भारतातील स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याचा सर्वाधिक फायदा चिनी मोबाइल कंपन्यांनी उठवला आहे. आकर्षक आणि दर्जेदार स्मार्टफोन व कमी किंमत हे सूत्र डोक्यात ठेवून या कंपन्यांनी निर्माण केलेले स्मार्टफोन भारतीय बाजारात टिकाव धरून आहेत. पण बऱ्याचदा किमतीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपन्यांनाही स्मार्टफोनमधील वैशिष्टय़ांना मुरड घालावी लागते. ‘झोपो’ कंपनीचा ‘फ्लॅश एक्स प्लस’ त्याचेच एक उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल.

चिनी मोबाइल कंपन्यांनी भारतीय बाजारात शिरकाव करून आता बराच काळ लोटला आहे. प्रस्थापित मोबाइल कंपन्यांना पुरून उरलेल्या या कंपन्यांना भारतीय ब्रॅण्डनीही तगडे आव्हान निर्माण केले. परंतु त्यानंतरही भारतीय बाजारपेठेबाबतचे चिनी कंपन्यांचे आकर्षण कमी झालेले नाही. दिवसेंदिवस या देशातील मोबाइल वापरकर्त्यांची संख्या वाढत असताना हे आकर्षण कमी होण्याची शक्यता नाहीच परंतु; या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या कंपन्यांकडून वेळोवेळी नवनवीन स्मार्टफोनची भर टाकण्यात येते. ‘झोपो’ ही कंपनी गेल्या काही वर्षांपासून भारतीय बाजारात स्थिरावण्याच्या प्रयत्नात आहे. पण आजही या कंपनीला अपेक्षित यश मिळालेले नाही. अशा वेळी या कंपनीने मार्च महिन्यात आणलेला ‘फ्लॅश एक्स प्लस’ हा स्मार्टफोन ‘झोपो’या ब्रँडला नवी बळकटी देऊ शकतो.

‘झोपो फ्लॅश एक्स प्लस’ हा परवडणाऱ्या किंमत श्रेणीतील आणि तरीही ‘फ्लॅगशिप’ स्मार्टफोनसारख्या सुविधा आणि वैशिष्टय़े असलेला स्मार्टफोन आहे. विशेषत: ‘मल्टिटास्किंग’ आणि ‘अ‍ॅपबदल’ याबाबतीत या स्मार्टफोनची कामगिरी अतिशय उत्तम आहे. सध्याच्या घडीला स्मार्टफोन ‘मल्टिटािस्कग’साठी नावाजले जात असताना ही वैशिष्टय़े निश्चितच ‘फ्लॅश एक्स प्लस’च्या निवडीच्या पथ्यावर पडणारी आहेत. या फोनच्या अन्य वैशिष्टय़ांवर नजर टाकली असता १४ हजार रुपयांच्या किमतीत सध्या उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनच्या तुलनेत हा फोन कुठेही कमी पडत नाही. मात्र, तरीही आणखी काही गोष्टी असत्या तर या पंक्तीतही हा स्मार्टफोन उजवा ठरला असता, असे म्हणायला निश्चितच वाव आहे.

डिझाइन आणि डिस्प्ले

‘फ्लॅश एक्स प्लस’हा पाहताक्षणी नजरेत भरणारा स्मार्टफोन आहे. या फोनचे बाह्यावरण पूर्णपणे धातूने बनवण्यात आलेले असून बाकदार कोपऱ्यांमुळे फोनचा ‘लूक’ आकर्षक बनला आहे. परीक्षणासाठी आलेल्या स्मार्टफोनचा पुढील भाग पांढरा तर मागील बाजूला ‘मेटॅलिक फिनिश’ असल्याने तो उठावदार दिसतो. या फोनमध्ये आवाजाची बटणे आणि ‘पॉवर’ बटण एकाच बाजूस पुरवण्यात आली आहेत. तर सिमकार्ड (डय़ूअल) टाकण्यासाठीचा ‘स्लॉट’ डावीकडे पुरवण्यात आला आहे. पुढच्या बाजूस डिस्प्लेच्या खाली होम बटण आणि दोन टच बटणे (बॅक आणि ऑप्शन्स) पुरवण्यात आली आहेत. मागील बाजूस कॅमेरा, एलईडी फ्लॅश आणि फिंगरपिंट्र स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे. एकूणच फोनची रचना अतिशय सुटसुटीत असून पहिल्यांदाच हातात घेतल्यानंतरही तो हाताळण्यात अडचण येत नाही.

या फोनमध्ये ५.५ इंची आकाराचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला असून तो १०८० बाय १९२० पिक्सेल रेझोल्युशन क्षमतेचा आहे. या किंमत श्रेणीतील बहुतांश स्मार्टफोन इतक्याच क्षमतेचे असल्याने त्यात नावीन्य नाही. परंतु कंपनीने डिस्प्लेमध्ये ‘जीएफएफ’ तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे डिस्प्ले सुस्पष्ट आणि पातळ झाला आहे. थेट सूर्यप्रकाशातही डिस्प्ले व्यवस्थित दिसतो.

कॅमेरा आणि कामगिरी

‘फ्लॅश एक्स प्लस’मध्ये मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्याला डय़ूअल एलईडी फ्लॅशची सुविधा देण्यात  आली आहे. कॅमेऱ्यातून निघणारी छायाचित्रे व्यवस्थित व ‘फोकस्ड’ असल्याचे आढळून आले. शिवाय यामध्ये सोनीचा सेन्सर बसवण्यात आल्यामुळे छायाचित्रे सुस्पष्ट आणि सुप्रकाशित आली. परंतु अंधुक प्रकाशात छायाचित्रे तितकी आकर्षक व उठावदार दिसत नाहीत. फोनच्या पुढील बाजूस ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा पुरवण्यात आला असून त्याला ‘मूनलाइट फ्लॅश’ची जोड देण्यात आली आहे.  मात्र, त्यातून येणारी छायाचित्रे इतकी प्रभावी वाटत नाहीत.

या फोनमध्ये ऑक्टा कोअर मीडिया टेक प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम पुरवण्यात आला आहे. त्यामुळे फोन वेगाने काम करतो. या किंमतश्रेणीतील अन्य फोनच्या इतक्याच क्षमतेने ‘फ्लॅश एक्स प्लस’चीही कामगिरी होते. त्यामध्ये उणेअधिक सांगता येत नाही. या फोनमध्ये ३२ जीबी इंटर्नल स्टोअरेजची सुविधा असून मायक्रोएसडी कार्डच्या साह्याने १२८ जीबीपर्यंत ही क्षमता वाढवता येते.

एकूणच ‘झोपो फ्लॅश एक्स प्लस’ हा १३९९९ रुपयांच्या किमतीत बाजारात उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टफोनइतकाच प्रभावी आहे. परंतु, झोपोच्या आतापर्यंतच्या मोबाइलमध्ये तो सर्वात वेगळा आहे, यात शंका नाही. या फोनला अधिक वैशिष्टय़पूर्ण बनवणे कंपनीला शक्य झाले असते. परंतु, फोनची किंमत आटोक्यात ठेवण्यासाठी काही ठिकाणी तडजोड करण्यात आल्याचे दिसून येते. अर्थात १४ हजार रुपयांच्या श्रेणीतील फोन घ्यायचा असेल तर हा पर्याय वाईट नाही.