रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहिणीला कोणती भेटवस्तू द्यायची या विचारात असलेल्या भावांना नेहमीच्याच कपडे, भांडी या व्यतिरिक्त काही तरी हटके पर्याय हवे असतात. पण यामध्ये नेमके काय द्यायचे. मोबाइल आणि मोबाइलशी संबंधित नियमित अ‍ॅक्सेसरीज अनेक मुलींकडे असतात. मात्र असे काही गॅजेट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळतील तसेच बहिणीला उपयुक्तही ठरतील. पाहू यात असे काही पर्याय.

स्मार्टबॅण्ड

जर तुमच्या बहिणीला स्मार्टवॉच किंवा स्मार्टबॅण्डची हौस असेल तर तुम्ही या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. यामध्ये आपल्या हृदयाच्या ठोक्यांपासून ते आपण किती वेळा जिने चढलो अथवा उतरलो, आपल्या झोपेचे वेळापत्रक आदी आरोग्यात उपयुक्त माहिती मिळू शकते. पण जेव्हा आपण आरोग्य बॅण्डचा विचार करतो तेव्हा कुठे तरी ही किंमत खूप जास्त आहे असे लक्षात येते. मात्र ट्रेस या कंपनीचे स्मार्टबॅण्ड तुम्हाला अवघ्या १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या बॅण्डमध्ये आपण दिवसभरात काय काय करतो याची नोंद राहते. आपण घरात असताना नेमके काय करतो, व्यायामशाळेत असताना नेमके काय करतो किंवा अगदी फावल्या वेळात आपल्या हालचाली कशा होतात याचा तपशील या बॅण्डमध्ये नोंदविला जातो. दिवसअखेर आपल्याला दिवसभरात आपण किती पावले चाललो याचा तपशील पुरवितानाच किती कॅलरीज जाळल्या याचा तपशीलही हा बॅण्ड उपलब्ध करून देतो. याचबरोबर आपण कधी झोपलो पाहिजे आणि आपण कसे व किती वेळ झोपतो याचा तपशीलही या बॅण्डमध्ये मिळतो.

वायरलेस फ्लॅश ड्राइव्ह

सध्या आपण सर्व वायरलेस जगात वावरतो. असे असले तरी आपण पेन ड्राइव्हमध्ये पाहिजे ती माहिती साठवून ठेवणे, मोबाइलमध्ये साठवून ठेवणे असे करत असतो. पण या सर्वामध्ये आपण जेवढी उपकरणे वापरू तेवढय़ा उपकरणांना पेन ड्राइव्ह जोडावा लागतो. परत सुरुवातीपासून सगळी प्रक्रिया करावी लागते. आता हे सर्व टाळणे शक्य आहे. यासाठी सॅनडिस्क या कंपनीने वायरलेस फ्लॅश ड्राइव्ह बाजारात आणला आहे. या ड्राइव्हच्या मदतीने आपण संगणक, फोन आणि टॅबलेट या तीनही उपकरणांना एकमेकांशी जोडू शकतो. एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात मोठय़ा फाइल्स ट्रान्सफर करणे, एचडी व्हिडीओ स्ट्रिमिंग करणे, गाणी ऐकणे किंवा फाइल अथवा फोटो सेव्ह करणे शक्य होणार आहे. याशिवाय या स्टिकच्या माध्यमातून आपण एका उपकरणावर अर्धवट पाहिलेला व्हिडीओ दुसऱ्या उपकरणावर त्याच्या पुढे पाहता येऊ शकतो. यामुळे ही स्टिक आपल्याला कोणत्याही उपकरणावर उपयुक्त अशी ठरते. १६ जीबीच्या या स्टिकची किंमत १८०० रुपये इतकी आहे. याचबरोबर कंपनीने नुकतीच २०० जीबीची स्टिकही बाजारात आणली आहे.

ब्लूटय़ूथ हेडसेट

जर तुमची बहीण तंत्रस्नेही आणि संगीतप्रेमी असेल तर तिला ब्लूटय़ूथ हेडसेट ही नक्कीच आवडणारी भेट ठरू शकते. अनेकदा मुलींना प्रवासादरम्यान वायर असलेले हेडफोन वापरणे त्रासदायक ठरते. मुलींच्या पोशाखात अनेकदा खिसा कमी असल्यामुळे हेडफोन जोडला तरी फोन ठेवायचा कुठे, असा प्रश्न पडतो. मग फोन बॅगेत ठेवला जातो. अशा वेळी फोनशी जोडलेले राहणे अवघड होते. पण जर तुमच्याकडे ब्लू्टय़ूथ हेडसेट असेल तर तुम्ही फोन बॅग किंवा पर्समध्ये ठेवून बिनधास्तपणे फोनशी जोडलेले राहू शकता. आयबॉलसारख्या कंपनीने बाजारात आणलेल्या हेडसेटमध्ये इनबिल्ट एफएमची सुविधा दिल्यामुळे आपल्याला गाणी ऐकण्यासाठी मोबाइलवरच अवलंबून राहावे लागते असे होत नाही. याशिवाय या हेडसेटना एलईडी लाइट असल्यामुळे तो आणखीच आकर्षक ठरतो. हे हेडसेट ९९९ रुपयांपासून ते २००० रुपयांपर्यंत ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत.

पॉवरबँक

सध्या नोकरीच्या निमित्ताने अनेकदा मुलींना बाहेरगावी प्रवास करावा लागतो किंवा फोनचा वापर वाढल्यामुळे अनेकदा अर्धा दिवसपण बॅटरी पुरत नाही. अशावेळी पॉवरबँकआपली चांगली सोबती ठरू शकते. सध्या बाजारात अगदी १२०० एमएएचपासून ते २० हजार एमएएचपर्यंतच्या पॉवरबँकउपलब्ध आहेत. मात्र ही पॉवरबँक  घेताना त्यातील बॅटरी कोणत्या क्षमतेची आहे हे तपासून घेणे गरजेचे आहे. नाही तर अनेकदा पॉवरबँकच पूर्ण चार्ज होत नाही आणि अडचण निर्माण होते. शिओमी या कंपनीने नुकतीच २० हजार ८०० एमएएच क्षमतेची पॉवरबँक बाजारात आणली आहे. या पॉवरबँकची किंमत २९९ रुपये असली तरी ती सध्या ९८० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामुळे ही पॉवरबँक किंवा अन्य कंपनीच्या पॉवरबँकचा तुम्ही विचार करू शकता.

नीरज पंडित – niraj.pandit@expressindia.com