25 November 2020

News Flash

अस्सं कस्सं ? : ऐका हो ऐका!

आरएफ हेडफोन्स हे अधिक अंतरावरसुद्धा व्यवस्थित काम करू शकतात. इन्फ्रारेडची मर्यादा तर आपणा सर्वानाच माहीत आहे.

जसा मोबाइल हा एक अविभाज्य घटक बनला आहे, तसंच हेडफोन्स, इअरफोन्सही मूलभूत अंग बनलं आहेत. ट्रेन, बसमध्ये तर इअरफोनमधून थेट कानात शिरणारं संगीत ऐकणारे खाली माना घालून विनम्रतेने मोबाइलच्या स्क्रीनला शरण गेलेले तरुण-तरुणी पाहिले की क्षणभर आपल्यालाही गर्दीचा विसर पडतो. मोबाइल फोन्स आणि इअरफोन्स हा किती मोठा आधार आहे असंच वाटू लागतं. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत इअरफोन्स हे मोबाइलसोबतच यायचे. पण गेल्या काही वर्षांमध्ये, खास करून दोन वर्षांत ही अ‍ॅक्सेसरी मोबाइलसोबत येणं बंद झालंय. किमती कमी करण्याच्या नादात खोक्यातून इअरफोन्स गायब झाले आणि चार्जरची वायरही छोटी केली. त्यामुळेच आता वेगळे इअरफोन्स घेणं निकडीचं बनलंय. अर्थात १००-१५० रुपयांचे कामचलाऊ इअरफोन्स घेऊन संगीताचा आनंद घेणारे ढिगाने आहेत. पण त्यातून बाहेर येणारा आवाज, संगीत याच्या दर्जाचं काय? स्मार्टफोनची साउंड क्वालिटी कितीही चांगली असली तरी इअरफोन, हेडफोनचा दर्जा जर का खराब असेल तर काय उपयोग? त्यामुळेच थोडे जास्त पैसे मोजून चांगल्या दर्जाचे इअरफोन किंवा हेडफोन्स घ्यायला काय हरकत आहे?

इअरफोन्स किंवा हेडफोन्स कसे निवडाल?
मुळात हेडफोन्सचे तीन प्रकार आहेत.
इन-इअर : इन-इअर हेडफोन्स हे सर्वात लहान आणि पोर्टेबल असे हेडफोन्स आहेत. सर्वसामान्यत: हेच हेडफोन्स वापरले जातात. इअरबड्स थेट कानात घातले जातात. आकाराने लहान आणि सहजरीत्या पोर्टेबल असल्याने हे हेडफोन्स लोकप्रिय आहेत. इअरबड्स हे कानात नीट अ‍ॅडजस्ट होत नसल्याची तक्रार अनेकदा केली जाते. त्यामुळे अ‍ॅडजस्टेबल इअरफोन्सही अनेक कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात आले आहेत. मात्र या इअरफोन्सबाबत केली जाणारी मुख्य तक्रार म्हणजे वायरीचा गुंता सोडवण्यात जाणारा वेळ. अर्थात तुम्ही चोळामोळा करून ज्या पद्धतीने इअरफोन बॅगेत ठेवता ते बघता त्याचा गुंता होणं साहजिकच आहे. याला सोप्पा उपाय म्हणजे ज्या पद्धतीने मांजा लपेटतो बोटांना अगदी तशाच पद्धतीने वायर गुंडाळायची. म्हणजे फारसा त्रास होत नाही.

ऑन-इअर्स :
ह्याचं केसिंग हे थेट कानावर बसणारं असतं म्हणूनच त्यांना ऑन-इअर्स हेडफोन्स म्हणतात. काही वर्षांपूर्वी सोनी एक्सपिरियासोबत मोफत मिळणारे हेडफोन्स हे त्याचं उत्तम उदाहरण. डोक्यावर हेडबॅण्ड असल्याने अत्यंत कम्फर्टेबल असे हे हेडफोन्स असतात. अडीचशे रुपयांपासून ते अगदी काही हजारांपर्यंत अशी या हेडफोन्सची रेंज असते. साधारण पाचशे-सहाशेपर्यंत चांगल्या दर्जाचे हेडफोन्स नक्कीच मिळू शकतात.

ओव्हर-इअर्स :
ओव्हर-इअर्स हेडफोन्समध्ये कानाच्या भोवती केसिंग असतं. गेमिंग किंवा साउंड रेकॉर्डिगसाठी प्रामुख्याने हे हेडफोन्स वापरले जातात. आकाराने जरा बोजड असले तरी दर्जा मात्र भारीच असतो. खिशाला कात्री लावणारे हे हेडफोन्स संगीत आणि सिनेमाप्रेमींसाठी पर्वणीच. सर्वात कम्फर्टेबल असे हे हेडफोन्स समजले जातात.
स्वत:च्या गरजेनुसार आणि बजेटनुसार या तीन प्रकारांपैकी एक प्रकार निवडायचा आणि हेडफोन्स विकत घ्यायचा. अर्थात यामध्ये आणखीही काही स्पेसिफिकेशन्स असतातच, पण कुठल्याही
प्रकारचा हेडफोन निवडताना एक गोष्ट करायची. अ‍ॅकॉस्टिक गिटार किंवा पियानो म्युझिक ऐकायचं. चांगल्या आणि वाईट हेडफोन्समधला फरक लगेच कळतो.

इतर वैशिष्टय़े कोणते?
tech04नॉइज कॅन्सलिंग : अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलिंग टेक्नॉलॉजी ही सध्याच्या अनेक इअरफोन्स तसंच हेडफोन्समध्येही उपलब्ध आहे. विशिष्ट प्रकारच्या ध्वनिलहरींचा परिणाम कमी करणं किंवा संपूर्णपणे काढून टाकणं हे या तंत्रज्ञानाने शक्य असतं. हेडफोनना एक छोटा मायक्रोफोन लावलेला असतो. हा मायक्रोफोन आजूबाजूचा आवाज कॅप्चर करतो. आणि त्याच्या विरुद्ध फ्रिक्वेन्सीचा ध्वनी निर्माण केला जातो. ज्यामुळे आजूबाजूचा आवाज ऐकू येत नाही. अर्थात सगळ्याच प्रकारच्या आवाजांसाठी हे तंत्रज्ञान काम करतं अशातला भाग नाही. पण विमानाच्या इंजिनाचा, फॅक्टरीतल्या मशीन्सचा, एसीचं हमिंग अशा लयबद्ध फ्रिक्वेन्सीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरतं. याचा तोटा एकच आहे. तो म्हणजे हे हेडफोन्स बॅटरी जास्त वापरतात. नॉइज कॅन्सलिंगसाठी पॉवर वापरली जात असल्याने बॅटरी खर्च होते.
वायरलेस : इअरफोनच्या वायरीचा गुंता फारच तापदायक ठरत असेल आणि त्यातून मुक्तता हवी असेल तर सरळ वायरलेस हेडफोन्सचा पर्याय निवडा. यामध्ये तीन प्रकार आहेत. रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ), इन्फ्रारेड आणि ब्लूटूथ. रेडिओ फ्रिक्वेन्सी आणि इन्फ्रारेड हेडफोन्ससाठी एक वेगळं बेसयुनिट गरजेचं असतं. जे सोर्स डिव्हाइसला म्हणजेच मोबाइल किंवा टॅब्लेट, साउंड सिस्टीमला जोडावं लागतं. ब्लूटूथसाठी मात्र तशा कुठल्याही डिव्हाइसची गरज नसते. आरएफ हेडफोन्स हे अधिक अंतरावरसुद्धा व्यवस्थित काम करू शकतात. इन्फ्रारेडची मर्यादा तर आपणा सर्वानाच माहीत आहे. ब्लूटूथ हेडफोन्सची रेंज ही साधारण ३० मीटर इतकी असते. त्यामुळे घरातल्या घरात वापरासाठी ब्लूटूथ हेडफोन्स उत्तम.
इन-इअर हेडफोन्समध्ये इअरबड्सच्या अनेक तक्रारी असतात. तसंच वायर्स पातळ असल्याने त्या अनेकदा तुटतात. त्यामुळे त्या प्रकारचे हेडफोन्स घेत असताना इअरबड्स आणि वायर्सचा दर्जा नक्की बघा. तसंच कुठल्याही कंपनीचा किंवा ब्रॅण्डचा हेडफोन हा घामामुळे खराब होतोच. त्यामुळे किती वेळ आपण कानाला हे अंग लावतोय हे ज्याने त्याने ठरवावं. मोबाइल स्क्रीनला शरण जाताना डोळे आणि कान दोन्ही खराब कशाला करा? हो की नाही?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2016 2:41 am

Web Title: how to choose headphones earphones
Next Stories
1 टेक-नॉलेज : अ‍ॅपआधारित टीव्ही पाहिजे
2 भारतीय, पाश्चात्त्य वाद्यसुरांचा मिलाफ
3 ‘मायक्रोमॅक्स’ने लोगो बदलला, स्मार्ट फिचर्सचा ‘कॅनव्हॉस ६’ दाखल
Just Now!
X