* मला वाय-फाय राउटर घ्यायचा आहे. त्याची निवड करताना नेमके काय विचारात घ्यावे हे सांगावे.
– नंदकिशोर तपकीर, नाशिक
* वायफाय राउटर निवडताना सर्वप्रथम आपण इंटरनेटचा वापर नेमका कोणकोणत्या कामांसाठी करतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. राउटरची निवड करत असताना आपल्याला त्यावर बँड दिसतात. यामध्ये २.४ आणि ५ गीगाहर्ट्झ बँड नमूद केलेले दिसते. म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला वायररहित जोडणी उपलब्ध होणार आहे. ८०२.११ बी आणि जी उपकरणांसाठी २.५ गीगाहर्ट्झचे राउटर उपयुक्त ठरते. तर ८०२.११एम उपकरणांसाठी २.४ आणि ५ गीगाहर्ट्झचे राउटर लागते. मात्र ८०२.११एसीसाठी केवळ ५ गीगाहर्ट्झचे राउटर लागते. ५ गीगाहर्ट्झचे राउटर हे २.४ गीगाहर्ट्झच्या तुलनेत जास्त उपकरणांना किंवा अधिक जलद इंटरनेट जोडणी पुरवू शकते. मात्र या दोन्ही राउटर्समध्ये सतत इंटरनेट जोडणी पुरवण्याची क्षमता नसते. यामुळे बरेच तास इंटरनेट जोडणी पुरविल्यानंतर काही सेकंदासाठी ती खंडित होते. तुम्हाला जर सिंगल बँड इंटरनेट जोडणी हवी असेल तर तुम्ही २.४ किंवा ५ गीगाहर्ट्झचे राउटर घेऊ शकता. मात्र डय़ुएल बँडसाठी तुम्हाला ५ गीगाहर्ट्झचे राउटरच घेणे क्रमप्राप्त आहे. तसेच राउटरची जागा ठरविताना संपूर्ण घरात किंवा कार्यालयात रेंज येईल अशा प्रकारे ठेवणे फायदेशीर ठरले. एवढे करूनही काही उपकरणांवर इंटरनेट चालत नाही. अशा वेळी उपकर कोणती वायफाय जोडणी स्वीकारणार हे लक्षात घ्यावे लागते. काही उपकरणे अशी आहेत की ज्याला केवळ त्याच क्षमतेची वायफाय जोडणी लागते. मोबाइल, लॅपटॉपसाठी कोणतीही जोडणी चालू शकते. मात्र इंटरनेटशी जोडल्या जाणाऱ्या इतर स्मार्ट उपकरणांसाठी ही पातळी पाहणे गरजेचे ठरते. वायफाय राउटरचे जागतिक प्रमाण हे ८०२.११ एन असे आहे. यापूर्वीचे व्हर्जन हे ८०२.११एन ड्राफ्ट असे होते. यामुळे राउटर खरेदी करताना ही काळजी घेणेही गरजेचे आहे. केवळ घरगुती वापरासाठी किंवा लघुउद्योगांसाठी जर राउटर्स आवश्यक असतील तर ते सिंगल बँड असले तरी उपयुक्त ठरतात. जर तुम्हाला इंटरनेट गेमिंग किंवा मल्टिमीडिया वापर करायचा असेल तर तुम्हाला डय़ुएल बँड राउटरची गरज पडेल. याचबरोबर जोडणीचा वेगही पाहणे तितकेच महत्त्वाचे ठरते. १५० एमबीपीस, ३०० एमबीपीस, ९००एमबीपीस.. असे क्रमांक तुम्हाला वायफाय राउटर खरेदी करताना दिसतील. याचा अर्थ हे राउटर जास्तीतजास्त इतका वेगाने इंटरनेट पुरवू शकणार आहे. यामुळे राउटर घेताना नेहमीच जास्त वेगक्षमता असलेले राउटर घेणे फायदेशीर ठरते. याचबरोबर आपल्या घरातील इंटरनेट जोडणीतून किती वेग मिळतो हेही तपासणे गरजेचे ठरते. नाहीतर मूळ वेग कमी असतानाच जास्त वेगाचे राउटर घेऊन काही फायदा होणार नाही. अनेक ई-बाजार संकेतस्थळांवर १७५० एमबीपीस आणि १९०० एमबीपीसचे राउटर्सही मिळतात. राउटरची सुरक्षाही तितकीच महत्त्वाची असते. यामुळे नवीन तंत्रज्ञानावर आधारित सर्वच राउटर आपल्याला उच्च दर्जाची सुरक्षा पुरवीत असले तरी खरेदी करत असलेले राऊटर ‘डब्लूपीए २’ आधारित आहे हे तपासून घ्या.
* हॉटस्पॉट म्हणजे काय? त्याचा मोबाइलवरून कसा वापर करता येतो.
प्रियंका महाजन, सांगली
* मोबाइल किंवा इंटरनेट पुरविणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून वायफायद्वारे इंटरनेट जोडणी करणे या प्रक्रियेला हॉटस्पॉट प्रक्रिया असे म्हणतात. यामुळे आपल्या मोबाइलवरील इंटरनेट आपण लॅपटॉप किंवा इतर मोबाइलमध्येही वापरू शकतो. हे करत असताना वेग मात्र कमी मिळतो. पण जर तुमच्याकडे थ्रीजी किंवा आता फोरजी जोडणी असेल तर तुम्ही हॉटस्पॉटचा वापर अधिक प्रभावीपणे करू शकता. हॉटस्पॉटचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपला मोबाइल हे वापरण्यासाठी परवानगी देतो का ते पाहावे लागते. आयफोन किंवा ब्लॅकबेरी, ल्युमिया तसेच सॅमसंगच्या काही महागडय़ा फोनमधून हॉटस्पॉट करता येत नाही. जर तुमच्या फोनमध्ये हॉटस्पॉट सुविधा उपलब्ध असेल तर तुम्ही ती जोडणी करण्यासाठी सर्व प्रथम तुम्ही तुमच्या मोबाइल मधील सेटिंग्जमध्ये जाऊन तेथे वायरलेस अँड नेटवर्क या पर्यायामध्ये जा. तेथे तुम्हाला ‘टेथरिंग अँड पोर्टेबल हॉटस्पॉट’ हा पर्याय दिसेल किंवा जर तो दिसला नाही तर मोअर नेटवर्क्‍समध्ये जाऊन हा पर्याय निवडा. हा पर्याय निवडल्यानंतर मोबाइल हॉटस्पॉट बंद असेल ते सुरू करा. काही मिनिटांमध्ये तुम्हाला मोबाइलवर आयकॉन ऑन झालेला दिसेल व नवीन हॉटस्पॉट उपलब्ध होईल. हा हॉटस्पॉट सुरू झाल्यावर तुम्ही त्या हॉटस्पॉटच्या परिघात असलेले कोणतेही उपकरण वायफायच्या जोडणीने जोडू शकता.
तंत्रस्वामी 

नवीन गॅझेट किंवा तांत्रिक शंकांचे समाधान करण्यासाठी आपले प्रश्न lstechit@gmail.com 
या ईमेलवर पाठवा.