15 December 2017

News Flash

नवउद्योगांमुळे देशाच्या इंटरनेट क्षमतेत वाढ

इंटरनेट वापरासाठी सज्ज असण्याचा आलेख चार प्रमुख घटकांपासून बनवण्यात आला आहे,

लोकसत्ता टीम | Updated: April 25, 2017 4:39 AM

भारतात इंटरनेट वापरात दिल्ली आघाडीवर

देशात सुरू होत असलेले नवउद्योग व दिवसागणिक वाढत असलेली मोबाइल ग्राहकांची संख्या यामुळे देशाचा इंटरनेट वापर वाढला आहे. यामुळे देशातील अनेक राज्ये इंटरनेट सुविधेसाठी सज्ज होऊ लागली आहेत. यामुळे पुढील पाच वर्षांत भारत हा इंटरनेट वापरणाऱ्या देशांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर जाऊन पोहोचेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

इंटरनेट वापरासाठी एकंदर सज्ज असलेल्या राज्यांमध्ये दिल्लीने आघाडीचे स्थान मिळवले असून गेल्या वर्षी हे स्थान महाराष्ट्राकडे होते. छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्येही दिल्लीचे या बाबतीतले स्थान आघाडीचे असून सर्व राज्यांचा विचार करताही दिल्लीचा क्रमांक पहिला लागतो. या यादीत दिल्लीनंतर कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि तमिळनाडू यांचा क्रमांक लागतो. उत्तम ई- पायाभूत सुविधा आणि ई- सहभाग यामुळे दिल्लीला हे स्थान मिळाल्याचे इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि नेल्सन यांनी प्रकाशित केलेल्या ‘इंडेक्स ऑफ इंटरनेट रेडिनेस ऑफ इंडियन स्टेट्स’ या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा अहवाल प्रदíशत करताना केंद्राच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याच्या सचिव अरुणा सुंदरराजन म्हणाल्या की, ‘कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सध्या जगात १५५ स्थानावर असलेला भारत येत्या पाच ते सहा वर्षांत थेट पाचव्या स्थानावर जाईल अशी आम्हाला आशा आहे. आज भारत जगभरातील सर्वाधिक वेगाने डिजिटल होत असलेल्या अर्थव्यवस्थांपकी एक आहे. छत्तीसगढ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांसारख्या राज्य सरकारांतील स्थिती कित्येक पटींनी सुधारली असून इतर राज्येही कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेटची व्याप्ती सुधारण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत. देशांतर्गत डिजिटल व्यासपीठ आणि नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित नवउद्योग यांच्या समीकरणाने भारताला आपले डिजिटल रूपांतर घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. नोटाबंदीनंतर, देशातील पीओएसची संख्या तीस लाखांवर पोहोचली असून ही संख्या आधी १.५ लाख होती. हे नक्कीच आशादायी रूपांतर असून यापुढेही वर्षभरात डिजिटल पेमेंटशी संबंधित पायाभूत सुविधा तीन पटींनी वाढतील, असेही त्या म्हणाल्या.

इतर लहान राज्यांमध्ये दिल्ली आघाडीवर असून त्यानंतर चंदिगढ व पुदुच्चेरीचा क्रमांक लागतो. ई- पायाभूत सुविधा आणि ई- सहभागाच्या बाबतीतही चंदिगढचा दुसरा क्रमांक असून ई- पायाभूत सुविधांच्या आलेखावर पुदुच्चेरीचा क्रमांक चंदिगढनंतर लागतो. लक्षणीय गोष्ट म्हणजे आणखी लहान राज्यांमध्ये इंटरनेट वापरासाठी सज्ज असण्याबाबतीत ईशान्येकडच्या राज्यांचा क्रमांक बराच खालचा आहे. त्यामुळे या भागातील गुंतवणूक आणि पायाभूत सुविधेकडे लक्ष देणे अतिशय आवश्यक आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये नागालँड सर्वात आघाडीवर असून त्यानंतर मणिपूर व त्रिपुराचा क्रमांक लागतो. माहिती तंत्रज्ञानासाठी पूरक वातावरणाबाबत नागालँड आघाडीवर असून इतर विभागांतही राज्याची कामगिरी समाधानकारक आहे.

इंटरनेट वापरासाठी सज्ज असण्याचा आलेख चार प्रमुख घटकांपासून बनवण्यात आला आहे, उदा ई-पायाभूत सुविधा आलेख, ई- सहभाग आलेख, माहिती तंत्रज्ञानासाठी पूरक वातावरण आणि सरकारी ई सेवा आलेख. या प्रारूपामध्ये या चारही घटकांना समान महत्त्व आहे. त्याशिवाय पाचवा आलेख (कोअर इंटरनेट इंडेक्स) या वर्षी तयार करण्यात आला असून त्यात आधीपासून वापरण्यात येत असलेल्या आलेखांमधील निवडक घटक वापरण्यात आले आहेत. भारतीय राज्यांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्यांना तेथील डिजिटल परिस्थितीची योग्य कल्पना मिळावी यासाठी हा आलेख तयार करण्यात आला आहे. या वर्षीच्या अहवालात राज्यांतील डिजिटल नवउद्योग यंत्रणेचे मोजमाप करण्यात आले आहे. कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्रात या तीन राज्यांत सर्वाधिक डिजिटल नवउद्योग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. देशातील एकूण २४२ नवउद्योग इन्क्युबेटर्सपकी ६१ नवउद्योग इन्क्युबेटर्स तामिळनाडूमध्ये आहेत. ईशान्येकडच्या राज्यांत मणिपूरमध्ये केवळ एक इन्क्युबेटर असून ते वगळता इतर कोणत्याही राज्यात इन्क्युबेटर नाही.

– प्रतिनिधी

First Published on April 25, 2017 4:39 am

Web Title: internet capacity of india increased the due to new industries