कपडय़ांची फॅशन जगासमोर आणणाऱ्या फॅशन सप्ताहात यंदा एक वेगळेपण दिसून आले ते म्हणजे यामध्ये यंदा कपडय़ांबरोबरच परिधेय तंत्रज्ञानाला (वेअरेबल टेक्नॉलॉजी) जागा देण्यात आली होती. यानिमित्ताने पुन्हा एकदा हे तंत्रज्ञान विकण्यासाठी भारतीय बाजारपेठेकडे लक्ष केंद्रित केले जात असल्याचे समोर आले आहे. पाहुयात नेमके काय आहे हे तंत्रज्ञान,
त्याची बाजारपेठ आणि उपयुक्तता.
भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळे येथे येण्यासाठी प्रत्येक कंपनी धडपडत असते. अगदी अ‍ॅपलनेही या बाजापेठेची गरज ओळखून त्यांच्या उत्पादनांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली आहे. संगणकापासून ते मोबाइलपर्यंत येऊन पोहचलेल्या उपयुक्त तंत्रज्ञानाने आता परिधेय तंत्रज्ञानाकडे वाट वळविली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या तंत्रज्ञानाबाबत चांगलीच चर्चा होत असून, तशी उत्पादनेही मोठय़ा प्रमाणावर बाजारात येऊ लागली आहेत. गेल्या वर्षभरात परिधेय तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांची देशातील मागणी २०१४च्या तुलनेत तब्बल ४२.६ टक्क्यांनी वाढली आहे. या कालावधीत सुमारे सात कोटींहून अधिक उत्पादने भारतीय बाजारात विकली गेली. हेच ध्येय २०१९मध्ये तब्बल एक अब्ज ५५ कोटींपर्यंत ठेवण्यात आले आहे. यामुळेच या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार देशभरात विविध माध्यमातून केला जात आहे.
या क्षेत्रात मातब्बर असलेल्या अ‍ॅपल आणि सॅमसंग या जागतिक कंपन्यांच्या तोडीला तोड म्हणून देशातील इंटेक्ससारख्या कंपन्यांनीही या उत्पादनात उडी घेऊन काही उत्पादने बाजारात आणली आहेत. याचबरोबर चिनी कंपन्याही या स्पध्रेत चांगलीच घोडदौड करत आहेत. शिओमीसारख्या कंपन्यांनी मोबाइलच्या रूपाने यापूर्वीच भारतीयांची मने जिंकली आहेत. यामुळे त्यांना आता परिधेय उत्पादनं विकण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही. या परिधेय तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात गुगल, अ‍ॅपल, सॅमसंग, मायक्रोसॉफ्ट अशा कंपन्यांनी आरोग्यविषयक उत्पादनांवर भर दिली होती. याचबरोबर क्रीडा उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीही या क्षेत्रात प्रवेश करत हेल्थ बँडसारखी उत्पादने बाजारात आणली. यामुळेच २०१४च्या तुलनेत २०१५मध्ये फिटनेस बँडच्या विक्रीतच ३८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.
आपल्याला जे माहीत नाही याबाबतची उत्सुकता ही माणसाला पहिल्यापासूनच आहे. यामुळेच अनेक शोध लावणे शक्य झाले. नेमका हाच धागा धरून आपल्या शरीरातील हालचालींचा वेध घेणाऱ्या हेल्थ बँड्सच्या माध्यमातून माणसाला त्याने दिवसभरात किती कॅलरीज गमावल्या व किती कमावल्या याचा हिशेब दिला जाऊ लागला. यामुळे आरोग्याची काळजी घेणे माणसाला जसे सोपे होऊ लागले तसेच कंपन्यांनाही माणसांच्या दिनचर्येवर नजर ठेवणे शक्य होऊ लागले. या माहितीच्या आधारे अनेक औषध कंपन्यांनी आपल्या संशोधनाची दिशा ठरविली आहे. याचबरोबर घडय़ाळ आणि इतर परिधेय उपकरणे आपल्याला आपले दैनंदिन कामकाज अधिक सोपे आणि सुलभ करण्यास मदत करत असते. भविष्यात या उपकरणांमध्ये गेमिंग उपकरणांचाही समावेश होण्याचा अंदाज जाणकार व्यक्त करतात. याशिवाय गुगल ग्लासासारख्या उपकरणांमुळे तर अनेक कामे करणे आणि माहिती मिळवणे अधिक सोपे होणार आहे.
सध्या हेल्थ बँड आणि स्मार्ट घडळय़ांचे प्रमाण बाजारात खूप जास्त आहे. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या काही उत्पादनांची माहिती करून घेऊयात.

हेल्थबँड्स
आपल्या हृदयाचे ठोके मोजण्यापासून ते आपण दिवसभरात किती कॅलरीज गमावल्या व किती कमावल्या इथपर्यंतची माहिती यामध्ये येते. या बँड्समध्ये आपण दिवसभरातील आपले उद्दिष्ट साठवून ठेवू शकतो. जर ते उद्दिष्ट पूर्ण नाही झाले तर हा बँड आपल्याला आठवण करत राहतो. यामध्ये नाइकीसाख्या कंपन्यांपासून ते अगदी लोकप्रिय सॅमसंग, सोनीसारख्या कंपन्यांचे बँड्स बाजारात उपलब्ध आहेत. चिनी मोबाइल कंपनी शिओमीने नुकता ‘शिओमी फिटनेस’ बँड भारतीय बाजारात आणला. याची किंमत वरील सर्व कंपन्यांच्या उत्पादनांना धक्का देणारी ठरली. शिओमीने हा बँड अवघ्या ९९९ रुपयांत बाजारात आणला. हा बँड अँड्रॉइड मोबाइलशी जुळवून घेणार आहे. मोबाइल अ‍ॅपमध्ये आपल्याला बँडने टिपलेली माहिती मिळत राहते. या बँड्समध्येही आता अगदी साध्यातल्या साध्या बँडपासून ते विविध अभिकल्प असलेल्या बँड्सपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. यातील हे बँड्स आता अनेक कॉर्पोरेट्समध्ये ‘स्टाइल स्टेटमेंट’ होऊ लागले आहेत.

स्मार्टवॉच
मोबाइल हातात आल्यापासून घडय़ाळ वापरणाऱ्यांचे प्रमाण तुलनेत कमी झाले. तरीही अनेक लोक विविध प्रकारची घडय़ाळे आपल्या हातात परिधान करतात. पण यात तरुणांची संख्या ही कमीच होती. मात्र आता घडय़ाळाच्या स्मार्टरूपानेही तरुणांना भुरळ पाडली असून स्मार्टवॉचेस तरुणाईच्या मनगटावर विराजमान होऊ लागली आहेत. सध्या बाजारात अगदी अ‍ॅपलपासून ते मोटोरोलापर्यंत विविध कंपन्यांचे स्मार्टवॉच उपलब्ध आहेत. सोनीने नुकतेच स्मार्टवॉच ३ बाजारात आणले असून १७९९० रुपयांच्या या स्मार्टवॉचमध्ये चार जीबी रॅम आणि जीपीएस सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर आरोग्य तपासण्यासाठी हेल्थबँडमध्ये असणाऱ्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. तर सॅमसंगनेही नुकतेच गिअर एस २ची मालिका भारतीय बाजारात आणली आहे. यामध्ये अ‍ॅप्स व डायल फेसेसचा पर्याय देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचसोबत उबेर या टॅक्सी सुविधा पुरवणाऱ्या कंपनीच्या सहकार्याने विशेष सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर आपल्या झोपेच्या चक्राचे विश्लेषण करणाऱ्या ‘जी नाइट स्लीप’ या कंपनीच्या सहकार्याने त्याचे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय अनेक उपयुक्त अ‍ॅप्स या वॉचमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील पांढऱ्या रंगाचे घडय़ाळ २४,३०० रुपयांना, क्लासिक गोल्ड व प्लॅटिनम व्हेरिएन्ट्स ३४९०० रुपयांना बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर एलजीनेही स्मार्ट घडय़ाळय़ांच्या विविध मालिका भारतीय बाजारपेठेत आणल्या आहेत. अ‍ॅपलनेही नुकतेच नवी स्मार्टवॉच बाजारात आणले असून त्यामध्ये सिरिसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

– नीरज पंडित
niraj[dot]pandit[at]gmail[dot]com