15 August 2020

News Flash

तंत्राविष्कार

आयआयटी मुंबईतील तंत्र महोत्सव हा तमाम तंत्रप्रेमींसाठी एक पर्वणीच असते.

आयआयटी मुंबईतील तंत्र महोत्सव हा तमाम तंत्रप्रेमींसाठी एक पर्वणीच असते. या तंत्र महोत्सवात आलेले तंत्राविष्कार पाहण्यासाठी तसेच आपण विकसित केलेले तंत्राविष्कार यात सादर करण्याची संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असते. या महोत्सवात पुढील दहा वर्षांनंतर आपल्याला उपयुक्त ठरू शकेल असे तंत्रज्ञान पाहावयास मिळते. यंदाच्या तंत्र महोत्सवात नेमके कोणते तंत्रज्ञान पाहावयास मिळाले यावर एक झलक.

बायोनिक हात

रोबो हे तंत्र महोत्सवाचे विशेष आकर्षण मानले जाते. रोबो तंत्रज्ञानाच्या विविध आविष्कारांची झलक या तंत्र महोत्सवात पाहावयास मिळाली. यात सर्वाचे लक्ष वेधून घेतले ते बायोनिक हातने. अगदी मानवी हाताप्रमाणे काम करणारा हा रोबोटिक हात वैद्यक क्षेत्रापासून ते अगदी विज्ञानातील विविध क्षेत्रांपर्यंत उपयुक्त ठरणार आहे. हा हात समोरून आलेला चेंडू झेलू शकत होता. याचबरोबर समोरच्या व्यक्तीकडे चेंडू फेकूही शकत होता. यामुळे रोबोच्या तांत्रिक रचनेला छेद दिला असून अगदी माणसासारखा भासणारा रोबो विकसित करण्यासही मदत होणार आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता रोबो

आपल्याशी गप्पा मारणारा रोबो ही संकल्पना दोन ते तीन वर्षांपूर्वी याच तंत्र महोत्सवात सादर करण्यात आली होती. तेव्हा ही संकल्पना सर्वाच्या कुतूहलाचा विषय बनला होती. मात्र या संकल्पनेचा पुढे जात आपली विचारपूस करणारा रोबो चंदीगढ येथील इशांत पुंदिर या अकरावीतील विद्यार्थ्यांने विकसित केला. हा रोबोही सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. हा रोबो म्हणजे आपला सोबती व आपली काळजी घेणारा असणार आहे. या रोबोच्या संगणकीय भाषेशी आपले नाते जुळले की तो आपल्याशी अगदी आपल्या मित्रासारखा बोलू लागतो. रोबोच्या संगणकीय भाषेत आपण आपल्या नातेवाईकांचा तपशील एकदा सेव्ह केला की तो त्याचा संदर्भ लावून आपल्याशी गप्पा मारतो. म्हणजे जर या रोबोशी आपले नाते जुळले असेल तर आपण घरात आल्यावर तो आपली विचारपूस करतो. केवळ कसा आहेस इतकेच न विचारता आपण दिलेल्या उत्तराचा आवाज ऐकून आपण दु:खी आहोत की आनंदी आहोत हेही तो ताडतो आणि त्यानुसार पुढच्या गप्पा मारतो. इतकेच नव्हे तर आपल्या वतीने आपले निरोपही तो घेऊन ठेवतो. म्हणजे जर आपल्या आईने रोबोकडे निरोप दिला की, मला फोन करायला सांग, तर यापूर्वीचा रोबो केवळ तांत्रिक निरोप देत असे. मात्र हा रोबो केवळ तांत्रिक निरोप न देता तुझी आई तुझी काळजी करत असेल तर तू फोन केलास तर बरे होईल, अशी सूचना करतो. म्हणजे रोबोला मिळालेल्या संदेशाचे तुकडे करून तो आकलन करतो व त्याच्या आकलनानुसार आवश्यक ते वाक्य बनवून आपल्याला सांगतो. याचबरोबर या रोबोमध्ये सिमकार्ड आणि फोनची सुविधा असल्यामुळे आपण सांगितलेल्या व्यक्तीला फोन लावून देण्याचे कामही हा रोबो करतो. रोबोमध्ये वापरली जाणारी कृत्रिम बुद्धिमत्तेची पातळी अधिक विकसित करून इशांतने हा रोबो विकसित केला आहे. याचबरोबर जर आपल्याला बरे नसेल तर हा रोबो आपल्याला आजारावरील औषधेही सुचवितो. तसेच आपल्या आईला किंवा कुटुंबीयांना व डॉक्टरला लघुसंदेशही पाठवतो. या सर्व अतिरिक्त सुविधांमुळे हा रोबो अधिक वेगळा ठरला होता.

माइंड कंट्रोल ड्रोन

रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने उडणारा ड्रोन हा सर्वानीच पाहिला असेल किंवा त्याबद्दल वाचलेही असेल. मात्र आपल्या मेंदूने नियंत्रण मिळवता येणारा ड्रोन हा खूपच वेगळा विषय असून हाच ड्रोन यंदाच्या तंत्र महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. या ड्रोनला नियंत्रण करणाऱ्या उपकरणाच्या वायर्स आपल्या डोक्याला जोडल्या की आपण मनात जो विचार करू त्यानुसार ड्रोन प्रवास करू लागतो. यामध्ये फ्लोरिडा विद्यापीठाने नुकतीच अशाच प्रकारच्या ड्रोन्ससाठी स्पर्धाही ठेवली होती. हा ड्रोन पाहण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला आपल्या विचारांद्वारे त्याच्यावर नियंत्रण आणायचे होते. यामुळे हा अनुभव घेण्यासाठी या ठिकाणी चांगलीच गर्दी जमली होती. हा ड्रोन शत्रूच्या भागात टेहळणी करण्यासाठी वापरता येऊ शकतो. ड्रोनमध्ये लावलेल्या कॅमेऱ्याच्या साह्य़ाने आपल्याला त्या भागात नेमके काय सुरू आहे, तेथे वाटेत कोणते अडथळे आहेत याची माहिती घेता येऊ शकते. याचबरोबर ज्या ठिकाणी माणसे जाऊ शकत नाहीत अशा ठिकाणीही हे ड्रोन जाऊन काम करू शकतात. असे नानाविध उपयोग या ड्रोनच आहेत.

चाकाचे पाऊल

खूप मोठा प्रवास चालत करावयाचा असेल तेव्हा पायात स्केटिंग असते तर किती छान झाले असते, असा प्रश्न आपल्याला पडतो. मात्र स्केटिंगमुळे नुसते चालणे अवघड होते; पण समस्येवर फ्रान्समधील रोलकर्स या कंपनीने उपाय शोधला असून त्यांनी स्केटिंग करता येणारे तसेच तेच स्केटिंग पायात घालून सामान्यपणे चालता येण्याची सुविधाही यात देण्यात आली आहे. यामुळे चाकांच्या मदतीने चालणे शक्य झाल्याचे कंपनीचे मुख्याधिकारी पॉल चावंड यांनी नमूद केले. हे स्केटिंग बूट पायात घालून तासाला चार मैलांचा प्रवास करणे शक्य होणार असल्याचा दावा चावंड यांनी केला आहे. एवढय़ा वेगाने चालताना यात वापरलेल्या चाकांमुळे ते स्लिप होण्याची किंवा पडण्याची भीती नसते, असा दावाही त्यांनी केला आहे.

प्रामाणिक प्रतिक्रिया ओळखणारा हेडफोन

आपल्याला एखादी चित्रफीत दाखविण्यात आली. ती आपल्याला मनापासून आवडली नाही तरी समोरची व्यक्ती दुखावली जाऊ नये किंवा त्या व्यक्तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अनेकदा छान म्हणतो; पण जर तुमच्या कानावर निळय़ा रंगाचे हेडफोन लावलेले असतील आणि तुमची प्रतिक्रिया विचारली तर खरीखुरी प्रतिक्रियाच द्या, कारण हा हेडफोन आपल्या मेंदूतील हालचाली टिपून आपली खरी प्रतिक्रिया काय आहे हे सांगतो. हर्षल शहा यांनी विकसित केलेला हा हेडफोन जाहिरात क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर वापरला जातो. एखाद्या जाहिरातीवरील खरी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी याचा वापर केला जातो. त्या माध्यमातून जाहिरातींचा दर्जा ठरविण्याचे काम सध्या सुरू आहे.

स्मार्ट चार्ज

आपल्या शरीरातील विविध हालचालींतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर बॅटरी चार्जिगसाठी केला जावा, ही संकल्पना घेऊन स्मार्ट चार्जर विकसित करण्यात आला आहे. आपण चालत असताना आपल्याला बुटांमध्ये निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून बॅटरी चार्ज करणारे एक उपकरण विकसित करण्यात आले आहे. हे उपकरण आपल्या बुटातील इनर सोलच्या खाली ठेवले की ते चार्ज होते. अशाच प्रकारे आपल्या मागच्या खिशातही हे उपकरण ठेवता येऊ शकते. आपण उठताना तसेच बसताना निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून हे उपकरण चार्ज केले जाऊ शकते. या उपकरणाचा वापर लवकरच प्रत्यक्षात येऊ शकतो असे उपकरण विकसित करणाऱ्या चेन्नईतील विद्यार्थ्यांना वाटतो. या उपकरणाला त्यांनी ‘इको-सेल’ असे नाव दिले आहे.

– नीरज पंडित

 nirajcpandit

Niraj.pandit@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2016 1:15 am

Web Title: iit bombay technology festival
Next Stories
1 आभास हा खेळतो भला..
2 नावीन्यतेच्या वाटेवर
3 Nubia Z11 रिव्ह्यू : वनप्लस ३ ला टक्कर देणारा फोन
Just Now!
X