाकीमध्ये ओतली जाते आणि रोबोटिक आर्मच्या मदतीने तिच्या शीट्स तयार केल्या जातात. गोरिल्ला ग्लासचं गुपित म्हणजे आयन एक्स्चेंज ही रासायनिक प्रक्रिया

हे जरा कोअर रसायनशास्त्र आहे. पहिल्या फेजमध्ये तयार झालेली अ‍ॅल्युमिनोसिलिकेटची ग्लास पुढल्या टप्प्यात पोटॅशियम आयनमध्ये बुडवली जातात. (याला रासायनिक भाषेत पोटॅशिअम आयनची अंघोळ असं म्हणतात) आता होते काय की या काचेमध्ये असणाऱ्या सोडियम आयनची जागा पोटॅशियम घेतात. पोटॅशियम आयन्सनी कम्प्रेस झालेली अ‍ॅल्युमिनोसिलिकेट तयार होते. या अशा अंघोळीमुळे या काचेची मजबुती वाढते. काचेची ताकद वाढवण्यासाठीच पोटॅशियमचा वापर करण्यात येतो. या काचेवर स्क्रॅच पडत नाहीत. तसंच विशिष्ट अपवाद सोडल्यास मोबाइल पडला तरी ही काच फुटत नाही. अर्थात जोरात आपटला किंवा मोबाइलवर एखादी अवजड वस्तू पडली तर काच नक्कीच तुटेल. विशेष म्हणजे ही गोरिल्ला ग्लास रिसायकलेबल आहे म्हणजेच तिचा पुनर्वापर होऊ  शकतो.

सॅमसंग, एचटीसीपासून ते आसुस आणि इतर अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन तर अशा या गोरिल्ला ग्लासची पाचवी आवृत्ती काही महिन्यांपूर्वी बाजारात आली. या कंपनीच्या मते दोनतृतीयांश मोबाइल हे साधारण कमरेच्या उंचीवरून खाली पडतात. आणि म्हणूनच त्यांची काच किंवा स्क्रीनला तडे जातात. हे प्रमाण कमी करण्यासाठीच गोरिल्ला ग्लासची निर्मिती करण्यात आली. अर्थात गोरिल्ला ग्लास ही लोकप्रिय झालेलं उत्पादन आहे. याशिवाय सफायर क्रिस्टल ग्लास किंवा क्वार्ट्झ ग्लाससारखी अधिक उत्तम उत्पादनेही आहेत. पण प्रत्येक उत्पादनाचे काही फायदे-तोटे असतात.

गोरिल्ला ग्लास मजबूत असली तरी स्क्रीन तुटण्याच्या अनेक घटना घडतातच. त्यामुळे त्याऐवजी सफायर क्रिस्टल ग्लासचा वापर करावा असं काहींचं म्हणणं असतं. सफायर क्रिस्टल ग्लास ही खरोखरच गोरिल्लापेक्षा मजबूत आहे. पण ही काच वाकते आणि त्यामुळे तुटते. आणि म्हणूनच तिचा वापर केला जात नाही. क्वार्ट्झ ग्लास तगडी असली तरी तिचं उत्पादन खर्चीक असतं. म्हणूनच स्वस्त आणि मस्त तसंच किफायतशीर उत्पादन म्हणून बहुतांश स्मार्टफोन कंपन्यांनी गोरिल्ला ग्लासलाच पसंती दिलेली आहे.

पुष्कर सामंत

pushkar.samant@gmail.com