सध्या मोबाइल कॅमेऱ्यांमुळे कोणत्याही ठिकाणचा व्हिडीओ घेणे सहज सोपे झाले आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात लाइव्ह स्ट्रिमिंग अर्थात थेट प्रक्षेपण करण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. आजकाल अनेक कार्यक्रमांचे सोहळे फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबच्या माध्यमातून थेट प्रसारित केले जातात. मात्र, हे तुम्हीदेखील तुमच्या मोबाइलच्या साह्य़ाने सहज करू शकता.

लाइव्ह स्ट्रिमिंग म्हणजे एखादी घटना किंवा प्रसंग घडत असतानाच तो इंटरनेटच्या माध्यमातून प्रसारित करणे होय. दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत व्हिडीओ चित्रित करून त्याचे संपादन करून ते यूटय़ूब, डेलीमोशन यांसारख्या माध्यमांतून इंटरनेटवर प्रसारित केले जात असत. एखाद्या कार्यक्रमाचे वा घटनेचे लाइव्ह स्ट्रिमिंग करायचे म्हटल्यास त्यासाठी वेगळी यंत्रणा व व्यवस्था उपलब्ध असावी लागत होती. परंतु आता स्मार्टफोनवरील व्हिडीओ सुविधेत मोठी सुधारणा झाली असून सर्वसामान्य वापरकर्ताही कोणत्याही स्वतंत्र तांत्रिक साधनांशिवाय लाइव्ह स्ट्रिमिंग करू शकतो. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफार्मवरून लाइव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या समाजमाध्यमांचा वापर करून तुम्ही अतिशय सहजपणे एखाद्या घटनेचे वा प्रसंगाचे थेट प्रक्षेपण इंटरनेटद्वारे करू शकता.

आता लाइव्ह स्ट्रिमिंगचा उपयोग काय, असा प्रश्न आपल्यापैकी काही जणांना पडू शकतो. याची अनेक उत्तरे असू शकतात. तुमच्या कुटुंबातील एखादा मोठा कार्यक्रम असल्यास तुम्ही त्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग करून या सोहळ्यास उपस्थित नसलेल्यांनाही त्यात सामील करून घेऊ शकता. याशिवाय एखादे पर्यटनस्थळ, एखादी महत्त्वाची घटना तुम्ही चित्रित करत असतानाच इंटरनेटवरून ती प्रसारित करू शकता. लाइव्ह स्ट्रिमिंग कसे करायचे, हे आता आपण जाणून घेऊ.

फेसबुकवरून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी..

फेसबुकवरून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी स्मार्टफोनवरील फेसबुकचे अ‍ॅप सुरू करा. तेथे स्टेट्स अपडेट बॉक्समध्ये तुम्हाला लाइव्हचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्ही लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू करू शकता. पहिल्या वेळेस तुम्ही लाइव्हवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला ही प्रक्रिया कशी पार पडते, त्याचा डेमो दाखवला जातो. तो पाहिल्यानंतर तुम्हाला याबाबत अधिक माहिती मिळू शकते. विशेष म्हणजे, फेसबुकवरून लाइव्ह स्ट्रिमिंग करत असताना तुम्ही तुमच्या ठरावीक मित्रांपुरतेच हे प्रसारण ठेवू शकता.

यूटय़ूबवरून लाइव्ह स्ट्रिंमग

यूटय़ूब हे जगभरातील व्हिडीओचे महाजाल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जगाच्या कानाकोपऱ्यातील वापरकर्त्यांनी अपलोड केलेले व्हिडीओ यूटय़ूबच्या माध्यमातून पाहता येतात. याच यूटय़ूबने आता लाइव्ह स्ट्रिमिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सध्या ही सुविधा यूटय़ूबकडून पडताळणी झालेल्या खात्यांच्या वापरकर्त्यांनाच उपलब्ध असून आतापर्यंत दहा हजारांहून अधिक जण या सुविधेचा लाभ घेत आहेत. लवकरच ही सुविधा सर्वासाठी खुली करण्याचा यूटय़ूबचा विचार आहे.

यूटय़ूबवरून लाइव्ह स्ट्रिमिंग सुरू करण्यासाठी तुमच्या स्मार्टफोनवरील यूटय़ूबचे अ‍ॅप सुरू करा. आयफोनवरील यूटय़ूबच्या अ‍ॅपवर उजव्या बाजूस वरच्या कोपऱ्यात असलेल्या कॅमेऱ्याच्या चिन्हावर क्लिक करा. अ‍ॅण्ड्रॉइड फोनवरील यूटय़ूबच्या अ‍ॅपमध्ये कॅमेऱ्याचे चिन्ह खालच्या बाजूस उजवीकडे दिसेल. कॅमेऱ्याच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर तुम्हाला गो लाइव्ह हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर टायटलमध्ये तुम्ही कशाचे स्ट्रिमिंग करत आहात, त्याची नोंद करा व नेक्स्ट करा. या ठिकाणी हे अ‍ॅप व्हिडीओच्या थंबनेलसाठी तुमचा सेल्फी घेते. हे झाल्यानंतर गो लाइव्हच्या चिन्हावर क्लिक करा. तुमच्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड होणारा व्हिडीओ तात्काळ इंटरनेटवरून प्रसारित होईल. जेव्हा चित्रीकरण थांबवायचे असेल तेव्हा फिनिश हे चिन्ह क्लिक करा.

ट्विटरवरून लाइव्ह स्ट्रिमिंग करण्यासाठी..

तुमच्या स्मार्टफोनवरील ट्विटरचे अ‍ॅप सुरू करा. त्यात ट्वीटचे बटण करताच तुम्हाला लाइव्हचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही कसले लाइव्ह स्ट्रिमिंग करत आहात, ते नोंदवा व गो लाइव्हवर क्लिक करून थेट प्रसारण सुरू करा.