मोबाइल चोरीला जाणं ही तशी दुर्दैवी घटनाच. कधी आपल्या निष्काळजीपणामुळे तर कधी चोराच्या शिताफीमुळे रोजच्या जगण्याचं हे अविभाज्य अंग गायब झालं की जणू काही सुतकच लागतं. दु:ख, राग, चीडचीड, निराशा अशा भावना दाटून वगैरे येतात. साहजिकच आहे म्हणा ते. हल्ली तर मोबाइल म्हणजे इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा जीवापाड प्रेम केलं जाणारी वस्तू आहे. वस्तू म्हणणंही चुकीचं आहे. त्या फोनला आकर्षक कव्हर्स अशी काही चढवली जातात जणू काही एखाद्या बाळाला कपडे. असो, असतो एकेकाचा जीव. तर असा हा मोबाइल चोरीला गेल्यानंतर ‘जर, तर’च्या चर्चाही सुरू होतात. असं झालं असतं तर, ते अ‍ॅप असतं तर, मोबाइल एनक्रिप्ट केला असता तर, वगैरे वगैरे वाक्यं सामान्यत: नंतर ऐकू येतात. पण मुळात दूध सांडलं की हळहळ व्यक्त करण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र मोबाइलच्या बाबतीत काही उपाययोजना या नक्कीच करता येऊ शकतात. त्या कशा करायच्या ते आपण बघूया.

मोबाइल पिन, पासवर्ड : मोबाइल फोनला सिक्युरिटी पिन, पासवर्ड किंवा हल्ली उपलब्ध असलेला पॅटर्न ठेवणं हा प्राथमिक उपाय झाला. मोबाइल सिक्युरिटी पुरवणाऱ्या कंपन्यांचं म्हणणं असं आहे की, पॅटर्नपेक्षा सिक्युरिटी पिन किंवा पासवर्ड अधिक चांगला. मोबाइल चोरीला गेलाच तरी तो चोरणाऱ्याला वापरता येत नाही.

मोबाइलची माहिती स्वत:कडे ठेवा : तुमच्या मोबाइल फोनची सर्व माहिती एखाद्या कागदावर लिहून ठेवा. फोन नंबर, मोबाइलचं मॉडेल, रंग-रूप, पिन किंवा सिक्युरिटी कोड, आयएमईआय नंबरसारख्या माहितीची नोंद करून ठेवणं कधीही चांगलं.

नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधा : फोन हरवल्यानंतर एफआयआर म्हणजे पोलीस तक्रार तर कराच, पण त्याबरोबरच जर का तुमचा फोन नेटवर्क ऑपरेटरकडे रजिस्टर असेल तर ते फायदेशीर ठरतं. मोबाइल हरवल्यानंतर नेटवर्क ऑपरेटरशी संपर्क साधा आणि त्यांना त्याविषयी माहिती द्या. आयएमईआय नंबरचा वापर करत तुमचा हँडसेट तसंच इतर अकाऊंट डिटेल्स ते ब्लॉक करू शकतात. असं केल्याने कुठलंही सीम कार्ड घातलं तरी तो फोन वापरणं शक्य नसतं. महत्त्वाची गोष्ट अशी की नेटवर्क ऑपरेटरशी बोलताना ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्याचं नाव, नंबर, संभाषण झाल्याची तारीख, वेळ वगैरेची नोंद करून ठेवा. तसंच फोन डिसेबल झाला आहे याची लेखी खात्री करून घ्या.

एक लक्षात असू द्या की एकदा मोबाइल डिसेबल केला की तो पुन्हा वापरता येऊ  शकत नाही, तुम्हाला परत मिळाला तरी.

फाइंड माय फोन अ‍ॅप : अ‍ॅपलने हे अ‍ॅप बाजारात आणलं होतं. गुगलनेही त्याच धर्तीवर अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर ही सुविधा सुरू केलेली आहे. अर्थात हरवलेला फोन जर का सुरू असेल तरच हे आणि अशी अ‍ॅप्स वापरता येतात. जर का मोबाइल सुरू असेल तर त्या मोबाइलचं लोकेशन आपल्याला कळू शकतं. तसंच रिमोटली आपल्याला आपल्या मोबाइलला रिंग देता येऊ  शकते, मोबाइल लॉक करता येऊ  शकतो आणि मोबाइलवरचा सगळा डेटासुद्धा इरेझ किंवा डिलिट करता येऊ  शकतो.

मोबाइल ट्रॅकर अ‍ॅप : अँड्रॉइड, अ‍ॅपलसाठी मोबाइल ट्रॅकिंगची अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. आपापल्या सोयीनुसार ती अ‍ॅप्स इन्स्टॉल करणं उत्तम. त्यापैकी मोबाइल ट्रॅकर हे अ‍ॅप फ्री आहे. हे अ‍ॅप इन्स्टॉल करा. त्यानंतर ते सुरू केलं की एक पासवर्ड तुम्हाला टाकायचा असतो. तो पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला चार वेगवेगळे मोबाइल नंबर्स टाकायचे असतात. तुमच्या जवळच्या नातेवाईकांचे नंबर्स टाकणं उत्तम.

हे अ‍ॅप करतं काय?

जेव्हा केव्हा तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाइलमध्ये सीम कार्ड इन्सर्ट केलं जातं, तेव्हा ते तुम्ही एंटर केलेल्या तीन-चार नंबर्सवर एसएमएस पाठवतं. या एसएमएसमध्ये ज्याच्याकडे तुमचा मोबाइल आहे त्याचा नंबरच दिलेला असतो. ‘अमूक अमूक आयएमईआय नंबर असलेल्या मोबाइलमध्ये तमूकतमूक नंबर असलेलं सीम कार्ड इन्सर्ट करण्यात आलं आहे’ अशा आशयाचा हा मेसेज असतो.

हे अ‍ॅप मोबाइलच्या इंटर्नल मेमरीमध्ये असतं. मोबाइल फॉरमॅट जरी होत असेल तरी हे अ‍ॅप डिलिट होण्यासाठी पासवर्ड टाकावा लागतो. त्यामुळे हे अ‍ॅप सहजसहजी डिलिट करता येत नाही.

मोबाइल स्वत:च्या जवळ असताना या वरच्या गोष्टी केल्या तर मोबाइल परत मिळण्याची धूसर का होईना पण शक्यता असते. पण मुळातच मोबाइल काळजीपूर्वक बाळगणं याला पर्याय असू शकत नाही. कारण शेवटी सजगता ही उपाययोजनांपेक्षा केव्हाही चांगली नाही का?

अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजर ऑन कसं करायचं?

  • सर्वप्रथम मोबाइल फोन गुगल अकाऊंटशी सिंक असणं गरजेचं आहे.
  • त्यानंतर मोबाइलच्या गुगल सेटिंग्जमध्ये जायचं.
  • सिक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं.
  • तिथे अँड्रॉइड डिव्हाइस मॅनेजरच्या खाली रिमोटली लोकेट धिस डिव्हाइस हा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करायचं. हे करण्यासाठी लोकेशन सेटिंग ऑन करावी लागते.
  • याच ऑप्शनच्या खाली अलाऊ  रिमोट लॉक अँड इरेझ हा ऑप्शन असतो. त्यावरही क्लिक करा.
  • एक लक्षात ठेवा की मोबाइल सुरू असेल तरच तो लोकेट करता येऊ  शकतो.

pushkar.samant@gmail.com