* आमच्या राजापूर तालुक्यात सीडीएमए नेटवर्क चांगले आहे. माझा सीडीएमएचा क्रमांक मला बदलवायचा नाही. तसेच मला एक जीएसएम कार्डही वापरावयाचे आहे. तर एकाच मोबाइलमध्ये सीडीएमए आणि जीएसएम असे दोन्ही कार्ड वापरता येतील असा कोणता मोबाइल आहे. एचटीसी डिझायर ८२० कसा आहे. त्याला कोणता पर्याय असू शकतो.
– जयंत दोरे, जालना
* सीडीएमए आणि जीएसएम या दोन्ही प्रकारचे नेटवर्क एकाच फोनमध्ये वापरायचे असेल तर तुम्हाला यासाठी विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी तुम्ही म्हणत असलेला एचटीसी डिझायर ८२० याचबरोबर एचटीसी डिझायर ८२६ आणि डिझायर एक्ससी हे तिन्ही एचटीसीचे असे डय़ुएल सिम फोन आहेत जयामध्ये आपल्याला फोरजी जोडणी मिळते याचबरोबर आपण एकाच फोनमध्ये जीएसएम आणि सीडीएमए असे कार्ड वापरू शकतो. ८२०च्या तुलनेत ८२६ अधिक अद्ययावत ठरतो. यामध्ये कॅमेरा आणि साठवणूक क्षमता जास्त देण्यात आली आहे. तर एक्ससी हा फोन मध्यम प्रतीचा आहे. यामध्ये आपल्याला अधिक कमी आणि खूप जास्त सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. पण नियमित कामकाज होऊ शकेल असा हा फोन आहे. याशिवाय एचटीसीच्या वन मालिकेतील ८०२ डी हाही फोन जीएसएम आणि सीडीएमएमची सुविधा वापरण्याची मुभा देतो. या फोनचे हार्डवेअर चांगले असले तरी तो इतर बाबतीत खूप जुना ठरतो. तुम्हाला एचटीसी व्यतिरिक्तचे पर्याय हवे असतील तर तुम्हाला एमटीएसचा ब्लेझ ५.०, हेअरचा ई६१९, स्वाइपचा सॉनिक, झेडटीईचा ब्लेज यासारखे पर्याय उपलब्ध आहेत. सॅमसंगसारख्या मातबर ब्रॅण्ड्समध्ये काही पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्यातील अनेक गोष्टी या कालबाह्य ठरल्या आहेत. यामुळे जर तुम्हाला ब्रॅण्ड हवा असेल तर तुम्ही एचटीसीच्या पर्यायांपैकी एक पर्याय निवडू शकता.
* इंटरनेट एक्स्प्लोरर अथवा फायरफॉक्स चालू असताना अचानक ” “Not Responding” असा संदेश येतो व एक चक्र गोलगोल बराच वेळ फिरत राहते, आपण काहीही करू शकत नाही. हे कशामुळे होते व ह्याला उपाय काय?
राजेंद्र रानडे, कल्याण
* इंटरनेट एक्स्प्लोरर किंवा फायरफॉक्स ‘नॉट रिस्पाँडिंग’ सूचना दाखवत असल्यास खालील गोष्टी करून पाहता येतील.
१. ताजे अपडेट इन्स्टॉल करा.
२. अँटिस्पायवेअर प्रोग्रॅम चालवून पाहा.
३. अँटिव्हायरस अपडेट करा.
४. ‘ब्राउजर’च्या ‘अ‍ॅडऑन’मध्ये एखाद्या संशयास्पद प्रोग्रॅमने शिरकाव केला आहे का, ते तपासा.
५. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ‘इंटरनेट टेम्पररी फाइल्स’ डिलीट करा.