लावा मोबाइल या कंपनीने दिवाळीचे निमित्त साधून नवीन ‘झेड’ मालिका बाजारात आणली आहे. ही मालिका आणत असतानाच त्यांना ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी जर ग्राहकाला फोन पसंत पडला नाही तर तो फोन देऊन पैसे परत घेऊन जाऊ शकतो. यामुळे स्मार्टफोन क्षेत्रात नवा पायंडा पडू शकतो. तसेच या फोनवर दोन वर्षांची वॉरंटीही देण्यात आली आहे.

लावाने झेड ६०, झेड ७०, झेड ८० आणि झेड ९० असे फोन बाजारात आणले आहेत. या फोनची किंमत ५,५०० पासून ते अकरा हजारांपर्यंत आहे. यामध्ये आयफोनच्या कॅमेरामध्ये असलेल्या बोके मोडची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे प्रथमत:च दहा हजारपेक्षा स्वस्त फोनमध्ये बोके मोड उपलब्ध झाला आहे. ही कंपनी उत्पादन तयार करत असताना ज्या पद्धतीने तयार कॅलेंडर जातात त्यावर कंपनीचा इतका विश्वास आहे की त्यांनी ग्राहकांना फोन खरेदी केल्यावर तो वापरताना पसंत नाही पडला तर एका महिन्याच्या आत कंपनीच्या सेवा केंद्रात फोन परत देऊन पैसे परत घेऊन जाण्याची सुविधा दिली आहे. ही सुविधा १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत लागू असणार आहे.

कंपनीची ही नवी झेड मालिका म्हणजे कंपनीच्या गेल्या आठ वर्षांच्या संशोधन आणि विकास कामाचे फलित आहे. या फोनमध्ये महागडय़ा फोनच्या सुविधा स्वस्तात उपलब्ध करून देण्यात कंपनीला यश आल्याचे कंपनीचे उत्पादन प्रमुख गौरव निगम यांनी सांगितले. या संपूर्ण मालिकेमध्ये अँड्रॉइड ७.० ही ऑपरेटिंग प्रणाली उपलब्ध असणार आहे. तसेच उपकरणात भारतीय भाषांचाही समावेश करण्यात आला आहे.

‘ऑनलाइन’ छळ जोरात

आपल्याला एखादी व्यक्ती वा तिचे विचार आवडत नसतील तर आपण त्या व्यक्तीशी संवाद तोडून टाकतो किंवा त्याच्या वाटेलाच जात नाही. फार फार तर आपण त्या व्यक्तीच्या मतांवर किंवा भूमिकांवर टीका करून वैचारिक लढाई लढत असतो. कोणत्याही समाजात हे सुसंस्कृतपणाचे लक्षण समजले जाते. परंतु भारतातील सोशल मीडिया याला अपवाद ठरू लागला आहे. समाजात मुक्तपणे व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून जी समाजमाध्यमे नावाजली गेली आणि विचारस्वातंत्र्याचे साधन म्हणून ज्यांचा मोठा आधार मानला गेला तीच समाजमाध्यमे गेल्या काही वर्षांत छळवणुकीचे सोपे माध्यम ठरू लागली आहेत. आपल्या विरोधात भूमिका मांडणाऱ्या व्यक्तीशी मुद्दय़ांच्या आधारे प्रतिवाद करण्याऐवजी तिला शिवीगाळ, अश्लील विधाने, धमक्या, अपप्रचार करून त्या व्यक्तीला नामोहरम करण्याचे प्रकार सध्या भारतातील इंटरनेट विश्वात मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. सिमेंटेकच्या ‘नॉर्टन’ या सायबर आणि संगणकीय सुरक्षा कंपनीने केलेल्या निरीक्षणातून ही गोष्ट समोर आली आहे. या कंपनीच्या सर्वेक्षणानुसार, भारतात दर दहा नेटकरींपैकी आठ जणांना अशा प्रकारच्या ऑनलाइन छळवणुकीला सामोरे जावे लागल्याचे उघड झाले आहे.

ट्रोलिंग, चारित्र्यहनन, लैंगिक छळाची वा शारीरिक हिंसाचाराच्या धमक्या देणे असे प्रकार वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर नॉर्टनने केलेल्या पाहणीत ऑनलाइन छळवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये विरोधातील व्यक्तीबाबत अपशब्द वापरणे, अपमान करणे अशा प्रकारची छळवणूक करण्याचे प्रमाण सरासरी ६३ टक्के इतके असून द्वेषपूर्ण वक्तव्य, अफवा पसरवण्याचे प्रमाण ५९ टक्के इतके आहे.  शारीरिक हिंसाचाराची धमकी (४५ टक्के), सायबर धमकी (४४ टक्के) आणि सायबर पाठलाग (४५ टक्के) असे प्रकार खूप अधिक आहेत.

एखाद्या व्यक्तीची ऑनलाइन छळवणूक करताना तिचे वय, लिंग यांचेही तारतम्य पाळले जात नसल्याचे दिसून आले आहे. मात्र, त्यातही चाळिशीखालील वयोगटात असे प्रकार प्रचंड असल्याचे दिसून येते. या वयोगटातील ६५ टक्के व्यक्तींनी ऑनलाइन शिवीगाळ, अपमान, अपशब्द सोसल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षण दर्शविते की, पुरुष आणि महिला दोघांनाही ऑनलाइन छळाला सारखेच सामोरे जावे लागले आहे, मात्र चाळिशीखालील वयोगटातील पुरुषांना आणि अपंग व मानसिक अस्वास्थ्य असणाऱ्या व्यक्तींना अधिक गंभीर धमक्यांना तोंड द्यावे लागले आहे.  ८७ टक्के अपंग किंवा मानसिकदृष्टय़ा आजारी असलेल्यांना आणि लठ्ठपणाचा त्रास असलेल्या ७७ टक्के व्यक्तींना या त्रासाला सामोरे जावे लागल्याचे नॉर्टनच्या पाहणीत आढळून आले. विभागनिहाय विचार करता शारीरिक हिंसाचाराच्या सर्वाधिक धमक्या किंवा सायबरधमक्या पीडितांनी मुंबई (५१ टक्के), दिल्ली (४७ टक्के) आणि हैदराबादमध्ये (४६ टक्के) नोंदविल्या आहेत. सोशल मीडियावर लैंगिक छळ करणारे शेरे आणि संदेश पाठविण्यात येणे, तसेच अस्वस्थ करणारे ई-मेल पाठविणे, या तक्रारी सर्वाधिक आहेत. लैंगिक छळाच्या तक्रारी दिल्ली-मुंबईतील सर्वाधिक (४३ टक्के) पीडितांनी केल्या आहेत, त्याखालोखाल कोलकता (३७ टक्के) आणि बंगळुरू (३६ टक्के) येथील प्रमाण आहे.

सिमेंटकच्या नॉर्टनचे भारतातील व्यवस्थापक रितेश चोप्रा यांनी भारतातील ऑनलाइन छळवणुकीची पातळी अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले. ‘सायबर धमकीच्या सुमारे ४० टक्के घटना आणि सायबर पाठलागाच्या सुमारे निम्म्या घटनांमध्ये हे करणारी व्यक्ती अनोळखी असल्याचे आमच्या पाहणीत आढळून आले. आपल्याला धमकावणारी व्यक्ती कोण आहे, याची माहिती नसल्याचे अनेक पीडितांनी आम्हाला सांगितले,’ असे ते म्हणाले. ‘भारतातील वाढती लोकसंख्या सोशल मीडिया आणि मोबाइल ऑप्लिकेशन्सवर अधिक काळ घालवीत असताना ऑनलाइन वापरकर्त्यांनी नको असलेल्या संपर्कापासून त्यांच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी मूलभूत काळजी घ्यावी,’ असे आवाहनही त्यांनी केले.