माहिती जंजाळाने भरलेल्या या डिजिटल युगात वापरकर्त्यांला आपल्या ब्रॅण्डशी जोडून आणि त्यात गुंगवून ठेवणं, ही अशक्यप्राय गोष्ट ठरली आहे. आपल्या ब्रॅण्डचा प्रचार व प्रसार करण्यासाठी वापरकर्त्यांला प्रोत्साहित करण्यासाठी विक्रेते आता जाहिराती आणि सवलतींच्या पलीकडे जाऊन विचार करू लागले आहेत. काय आहे हा नवा ट्रेण्ड, याबद्दल सांगताहेत ‘लकीस्टार्स अ‍ॅप’चे संस्थापक हेतीन साखुजा..

ब्रॅण्ड, मग ते कुठल्याही क्षेत्रातले असोत. ग्राहकवर्गाचं लक्ष वेधून घेण्यासाठी, उत्पादनाची माहिती त्यांच्यापर्यंत कमी वेळेत आणि कमी जागेत पोहोचवण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. या निमित्ताने जाहिरातींचा नको इतका मारा होतो आणि सवलतींची अनावश्यक किंवा अनेकदा निरुपयोगी खरात केली जाते. अशा प्रचारातून ग्राहकांचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि आपल्या उत्पादनाची विक्री वाढेल, असा हेतू कंपन्यांचा असतो. पण हा अंदाज कितपत खरा ठरतो?

सध्या ज्या वेगाने वापरकर्त्यांवर माहितीचा मारा होतो आहे, तो पाहता विविध माध्यमांतून येणाऱ्या जाहिरातींवर विचार करायला कुणाकडेही वेळ नाही. अर्थात ज्ञानाची किंवा एखाद्या उत्पादनाची खरोखरच गरज असेल तर त्यासंबंधित माहिती पुरवणारी असंख्य संकेतस्थळे इंटरनेटवर उपलब्ध आहेत. यातील काही संकेतस्थळे संबंधित उत्पादनाचा विविध ब्रॅण्डनुसार तुलनात्मक अभ्यासही करून देतात. असे असले तरी, आजही जाहिराती हेच बॅ्रण्डच्या प्रचाराचे महत्त्वाचे माध्यम आहे.

डिजिटायजेशनच्या वाढत्या प्रसारात केवळ जाहिरातींवर अवलंबून राहणे अयोग्य आहे. आज स्मार्टफोनमुळे वाणीसामान खरेदी करण्यापासून बँकिंग व्यवहार करण्यापर्यंत प्रत्येक कामासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. यामुळे ग्राहकांचे, वापरकर्त्यांचे वेळ आणि कष्ट वाचतात. अशा वेळी डिजिटल माध्यम हे ब्रॅण्डच्या प्रसाराचे मोठे माध्यम आहे. भारतातील ३० कोटी स्मार्टफोनधारकांची संख्या लक्षात घेता, विपणन क्षेत्रातील मंडळी वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे डिजिटल बजेट ठरवत आहेत. डिजिटल माध्यमांवर गेल्या काही वर्षांत वाढलेला खर्च पाहता, ही गोष्ट अधोरेखित होते. पण डिजिटल माध्यमातून जाहिराती करून आपल्या ‘टार्गेट’ ग्राहकाकडे पोहोचण्यात कंपन्यांना यश मिळते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. डिजिटल माध्यमांमुळे एका विशिष्ट वर्गाला आपल्याकडे आकर्षित करता येणे शक्य आहे. पण यातून मिळणाऱ्या यशाचे मोजमाप करणे अशक्य आहे. अशा माध्यमातून केलेला प्रचार कितपत प्रभावी ठरला, हे सांगणेही कठीण आहे.

अशा परिस्थितीत विपणन व्यावसायिकांनी तसेच कंपन्यांनी नवनवीन प्रचारमाध्यमांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यातलेच एक माध्यम म्हणजे अ‍ॅप्स. अ‍ॅप्समुळे आपल्या उत्पादनाचा प्रचार कोणापर्यंत व किती झाला, हे मोजणे जितके शक्य आहे, तितकेच या माध्यमातून ठिकाण, कालखंड आणि ग्राहकांच्या सवयी जाणून घेणेही शक्य होते. जोपर्यंत आपण अंतिम ग्राहकाशी थेट जोडले जात नाही किंवा त्याला आपल्या उत्पादनात गुंतवून ठेवत नाही, तोपर्यंत कितीही जाहिराती किंवा प्रोत्साहनात्मक सवलती देऊन अपेक्षित परिणाम साधता येणार नाही, ही गोष्ट आता कंपन्यांच्या लक्षात आली आहे. ‘ब्रॅण्ड निष्ठा’ किंवा ‘ब्रॅण्ड लॉयल्टी’ ही संकल्पना आताच्या काळात नामशेष झाली आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांला गुंगवून ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग करण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. माध्यमांचे नानाविध प्रकार, स्मार्टफोनचा वाढता वापर आणि अ‍ॅप्स यांनी वापरकर्त्यांच्या रोजच्या जीवनातील मोठय़ा जागेवर कब्जा केला आहे. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांला आपल्या उत्पादनाशी जोडून ठेवण्यासाठी ‘बक्षीस’ देणे हा नवीन कल असू शकतो. सध्या तसे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. अनेक कंपन्या ग्राहकांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्पर्धेवर आधारित संकेतस्थळ किंवा अ‍ॅप विकसित करण्यावर भर देत आहेत. या माध्यमातून वापरकर्त्यांना केवळ अ‍ॅप हाताळण्यासाठी आकर्षक भेटवस्तू देण्याचा फंडा कंपन्यांनी शोधला आहे. मोबाइल फोन, दुचाकी, ऑनलाइन व्हाऊचर, स्मार्ट टीव्ही अशा बक्षिसांची लयलूट करत कंपन्या ग्राहकांना स्वत:शी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे माध्यम सध्याच्या परिस्थितीत प्रभावीदेखील ठरू शकते. अशा माध्यमातून उत्पादनाची माहिती सर्वत्र पोहोचवता येते. या माध्यमामुळे वापरकर्त्यांची माहिती अन्य डिजिटल माध्यमांच्या तुलनेत कमी खर्चात मिळू लागली आहे. वापरकर्त्यांसाठी ही वेबसाइट किंवा अ‍ॅप म्हणजे आकर्षक वस्तू जिंकवून देणारी एक स्पर्धा असते. त्यामुळे त्यांचाही याकडे ओढा वाढत जातो.

सध्या हा कल पूर्णपणे रुजलेला नसला तरी तरुणवर्गाला ‘लक्ष्य’ करण्यात तो यशस्वी होत आहे. विशेषत: अशा प्रकारच्या स्पर्धाची प्रसिद्धी मौखिक स्वरूपातून अधिक होते. भारतासारख्या देशात, जिथे निम्मी लोकसंख्या २५ पेक्षा कमी वयोगटातील आहे आणि ६५ टक्के लोकसंख्या ३५च्या आतील वयोगटातील आहे, तिथे अशा प्रकारचा प्रसार कंपन्यांना उपयोगी ठरू शकतो.

भारतीय लोकांच्या गेम खेळण्याच्या सवयींवर असलेल्या एका अहवालानुसार ६५% पुरुष आणि ३५% महिला सरासरी महिन्याचे ७ तास गेम खेळण्यात घालवतात. संशोधन पुढे असे दर्शवते की पुरुष दरमहा ८.५, तर महिला दरमहा ६ तास मोबाइलवर गेम खेळतात, यातले सर्वाधिक ३५ टक्के २५ ते ३४ वयोगटातील तरुण आहेत. तर एकूण ८५% खेळाडू हे ४४ वर्षांच्या आतील आहेत. भारतीय गेमिंग उद्योग ५७१ दशलक्ष डॉलपर्यंत पोहोचला असून त्यात गतवर्षीपेक्षा १३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत स्पर्धा किंवा गेमवर आधारित प्रचारमाध्यम हे प्रभावी माध्यम ठरेल, यात शंका नाही.