शालेय जीवनात इतिहास-नागरिकशास्त्राच्या पुस्तकात हमखास सापडणारं एक वाक्य म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. कालांतराने त्यामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचासुद्धा अंतर्भाव झाला. मुळात मूलभूत गरज म्हणजे अशी संकल्पना किंवा अशी निकड, ज्याशिवाय जगणं अशक्य आहे. एकविसाव्या शतकात मात्र या गरजांचा प्राधान्यक्रम बदलला. तंत्रज्ञानाने अशी काही झेप घेतली की खिशातला स्मार्टफोन हीसुद्धा एक गरज बनली. पण मूलभूत गरजांच्या यादीत कुणी शिरकाव केला असेल तर तो म्हणजे वायफायने. आणि या यादीत अन्न, वस्त्र आणि निवारा यांना मागे टाकून वायफाय अग्रभागी आहे. हॉटेलात किंवा कुणाच्या घरी पाहुणे म्हणून गेलं की पाण्याच्या आधी वायफायचा पासवर्ड मिळवणं ही एक परंपरा सुरू झाली आहे.

असो. मुद्दा हा आहे की हे प्रकरण नेमकं काम कसं करतं. वायर्सच्या जंजाळापासून मुक्त होत हा डेटा नेमका फिरतो कसा. अक्षरश: हवेतून या डेटाचं भ्रमण होतं तरी कसं. आणि मुळात वायफाय म्हणजे नेमकं काय. वायफाय म्हणजे वायरलेस नेटवर्क. मोबाइल फोन्स, टेलिव्हिजन आणि रेडिओप्रमाणेच रेडिओ तरंगांचा वापर केला जातो. कम्प्युटरचा वायरेल अ‍ॅडाप्टर, डेटाचं रेडिओ सिग्नलमध्ये परिवर्तन करतो आणि अँटेनाचा वापर करत हा डेटा ट्रान्समिट केला जातो. दुसरीकडे वायरेल राउटर हा सिग्नल पकडतो आणि डेटा डिकोड करतो. त्यानंतर तो डेटा किंवा इन्फॉर्मेशन इंटरनेट प्रोव्हाइडरकडे आणि तिथून मग इंटरनेटवर पाठवली जाते. इथे मात्र वायरने जोडलेल्या इथरनेट कनेक्शनचा वापर होतो. हीच प्रक्रिया उलटदिशेने सुद्धा होते. म्हणजे इंटरनेटकडून डेटा घेऊन तो कम्प्युटरकडे पाठवला जातो. इंटरनेटचा वापर जेव्हा होत असतो तेव्हा हीच प्रक्रिया वारंवार सुरू असते.

वायफाय कम्युनिकेशनसाठी वापरल्या जाणा-या रेडिओ लहरी या वॉकी-टॉकी किंवा मोबाइलसाठी वापरल्या जाणा-या लहरींसारख्याच असतात. रेडिओ लहरी ट्रान्समिट आणि रिसिव्ह करण्याबरोबरच आणखी एक कामही होत असतं. कम्प्युटर किंवा स्मार्टफोन किंवा एकूणच इंटरनेट जगतातील डेटा हा 1 आणि 0 यामध्ये लिहिलेला असतो. यंत्रांना समजणारी ती भाषा आहष. त्यामुळे रेडिओ लहरींचं या भाषेत परिवर्तन होतं आणि पुन्हा या आणि ला रेडिओ लहरींमध्ये 0. 1 परिवर्तित केलं जातं. वायफाय आणि इतर रेडिओ लहरींमध्ये बरेच फरक आहेत. मुख्य फरक म्हणजे डेटा ट्रान्समिट होण्याची फ्रिक्वेन्सी. वायफाय डिव्हाइसेस 2.4 गिगाहट्र्झ किंवा. 5 गिगाहट्र्झ या फ्रिक्वेन्सीने डेटा ट्रान्सफर करतात. मोबाइल फोन्स, टेलिव्हिजन किंवा वॉकीटॉकीपेक्षाही ही फ्रिक्वेन्सी जास्त असते. आणि त्यामुळेच मोठय़ा प्रमाणातील डेटाट्रान्समिट होण शक्य होतं. वायफायबद्दल चर्चा होत असताना 802.11 नेटवर्किंग स्टँडर्डसचा विषय हमखास येतोच.

इंटरनॅशनल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर्स म्हणजेच आयईईई या संस्थेने हे स्टँडर्ड्स तयार केले आहेत. १९९७पासून याची सुरुवात झाली. आयईईई ८०२ असं नाव या संस्थेच्या लॅन-मॅन समितीने या स्टँडर्डसना दिलं.

८०२.११ए हा ५ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीने डेटा ट्रान्समिट करतो. आणि ५४ मेगाबाइट प्रतिसेकंद इतक्या वेगाने डेटा ट्रान्सफर करू शकतो.

८०२.११बी हा सर्वात मंदगतीने काम करणारा आणि स्वस्तातला राउटर आहे. सुरुवातीला स्वस्त असल्याने ह्य स्टँडर्डचे राउटर बरेच लोकप्रिय आणि प्रचलित झाले होते. २.४ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीने ११ एमबी प्रतिसेकंद या वेगाने डेटा ट्रान्समिट होतो.

८०२.११जी हा सुद्धा २.४ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीने डेटा ट्रान्समिट करतो. पण याचा वेग ८०२.११बी पेक्षा जास्त असते. त्यामुळेच प्रतिसेकंद ५४ एमबी इतका डेटा हे राउटर हँडल करू शकतात.

८०२.११एन हा सध्याच्या घडीला सर्वाधिक वापरल्या जाणा-या स्टँडर्डचा राउटर आहे. आधीच्या ए, बी आणि जी पेक्षा शक्तिशाली आणि वेगवान असा हा राउटर. १४० एमबी प्रतिसेकंद इतका वेग या राउटरमध्ये आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकावेळी चार स्ट्रीम्समध्ये डेटा ट्रान्सफर होतो. चार स्ट्रीम्स म्हणजे चार लेन. म्हणजे चौपदरी महामार्ग.

८०२.११ एसी हा स्टँडर्ड सर्वात नवीन आहे. २०१३मध्ये याचा जन्म झाला. आयईईईकडून अजूनही यावर काम सुरू आहे. ५ गिगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सीबरोबरच गिगाबाइटमध्ये डेटा ट्रान्सफर होण्याची क्षमता या स्टँडर्डच्या राउटरमध्ये आहे.

वायफायचं हे पुराण खरं तर खूप मोठं आहे. पण मूलभूत गरज बनल्याने त्याविषयीची जुजबी माहिती असणं हीसुद्धा एक गरजच आहे नाही का?

pushkar.samant@gmail.com